ही तर फक्त सुरुवात, एकीचं बळ… उद्धव ठाकरे यांचं सूचक ट्विट

त्रिभाषा सूत्राअंतर्गत इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा विषय लागू करण्याचे दोन्ही शासन निर्णय रद्द करण्यात आले आहे. यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी याबाबत एक ट्विट केले आहे.

ही तर फक्त सुरुवात, एकीचं बळ... उद्धव ठाकरे यांचं सूचक ट्विट
uddhav thackeray
| Updated on: Jun 29, 2025 | 9:41 PM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेत त्रिभाषा सूत्राअंतर्गत इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा विषय लागू करण्याचे दोन्ही शासन निर्णय रद्द केले असल्याची माहिती दिली. आता राज्य सरकारच्या या निर्णयाबाबत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक ट्विट केलं आहे. याबाबत माहिती जाणून घेऊयात.

एकीचं बळ…

राज्य सरकारच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांनी एक ट्विट करत म्हटले की, ‘विजय मराठी माणसाचा विजय मराठी भाषेचा. मराठी माणूस एकवटताना दिसताच भाजपाच्या पायाखालची वाळू सरकली. ही तर फक्त सुरुवात आहे. एकीचं बळ महाराष्ट्र पाहणार आहे.’

मराठी माणसाच्या शक्तीसमोर सरकारची शक्ती हरली

आज हिंदी भाषा विषय लागू करण्याचे दोन्ही शासन निर्णय रद्द झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी म्हटले की, ‘आज पूर्ण राज्यभर हिंदी सक्तीच्या विरोधात आंदोलन केलं. सर्व मराठी भाषिकांनी केलं. सरकारने काढलेल्या अजब जीआरची होळी केली. मराठी भाषा समितीने जे आंदोलन केलं होतं, त्याता मी सहभागी झालो. आज महाराष्ट्रात हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात आंदोलन झालं. मराठी माणसाच्या शक्तीसमोर सरकारची शक्ती हरली आहे. सक्ती हरली आहे. मराठी माणसाने ताकद दाखवली तर सरकार मागे हटतं.’

भाषेला विरोध नाही तर सक्तीला विरोध

पुढे बोलताना ठाकरे म्हणाले की, ‘मराठी माणसात विभागणी करायची आणि मराठी अमराठी असं करून अमराठी मतं भाजपकडे खेचायची असा त्यातला भाजपचा छुपा अजेंडा होता. पण समाधानाची गोष्ट अशी की मराठी माणसाने समंजसपणाची भूमिका घेतली. भाषेला विरोध नाही तर सक्तीला विरोध आहे. सक्तीच्या विरोधात आंदोलन असल्याने त्यात फूट पडली नाही.’

पुढे बोलताना उद्धव ठाकरेंनी सांगितले की, ‘मराठी माणसाची फूट लाभदायक ठरेल असं सरकारला वाटलं होतं. आज आंदोलन केल्यावर मराठी माणूस एवढा एकवटेल असं वाटलं नव्हतं सरकारला. 5 तारखेला मोर्चा होऊ नये, तो मोर्चा फोडण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला. म्हणून त्यांनी तो जीआर रद्द केला.’