राणेंनी जयंतरावांसाठी शिवलेला कोट, विलासराव- गोपीनाथरावांचा दिलदारपणा, महाराष्ट्राच्या सुसंस्कृतपणाचे 6 लाजवाब किस्से

| Updated on: Aug 26, 2021 | 9:06 AM

महाराष्ट्राच्या राजकारणात सगळं काही बरं चाललंय असं सध्या तरी काही चित्र नाही... पण राज्याच्या राजकारणात एक असाही काळ होता, ज्या काळात पक्षीय राजकारणापलीकडची मैत्री जपली जायची, एकमेकांचा आदर केला जायचा, मानसन्मान ठेवला जायचा, पण आज.............?

राणेंनी जयंतरावांसाठी शिवलेला कोट, विलासराव- गोपीनाथरावांचा दिलदारपणा, महाराष्ट्राच्या सुसंस्कृतपणाचे 6 लाजवाब किस्से
Follow us on

अक्षय आढाव, टीव्ही 9 मराठी, मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सगळं काही बरं चाललंय असं सध्या तरी काही चित्र नाही… कोण मुस्काडात मारण्याची भाषा करतो, कोण कोथळा काढण्याची भाषा करतो. तर कोण सत्तेची धमकी देत जेलमध्ये टाकण्याची भाषा करतो. एकंदरितच सध्याच्या राजकारणाचा स्तर खूपच खालावला आहे. व्यक्तिगत हल्ले दिवसेंदिवस वाढायला लागले आहे. यामध्ये कुणी पदाचा, वयाचा, ज्येष्ठत्वाचा कसलाही मान ठेवत नाही. मग संघर्ष अटळ होतो… केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेनेत चाललेला राडा हे त्याचंच द्योतक……. पण महाराष्ट्राच्या राजकारणात एक असाही काळ होता, ज्या काळात पक्षीय राजकारणापलीकडची मैत्री जपली जायची… विरोधक असला तरी त्याचा पूर्णत: आदर ठेऊन त्याच्या भूमिकांना केवळ विरोध केला जायचा… एकंदरितच हा राज्याच्या राजकारणातला सुवर्ण काळ म्हटला तर वावगं ठरणार नाही. आज अशाच सुवर्णक्षणांना आपण उजाळा देऊयात…………!

महाराष्ट्र 6 दशकांचा झालाय… देशात सर्वांत प्रगतशील आणि वैचारिक प्रगल्भता असलेलं राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे… ही ओळख निर्माण करायला जाणत्या राजकीय नेत्यांचा फार मोठा वाटा राहिलेला आहे… महाराष्ट्राची राजकीय संस्कृती देशातील इतर राज्यांपेक्षा वेगळी आहे. महाराष्ट्रातली राजकीय संस्कृती उदार मनाची… ज्येष्ठांचा आदर करणारी… तसंच पक्षीय भेदाभेद न मानता दुसऱ्या पक्षातील नेत्यांशीही दिलखुलास संवाद साधून, विवेचन करुन सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणारी आहे. तसा धडाच महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांनी घालून दिला आहे. तोच धडा महाराष्ट्रातील राजकीय पक्षांचे काही नेते आजही अगदी निसंकोचपणे गिरवत आहेत, कधी कधी याच्यात उन्नीस बीस होतंही, आणि मग तेव्हाच जुन्या काळात पुन्हा जावं लागतं……….!

नितीन गडकरी-मनोहर जोशी भेट

गेल्या वर्षीच्या राजकीय समीकरणांनी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. कित्येक वर्षांचा जिव्हाळा असणारे नेते आणि पक्ष एकमेकांपासून दूर गेले. मात्र या सगळ्यातही पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जात, कायम नात्यांना जपणारे भाजपचे ज्येष्ठ नेते तथा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याच वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारी 2021 ला शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची भेट घेतली. भेटीवेळी झुकून जोशी सरांना त्यांनी नमस्कार केला. आपल्या मुख्यमंत्र्यांविषयी आजही मनात स्नेह आहे, हे दाखवून देत ऋणानुबंध घट्ट केले. कारण जोशी सरांच्या मंत्रिमंडळात गडकरींच्या खांद्यावर सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाची धुरा होती.

मनोहर जोशी यांच्या पत्नीचं कोव्हिड काळात निधन झालं. त्यावेळी गडकरींना भेटायला यायला जमलं नाही. गडकरी मुंबईत होते. अगदी सकाळीच ते जोशी सरांच्या घरी पोहचले. आदराने त्यांची विचारपूस केली. ‘आशीर्वाद असू द्या’ म्हणून त्यांना नमस्कार केला.

नितीन गडकरींनी मनोहर जोशींची भेट घेतली

जोशी आणि गडकरींचं नातं खास आहे ते यासाठी की…, मनोहर जोशी हे 1995 ते 1999 या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. जोशी सरांच्या कार्यकाळात शिवसेना-भाजप युती सरकारमध्ये नितीन गडकरी यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाची धुरा होती. सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून मुंबई-पुणे महामार्गाच्या विकासात नितीन गडकरी यांचा सिंहाचा वाटा मानला जातो. तसंच इतरही महत्त्वाचे प्रोजेक्ट जोशी सरांच्या मार्गदर्शनात गडकरी यांनी तडीस नेले. गडकरींनी जोशी सरांना कायम ‘आपला नेता’ मानलं…. मार्गदर्शक मानलं…. या भेटीच्या निमित्ताने गडकरी-जोशींनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.

