महिलांसाठी विशेष टॉयलेट्स, भीमसैनिकांसाठी खास सोय अन्…; महापरिनिर्वाण दिनासाठी मुंबई सज्ज, पालिकेकडून कोणत्या सुविधा?
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी, शिवाजी पार्क येथे लाखोंच्या संख्येने येणाऱ्या अनुयायांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने जय्यत तयारी केली आहे. निवारा, स्वच्छता, वैद्यकीय सेवा आणि सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिका सज्ज झाली आहे. या निमित्ताने लाखो अनुयायी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी, छत्रपती शिवाजी महाराज मैदान आणि राजगृह (डॉ. आंबेडकर यांचे निवासस्थान) या प्रमुख ठिकाणी येत असतात. या अनुयायांसाठी पालिका प्रशासनाकडून आवश्यक नागरी सेवा-सुविधांची पूर्तता करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्क येथे १ लाख चौरस फूट क्षेत्रफळावर वॉटरप्रूफ निवासी मंडपाची सोय करण्यात आली आहे. ज्यात अनुयायांना तात्पुरता निवारा मिळेल. तसेच, निवासी मंडपात १० ठिकाणी एलईडी स्क्रीन लावण्यात आले आहेत.
स्वच्छता, प्रसाधनगृहे आणि स्नानासाठी व्यवस्था
या परिसराची स्वच्छता राखण्यासाठी ५२७ कामगार विविध संयंत्रांसह प्रत्येक सत्रात कार्यरत असतील. अनुयायांच्या सुविधेसाठी दर्शन रांग व मुख्य मार्गांवर एकूण १५० फिरती शौचालये उपलब्ध असतील. तसेच अभिवादन रांगेत १०, मैदान परिसरात २५४ अशी शौचालये असणार आहे. त्यासोबतच महिलांसाठी विशेष पिंक टॉयलेट्सची व्यवस्था करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, नळ व शॉवर सुविधेसह २८४ तात्पुरती स्नानगृहे तयार करण्यात आली आहेत. तसेच ३० हजार चौरस मीटर क्षेत्रफळाच्या पायवाटांवर धूळ प्रतिबंधक आच्छादन केले आहे.
आरोग्य आणि वैद्यकीय सुविधांचा चोख बंदोबस्त
यावेळी अनुयायांसाठी आरोग्य तपासणी, औषधोपचार आणि वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी २० रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी ५८५ तज्ज्ञ मनुष्यबळ कार्यरत असेल. गेल्यावर्षी १३,२८२ अनुयायांनी या आरोग्य तपासणी व औषधोपचारांचा लाभ घेतला होता. डेंग्यू व हिवताप याबाबत जनजागृती करण्यासाठी विशेष कक्ष स्थापन करण्यात आले आहे. तसेच किटकनाशक व मक्षिका नियंत्रण फवारणीसाठी देखील मनुष्यबळ नेमण्यात आले आहेत. राजगृह येथेही नियंत्रण कक्ष आणि वैद्यकीय कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
सुरक्षा, पाणीपुरवठा आणि इतर महत्त्वपूर्ण सेवा
सुरक्षेच्या दृष्टीने सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे, फिरते कॅमेरे, मेटल डिटेक्टर्स, बॅग स्कॅनर्स आदींसह नियंत्रण कक्ष, माहिती कक्ष व निरीक्षण मनोऱ्यांची उभारणी करण्यात आली आहे. यावेळी अग्निशमन वाहने, अतिदक्षता रुग्णवाहिका (ICU Ambulance) आणि दादर चौपाटी येथे बोट इत्यादींची व्यवस्था करण्यात आली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी २५४ नळांसह १६ टँकरची व्यवस्था असून, अनुयायांसाठी बिस्किट व भोजन व्यवस्था करण्यात आली आहे. महिलांसाठी महत्त्वाचा असलेला हिरकणी कक्ष देखील उभारण्यात आला आहे. संपूर्ण परिसरात विद्युत रोषणाई आणि मोबाईल चार्जिंगसाठी शिवाजी पार्क येथे विशेष सुविधा पॉइंट उपलब्ध केले आहेत. चैत्यभूमीतील आदरांजलीचे मोठ्या पडद्यांवर व महानगरपालिकेच्या समाजमाध्यमांद्वारे थेट प्रक्षेपण होणार आहे.
चैत्यभूमीच्या अशोक स्तंभ परिसरात सुरक्षात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. याच परिसरातून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, महत्वाचे नेते बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी जातात. त्यामुळे या स्तंभाच्या बाजूला मेटल डिटेक्टर, बॅग तपासणी मशीन बसवण्यात आली आहे. सध्या परिसरात ७० च्या वर पोलीस आणि समता सैनिक दलाचे जवान ही बंदोबस्तासाठी तैनात असणार आहेत
शिवाजी पार्कवरील ‘ज्ञानाचे भांडार’ – पुस्तकांचे स्टॉल्स
दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर ५०० च्या वर पुस्तकांचे स्टॉल्स लागले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी येणारे अनुयायी मोठ्या प्रमाणावर पुस्तकांची खरेदी करतात. या दोन दिवसांत लाखो रुपयांच्या पुस्तकांची खरेदी-विक्री सुरू असते. यावेळी करोडो रुपयांची उलाढाल होत असल्याचा दावा पुस्तक विक्रेत्यांनी केला आहे. या ठिकाणी दिल्ली, मुंबई, नागपूर, पुणे, परभणी, येवला, संभाजी नगर, कोकण यासह देशभरातील अनेक पुस्तक विक्रेते येथे आपली दुकाने लावतात.
