संजय काकडे अखेर काँग्रेसचा ‘हात’ पकडणार

| Updated on: Jul 05, 2019 | 4:19 PM

पुणे : भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांचा काँग्रेस प्रवेश अखेर निश्चित झाला आहे. स्वत: खासदार संजय काकडे यांनीच संदर्भात माहिती दिली. लवकरच आपण काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असून, पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारणार असल्याचे खासदार संजय काकडे यांनी सांगितले. पुण्यातील ‘पुणे कट्टा’वर बोलताना संजय काकडे ही माहिती दिली. पुणे लोकसभा लढवण्यासाठी जे जे इच्छुक उमेदवार […]

संजय काकडे अखेर काँग्रेसचा ‘हात’ पकडणार
Follow us on

पुणे : भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांचा काँग्रेस प्रवेश अखेर निश्चित झाला आहे. स्वत: खासदार संजय काकडे यांनीच संदर्भात माहिती दिली. लवकरच आपण काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असून, पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारणार असल्याचे खासदार संजय काकडे यांनी सांगितले. पुण्यातील ‘पुणे कट्टा’वर बोलताना संजय काकडे ही माहिती दिली. पुणे लोकसभा लढवण्यासाठी जे जे इच्छुक उमेदवार आहेत, ते सर्वपक्षीय इच्छुक उमेदवार पुणे कट्टावर एकत्र आले होते.

संजय काकडे नेमकं काय म्हणाले?

“आपण लवकर काँगेसमध्ये प्रवेश करणार असून, पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारणार आहे. समोर कुणीही आलं तरी निवडणूक लढणार आहोत.”, असे संजय काकडे म्हणाले. तसेच, मुख्यमंत्री आणि माझे मैत्रीचे संबंध असून, विचार आणि पक्ष वेगळे असतील, मात्र मैत्री कायम राहील, असेही संजय काकडे म्हणाले.

भाजपकडून आशा मावळल्याने इतर पक्षात चाचपणी

पुण्यात अनिल शिरोळे हे भाजपचे विद्यमान खासदार आहेत. शिरोळे हे शांत आणि संयमी व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जातात. शिरोळे कोणत्याही वादात नाहीत. मात्र शिरोळेंच्या कामावर काहीजण नाराज असल्याची चर्चा आहे. शिरोळेंना पर्याय म्हणून मंत्री गिरीश बापट आणि शहराध्यक्ष योगेश गोगावले यांचंही नाव पुढे येतंय. मात्र भाजपाच्या अंतर्गत सर्वेत आमदार जगदीश मुळीक आणि नगरसेवक मुरलीधर मोहळ यांचं नाव आघाडीवर आहे. मराठा आणि तरुण तडफदार चेहरा म्हणून पक्षात या दोघांवर चर्चा सुरु आहे. त्यामुळे भाजपमधून संजय काकडे यांना लोकसभेची उमेदवारी मिळणार नाही, हे जवळपास निश्चित असल्याने काकडेंनी इतर पक्षातून चाचपणी सुरु केली होती.

संजय काकडे कोण आहेत?

संजय काकडे हे सध्या भाजप पुरस्कृत राज्यसभेचे खासदार आहेत. एप्रिल 2014 मध्ये झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत ते भाजपच्या मदतीने विजयी झाले. काकडे हे बांधकाम व्यावसायिक, कंत्राटदार आहेत. ‘संजय काकडे ग्रुप’ असे त्यांच्या बांधकाम कंपनीचे नाव आहे. आपल्या ‘राजकीय भविष्यवाणी’मुळे ते कायम चर्चेच्या केंद्रस्थानी असतात. भाजपचे सहयोगी खासदार असले, तरी सर्वपक्षीयांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहेत. मात्र त्यांनी गेल्या काही निवडणुकांच्या निमित्ताने भाजपवर शरसंधान साधलं.

पुणे लोकसभा मतदारसंघातील पक्षीय बलाबल

पुण्यात पक्षीय बलाबलात भाजपा वरचढ आहे. लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. सहाही मतदारसंघात भाजपाचे विद्यमान आमदार आहेत. लोकसभा खासदार आणि राज्यसभेचे सहयोगी खासदार भाजपाचे आहेत. महानगरपालिकेत भाजपाची एकहाती सत्ता आहे. भाजपाकडे केंद्रीय मंत्र्यासह तीन मंत्रीपदं असल्याने भाजपाचं पारडं जड आहे. तर काँग्रेसकडे एक विधान परिषद आणि राष्ट्रवादीकडे राज्यसभेची खासदारकी आहे.

विधानसभा मतदारसंघांचं चित्र

  • शिवाजी नगर – भाजप
  • कोथरूड – भाजप
  • पर्वती – भाजप
  • कसबा – भाजप
  • कँटोन्मेंट – भाजप
  • वडगाव शेरी – भाजप