गडकरींची फक्त राजकारणी म्हणूनच ओळख नाहीये तर राजकारणातील नाती जपणारा ‘खास अवलिया’ म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांच्याच शब्दात सांगायचं झालं तर, “एकदा का मी एखाद्याचा हात हातात घेतला की तो शेवटपर्यंतो सोडणे नाही. आपल्या अडचणींच्या काळात त्या माणसाने आपल्याला साथ दिलीय. मग आपले चांगले दिवस आल्यावर त्याला कसं विसरायचं. हा माझा स्थायीभाव नाहीये…,” असं सांगताना गडकरींचे नारायण राणे, शरद पवार, उद्धव ठाकरे, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण यांच्याशी मित्रत्वाचे संबंध आहेत.

लोकसभेला एकमेकांविरुद्ध, निकालाच्या दिवशी धैर्यशील माने-राजू शेट्टींच्या घरी

निवडणूक म्हटलं की एकमेकांवर आरोप, प्रत्यारोप आणि चिखलफेल ठरलेली…. आपल्या समोरच्या उमेदवाराचं कोणत्याही परिस्थितीत नामोहरण करायचं, असा चंग उमेदवार बांधतात. पण याला अपवाद ठरले. शिवसेनेचे युवा नेते धैर्यशील माने…

2019 च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत हातकणंगले मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी विरुद्ध शिवसेनेचे तरुण उमेदवार धैर्यशील माने यांच्यात सामना झाला. मानेंच्या प्रचारासाठी खुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसंच सेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी हजेरी लावली. तर राजू शेट्टींच्या प्रचारासाठी आघाडीच्या अनेक नेत्यांनी हजेरी लावली. दरम्यान, प्रचाराच्या काळात राजकीय आरोप प्रत्यारोप झाले, एकमेकांवर शेरेबाजी झाली. पण निकालाच्या दिवशी पुन्हा एकदा महाराष्ट्राची राजकीय संस्कृती दिसून आली.

हातकणंगले मतदारसंघातून धैर्यशील माने यांनी राजू शेट्टींचा पराभव केला. निकाल लागल्यानंतर कार्यकर्त्यांसमवेत माने यांनी विजयी आनंदोत्सव साजरा केला आणि त्यांनी आपल्या गाड्यांचा ताफा वळवला तो प्रतिस्पर्धी उमेदवार असलेल्या राजू शेट्टी यांच्या घराकडे… आपले प्रतिस्पर्धी असलेले विजयी उमेदवार आपल्या घरी आल्याने राजू शेट्टीही अवाक झाले. धैर्यशील मानेंचं राजू शेट्टींनी यथोचित स्वागत केलं. यावेळी मानेंनी राजू शेट्टी यांचे आशीर्वाद घेऊन, ‘झालं गेलं गंगेला मिळालं’ निवडणूक संपली, जनतेच्या प्रश्नासाठी आपण एकत्र येऊ, असं म्हटलं. यावेळी मानेंनी शेट्टी यांच्या मातोश्रींनाही नमस्कार करुन “मी ही तुमचा मुलगा आहे, मलाही आशीर्वाद द्या… असं म्हणत परकेपणाची भावना दूर लोटली.

निकालाच्या दिवशी प्रतिस्पर्धी उमेदवाराने दुसऱ्या उमेदवाराच्या घरी जाऊन घेतलेली ही भेट महाराष्ट्राच्या चांगलीच लक्षात राहिलीय. शेतकऱ्यांचे नेते राजू शेट्टी हरले म्हणून अनेकांना खंत वाटली. पण मानेंच्या संस्कारामुळे आणि दिलदारपणामुळे ही बोच कमी झालीआणि मानेंनी संबंध महाराष्ट्राचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं.

विधानसभेचं मैदान मारल्यानंतर रोहित पवार राम शिंदेंच्या घरी

कर्जत विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार विरुद्ध तत्कालिन मंत्री राम शिंदे यांच्यात लढत झाली. या तुल्यबळ लढतीत रोहित पवार यांनी बाजी मारली. निकालाच्या दिवशी रात्री 9 वाजता रोहित पवार थेट प्रतिस्पर्धी उमेदवार राम शिंदे यांच्या घरी पोहोचले. राम शिंदे यांनीही रोहित पवार यांना विजयी फेटा बांधला. राम शिंदे यांच्या मातोश्री आणि पत्नीने रोहित यांचं यावेळी औक्षण केलं. रोहितनेही शिंदे परिवाराचे आशीर्वाद घेऊन कर्जत-जामखेडकरांसाठी दिवसरात्र काम करेन, असा शब्द दिला. ही भेट संपूर्ण राज्यात चर्चिली गेली.

