“महाविकास आघाडीसोबत जाऊन त्यांची काशी झाली”, सदाभाऊ खोतांचा राजू शेट्टींना जोरदार टोला

| Updated on: Sep 04, 2021 | 6:03 PM

रयत क्रांती संघटनेचे नेते आणि शेट्टी यांचे जुने सहकारी सदाभाऊ खोत यांनी शेट्टींना जोरदार टोला लगावलाय. महाविकास आघाडीसोबत जाऊन काशी झाली म्हणून त्यांनी आता आत्मक्लेष यात्रा दुसऱ्यांदा काशीपर्यंत काढावी, अशा शब्दात खोत यांनी शेट्टींवर निशाणा साधलाय.

महाविकास आघाडीसोबत जाऊन त्यांची काशी झाली, सदाभाऊ खोतांचा राजू शेट्टींना जोरदार टोला
राजू शेट्टी, सदाभाऊ खोत
Follow us on

नांदेड : विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या यादीतून राष्ट्रवादी काँग्रेसनं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचं नाव वगळल्याची चर्चा आहे. त्यावरून राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे. तर रयत क्रांती संघटनेचे नेते आणि शेट्टी यांचे जुने सहकारी सदाभाऊ खोत यांनी शेट्टींना जोरदार टोला लगावलाय. महाविकास आघाडीसोबत जाऊन काशी झाली म्हणून त्यांनी आता आत्मक्लेष यात्रा दुसऱ्यांदा काशीपर्यंत काढावी, अशा शब्दात खोत यांनी शेट्टींवर निशाणा साधलाय. (Sadabhau Khot criticizes Raju Shetty over Legislative Council Governor appointed MLA)

“त्यांचा आमदारकीचा प्रश्न सध्या ऐरणीवर आलेला आहे. मला वाटतं की त्यांचा भ्रमनिराश तेव्हा लगेच झालेला होता, कारण सदाभाऊ खोत मंत्री असल्यामुळं. मग आता भ्रमनिराश झाला की नाही? झाला असला तर आता त्यांनी आत्मक्लेष यात्रा दुसऱ्यांदा काशीपर्यंत काढावी, जेणेकरून मी यांच्याकडे जाऊन माझी काशी झाली म्हणून मी आता काशीला अंघोळ करायला आलोय”, अशा शब्दात सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांना टोला लगावलाय.

राजू शेट्टींचा राष्ट्रवादीवर घणाघात

राजू शेट्टी यांनी मीडियाशी संवाद साधताना राष्ट्रवादीवर घणाघाती हल्ला चढवला. आमदारकी द्यावी की देऊ नये हा मुद्दा माझ्यासाठी गौण आहे. तो साधा समझोता आहे. राजकारणात असे समझोते होत असतात. 2019 च्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी आणि स्वाभिमानी शेतकरी पक्षात हा समझोता झाला होता. तो पाळायचा की नाही पाळायचा की पाठीत खंजीर खुपसायचा आणि कशा पद्धतीने पाळायचा हे ज्यांनी शब्द दिला त्याने ठरवायचं आहे. आम्ही त्यांच्या मागे आमदारकी द्या म्हणून कधी गेलो नव्हतो, असं शेट्टी म्हणाले.

तर करेक्ट कार्यक्रम करेन

मला त्या यादीतून का वगळण्यात आलं हे राष्ट्रवादीचे नेते सांगू शकतील. डावललं की नाही हे मलाही माहीत नाही, असं सांगतानाच ‘करेक्ट कार्यक्रमा’च्या पलीकडे आणखी एक करेक्ट कार्यक्रम असतो आणि तो मी करेन, असा इशाराही त्यांनी दिला. मी राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन सुरू केले आहे म्हणून मला डावलले गेले आहे. मी हाडाचा कार्यकर्ता आहे. मला आमदारकी काही मिळो न मिळो माझे आंदोलन सुरूच राहील, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

सरकारकडून आश्वासन नाही

पूरग्रस्तांच्या मदतीवरून शेट्टी यांनी यावेळी राज्य सरकार व केंद्र सरकारवर सडकून टीका केली. पूरग्रस्तांना मदत मिळावी म्हणून त्यांनी कोल्हापूर ते नरसिंहवाडीपर्यंत पदयात्रा काढली आहे. या पदयात्रेचा आज चौथ्या दिवस असून आजही पदयात्रा रांगोळी गावात आली. यावेळी त्यांचे महिला वर्गाने जंगी स्वागत केलं. राज्य सरकारकडून आम्हाला अजून कोणतेही आश्वासन आले नाही. आम्ही आमच्या जलसमाधीवर ठाम आहोत. जोपर्यंत शेतकऱ्यांना व पूरग्रस्तांना मदत मिळत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन सुरू राहणार आहे, असं त्यांनी सांगितलं.

इतर बातम्या :

यापुढे गर्दी होणार नाही, मुख्यमंत्र्यांना खंत वाटणार नाही असेच कार्यक्रम घेऊ: महापौर किशोरी पेडणेकर

VIDEO: फायर ब्रँड नेत्या मंदा म्हात्रे म्हणाल्या, भाजपात सन्मान मिळत नाही, चंद्रकांतदादा म्हणाले, संवाद साधू

Sadabhau Khot criticizes Raju Shetty over Legislative Council Governor appointed MLA