जुनी थडगी उकरली तर तुमच्याच पापाचे सांगाडे दिसतील; राऊतांचा किरीट सोमय्यांना इशारा

| Updated on: Nov 14, 2020 | 11:20 AM

जुनी थडगी आम्हालाही उकरता येते. पण मागचं विसरुन पुढे जावं ही आमची भूमिका असते. आम्हीही जुनी थडगी उकरली तर तुमच्या पापाचे सांगाडेच सापडतील, असा इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला. (sanjay raut slams bjp leader kirit somaiya)

जुनी थडगी उकरली तर तुमच्याच पापाचे सांगाडे दिसतील; राऊतांचा किरीट सोमय्यांना इशारा
Follow us on

मुंबई: किरीट सोमय्या हे माजी खासदार आहेत. त्यांच्या बोलण्याला त्यांचा पक्षही गांभीर्याने घेत नाही. त्यामुळे त्यांनी खोटेनाटे आरोप करणं थांबवावं, असं सांगतानाच जुनी थडगी आम्हालाही उकरता येतात. पण मागचं विसरुन पुढे जावं ही आमची भूमिका असते. आम्हीही जुनी थडगी उकरली तर तुमच्या पापाचे सांगाडेच सापडतील, असा इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला. (sanjay raut slams bjp leader kirit somaiya)

दिवाळी निमित्त प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर पुन्हा टीका केली. आम्ही बोलावं असं महान कार्य त्यांनी केलं नाही. ते माजी खासदार आहेत. त्यांनी त्यांचं काम करावं. त्यांना त्यांचा पक्षही गंभीरपणे घेत नाही. ते जे बोलतात त्यामुळे त्यांच्याच पक्षाची विश्वासहार्यता कमी होत आहे. याचं भान त्यांनी ठेवलं पाहिजे. त्यांनी खोटेनाटे आरोप करणं बंद करावं. जुनी थडगी आम्हाला उकरता येतात. पण मागच विसरून पुढे जावं ही आमची भूमिका आहे. आम्हीही जुनी थडगी उकरली तर तुमच्याच पापाचे सांगाडे सापडतील, असा इशारा संजय राऊत यांनी सोमय्या यांना दिला.

महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस होणार नसल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला. राज्यात कोणतंही ऑपरेशन होणार नाही. विरोधकांनी गेले वर्षभर अनेक ऑपरेशन केले. पण या सरकारला साधं खरचटलं सुद्धा नाही. मागील वर्षी विरोधकांनी अनेक अघोरी प्रयोग करण्याचे प्रयत्न केले. पण आम्ही त्यांना पुरून उरलो. त्यामुळे त्यांनी आता ऑपरेशनची भाषा बंद केली पाहिजे. सरकारला कितीही अडचणीत आणण्याचं काम केलं तरी हे सरकार पाच वर्षे स्थिर राहणार आहे. उद्धव ठाकरे हेच पाच वर्षे मुख्यमंत्री राहतील, असंही राऊत यांनी सांगितलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी जवानांसोबत दिवाळी साजरी करत असल्याबद्दलही त्यांनी स्वागत केलं. ही भारताची संस्कृती असल्याचं सांगतानाच जवानांनासोबत दिवाळी साजरी करणं चांगलं आहे. पण काल आपले जवान शहीद झाले आहेत. हे सुद्धा लक्षात घ्यावं, असंही ते म्हणाले. राजद नेते तेजस्वी यादव हे खरे योद्धे आहेत, असंही ते म्हणाले.

ओबामांना अधिकार कुणी दिला?

यावेळी त्यांनी अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांच्यावरही टीका केली. ओबामा यांची मते काय आहेत हे माहीत नाही. पण भारतातील नेत्यांबाबत बोलण्याचा अधिकार त्यांनी कुणी दिला? त्यांनी भारतीय नेत्यांबाबत बोलणं चुकीचं आहे. ओबामांनी एक वक्तव्य केलं अन् इथल्या नेत्यांनी त्याचं राजकारण केलं हे चुकीचं आहे. उद्या ते मोदींबाबत बोलले तर माझी भूमिका हीच असेल, असं सांगतानाच काँग्रेस नेते राहुल गांधी उत्तम काम करत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. (sanjay raut slams bjp leader kirit somaiya)

 

संबंधित बातम्या:

अर्थव्यवस्थेला ‘बूस्टर डोस देण्यासाठी ‘प्रोत्साहन पॅकेज’ जाहीर, किती ‘प्रोत्साहन’ मिळते ते भविष्यात दिसेलच, शिवसेनेचा टोला

देवेंद्र फडणवीसांनंतर भाजपकडून महाराष्ट्रातील आणखी तीन नेत्यांना राष्ट्रीय राजकारणात मोठी जबाबदारी

नितीशकुमार हे शरद पवारांसारखे; सहजासहजी कुणाच्या हाती लागणार नाहीत: राऊत

(sanjay raut slams bjp leader kirit somaiya)