शेवटी निवडणूक म्हटलं की आरोपांची राळ तर उडणारच पण ती झाल्यावर पाठीमागचं विसरुन खिलाडूवृत्तीने पुढे जात आपण एकमेकांचे शत्रू नाही आहोत. शेवटी वाटा जरुर वेगळ्या असतील पण ध्येय तर एकच आहे, असं म्हणून रोहित पवार यांनी दाखवलेल्या सुसंस्कृतपणाचं राज्यभर कौतुक झालं. रोहित पवार यांच्या या कृत्याची अगदी शरद पवार यांच्याशी तुलना झाली. आजोबाने जसं सगळ्यांना सोबत घेऊन महाराष्ट्र हाकला तसंच प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या घरी जाऊन, त्याची आस्थेने चौकशी करुन, रोहित पवार यांनी पवारांच्या पावलावर पाऊट टाकल्याचं मत राजकीय निरीक्षकांनी नोंदवलं.

पवार-गडकरी काय किंवा स्व. विलासराव-गोपीनाथराव काय, या सगळ्यांनी पक्षीय राजकारणापलीकडची मैत्री जपली. दुसऱ्या पक्षात असलेल्या मित्राचे हात कसे बळकट होतील, हे पडद्यामागून पाहिलं, त्यासाठी प्रयत्न केले. याचं उत्तम उदाहरण द्यायचं झालं तर गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख… आयुष्यभर पक्षीय पातळीवर विरोधात राजकारण केलं पण हे राजकारण त्यांनी कधी मैत्रीआड येऊ दिलं नाही. सार्वजनिक मंचावरुन अनेकदा ते एकमेकांना चिमटे काढत, कोपरखळ्या मारत. त्यांची भाषणं ऐकताना उपस्थितांमध्ये हास्याचे फवारे उडायचे. असं वाटायचंच नाही की हे दोन नेते वेगवेगळ्या पक्षाचे आहेत.

गडकरी पवार यांची मैत्री तर खास… जनतेला पवार-गडकरींच्या मैत्रीचं नेहमी कतुहल वाटतं. पण पवारांच्या एकूणच अनुभवसंपन्न आणि अभ्यासपूर्ण राजकारणाचे गडकरी चाहते आहेत. प्रतिकूल परिस्थितीत दिल्लीच्या विरोधात जाऊन पवारांनी ज्या प्रकारे महाराष्ट्र हलवला, त्याचं अनेकवेळा गडकरींनी सार्वजनिक मंचावरुन कौतुक केलं. तसंच पवारांच्या कृषी आणि संघटन कौशल्याचं गारुड गडकरींच्या मनावर आहेत. पक्षभिन्नता जरी असली तरी कौतुक करताना, चांगुलपणा सांगताना पक्ष कधी आड आला नाही. गडकरींनी कायम खुल्या दिलाने पवारांचं कौतुक केलं.

नारायण राणेंनी जयंतरावांसाठी कोट शिवून घेतला…`

राणे राजकारणाच्या पलीकडे खास दोस्ताना जपणारे म्हणून परिचित आहेत. नऊ महिन्यांसाठी शिवसेनेने राणेंना मुख्यमंत्रीपदाची संधी दिली. राणेंचं मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर त्यांनी आपली मैत्रीचं वर्तुळ रुंदावलं. 1999 ला युतीचं सरकार जाऊन आघाडीचं सरकार सत्तेवर आलं. तेव्हा राणे विरोधी पक्षनेते बनले तर जयंत पाटील अर्थमंत्री. अधिवेशनाचा काळ सुरु असताना जयंत पाटलांना राज्याचं बजेट मांडायचं होतं. त्यावेळी आपल्या मित्राचं काय चाललंय? पहिल्यांदाच बजेट मांडताना
तो कुठला ड्रेस घालणार आहे?, अशी सहजच विचारणा करणारा फोन राणेंनी जयंत पाटलांना केला. यावर पांढरा सदरा आणि पायजमा घालणार म्हणून जयंत पाटलांनी सांगितलं. मित्राचा चॉइस राणेंना काही आवडला नाही. लागलीच पुढच्या 4 तासांमध्ये राणेंनी आपल्या मित्रासाठी कोट शिवून घेतला आणि जयंत पाटलांच्या घरी पाठवून दिला. मित्राने शिवलेला कोट जयंत पाटलांनीही अगदी रुबाबात घालून राज्याचं बजेट मांडलं आणि आपला दोस्ताना जपला.

हे सगळं झालं, कारण याला यशवंतराव चव्हाणांनी घालून दिलेला सुसंस्कृत राजकारणाचा आणि महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा धडा… फक्त विरोध करायचा म्हणून टोकाचं राजकारण करायचं हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभा देणारं नाही, हाच वस्तुपाठ महाराष्ट्रातील राजकारणी घालून देत आहेत. देशातील सध्याचं राजकीय वातावरण आणि परिस्थिती पाहता देशातल्या इतर राज्यांनीही महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचं अनुकरण करायला हरकत नाही….!