माथेरानमधील 10 फुटीर नगरसेवकांचा राजकीय एन्काऊंटर, शिवसेनेचा भाजपला धक्का

| Updated on: Jun 22, 2021 | 9:20 AM

शिवसेनेच्या 14 नगरसेवकांपैकी उपनगराध्यक्ष आकाश चौधरी यांच्यासह 10 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. पर्यायाने शिवसेनेची सत्ताच पालटल्यामुळे पक्षासाठी हा मोठा धक्का होता.

माथेरानमधील 10 फुटीर नगरसेवकांचा राजकीय एन्काऊंटर, शिवसेनेचा भाजपला धक्का
Matheran Shiv Sena Corporators join BJP
Follow us on

रायगड : माथेरान नगरपंचायतीमधील सत्ताधारी शिवसेनेच्या गटातील उपनगराध्यक्षांसह नऊ नगरसेवक आणि एका स्वीकृत सदस्याने गेल्या महिन्यात भाजपचा झेंडा हाती घेतला होता. आता पक्षांतर्गत बंदी कायद्याअंतर्गत दहा जणांवर कारवाई करण्याबाबतचे आदेश रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी काढले आहेत. त्यामुळे भाजपवासी नगरसेवकांवर कारवाईची टांगती तलवार आहे. (Shiv Sena to take action against 10 rebel corporators in Matheran under The Anti Defection Law)

महिन्याभरानंतर बंडखोरांवर कारवाई

माथेरानमधील शिवसेनेच्या 14 पैकी 10 नगरसेवकांनी गेल्या महिन्यात कोल्हापुरात भाजपप्रवेश केला होता. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला होता. दहा नगरसेवकांच्या पक्षांतरामुळे अस्वस्थ असलेल्या शिवसेनेकडून जवळपास महिनाभर कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले होते.

नेमकं काय घडलं होतं?

जळगावमधील मुक्ताईनगरात भाजपच्या दहा आजी-माजी नगरसेवकांनी 26 मे रोजी शिवसेनेत प्रवेश केला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत या 10 आजी-माजी नगरसेवकांनी हाती शिवबंधन बांधलं होतं. मात्र 27 मे रोजी, अवघ्या 12 तासात भाजपने याचा वचपा माथेरानमध्ये काढला. शिवसेनेच्या 14 नगरसेवकांपैकी उपनगराध्यक्ष आकाश चौधरी यांच्यासह 10 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पर्यायाने शिवसेनेची सत्ताच पालटल्यामुळे पक्षासाठी हा मोठा धक्का होता.

‘मातोश्री’वरुन सूत्र, अनिल देसाईंची पावलं

कारवाई होत नसल्याच्या सर्व चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या वतीने करण्यात आला आहे. पक्षांतर्गत बंदी कायद्याअंतर्गत बंडखोर नगरसेवकांवर कारवाई करण्याचे आदेश रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी काढले आहेत. त्यामुळे भाजपवासी झालेल्या नगरसेवकांवर कारवाईची टांगती तलवार येणार आहे. ‘मातोश्री’वरुन यासंबंधी सूत्र हलवण्यात आली असून ही जबाबदारी शिवसेना सचिव अनिल देसाई यांनी पार पाडली असल्याचं बोललं जात आहे.

भाजप प्रवेश केलेले माथेरान नगरपरिषदेचे 10 नगरसेवक

1) आकाश चौधरी, उपनगराध्यक्ष
2) राकेश चौधरी, नगरसेवक
3) सोनम दाबेकर, नगरसेवक
4) प्रतिभा घावरे, नगरसेवक
5) सुषमा जाधव, नगरसेवक
6) प्रियांका कदम, नगरसेवक
7) ज्योती सोनवळे, नगरसेवक
8) संदीप कदम, नगरसेवक
9) चंद्रकांत जाधव, नगरसेवक
10) रुपाली आखाडे, नगरसेवक

संबंधित बातम्या 
मुक्ताईनगरात भाजपला धक्के सुरुच, आजी-माजी 10 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश
मुक्ताईनगरचा वचपा माथेरानमध्ये, शिवसेनेचे 14 पैकी 10 नगरसेवक भाजपमध्ये
(Shiv Sena to take action against 10 rebel corporators in Matheran under The Anti Defection Law)