रणजित नाईक निंबाळकरांना पितृशोक, माजी खासदार हिंदुराव नाईक निंबाळकरांचं निधन

| Updated on: Mar 15, 2020 | 10:21 AM

दुष्काळी भागातील लढवय्या नेता अशी ओळख असलेले माजी खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर यांचं पुण्यात अल्पशा आजाराने निधन झालं Hindurao Naik Nimbalkar Death

रणजित नाईक निंबाळकरांना पितृशोक, माजी खासदार हिंदुराव नाईक निंबाळकरांचं निधन
Follow us on

सातारा : माढ्याचे भाजप खासदार रणजित नाईक निंबाळकर यांना पितृशोक झाला. शिवसेनेचे माजी खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर यांचं वयाच्या 72 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झालं. पुण्यातील रुबी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. (Hindurao Naik Nimbalkar Death)

हिंदुरावजी नाईक निंबाळकर शिवसेनेच्या तिकीटावर सातारा मतदारसंघातून खासदारपदी निवडून आले होते. 1996 मध्ये इंद्रकुमार गुजराल आणि देवेगौडा यांच्या कार्यकाळात हिंदुराव 18 महिन्यांसाठी खासदार होते.

दुष्काळी भागातील लढवय्या नेता अशी हिंदुराव नाईक निंबाळकर यांची ओळख होती. 1999 मध्ये कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्षपदही त्यांनी भूषवलं होतं.

माढ्याचे खासदार रणजित नाईक निंबाळकर आणि फलटण नगरपरिषदेचे विरोधीपक्ष नेते समशेरबहाद्दर नाईक निंबाळकर हे हिंदुरावजी नाईक निंबाळकर यांचे पुत्र. जिल्हा परिषदेच्या सदस्या जिजामाला नाईक निंबाळकर त्यांच्या स्नुषा आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

हिंदुरावजी यांच्या पार्थिवावर आज दुपारी (रविवार 15 मार्च) 4 वाजता फलटण येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. निंबाळकरांच्या निधनाने सातारा जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. (Hindurao Naik Nimbalkar Death)

रणजित नाईक निंबाळकर यांनी गेल्या वर्षी मार्च महिन्यातच भाजपमध्ये प्रवेश केला होता. लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादीला रामराम ठोकल्यानंतर त्यांनी भाजपची वाट धरली. पक्षप्रवेशानंतर त्यांना लगेच सातारा मतदारसंघातून तिकीटही मिळालं होतं.