कितीही ट्रोल करा, मी मराठी मुलगी आहे, मागे हटणार नाही; उर्मिला मातोंडकरांचा इशारा

शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी पहिल्यांदाच दणदणीत आणि खणखणीत मुलाखत दिली. (actress urmila matondkar reaction on trolls)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 17:02 PM, 1 Dec 2020

मुंबई: कितीही ट्रोल करा. मी मराठी मुलगी आहे. मागे हटणार नाही. माझं काम करतच राहणार, असा इशारा देतानाच ट्रोलरमुळे देशात विद्वेषाचं वातावरण निर्माण झालं आहे, असं प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी सांगितलं. (actress urmila matondkar reaction on trolls)

शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी पहिल्यांदाच दणदणीत आणि खणखणीत मुलाखत दिली. यावेळी त्यांनी धर्मनिरपेक्षता, हिंदुत्व, काँग्रेस आणि भाजप आदी सर्व मुद्द्यांवर आपली मतं व्यक्त केली आहे. यावेळी त्यांनी ट्रोलरवरही टीका केली. ट्रोलरमुळे देशात विद्वेषाचं वातावरण निर्माण झालं आहे. अत्यंत हीनपातळीवर ट्रोलिंग केल्या जातं. मला पुन्हा ट्रोल केल्या जात आहे. पण ट्रोल केल्यामुळे मी योग्य रस्त्यावरून जात असल्याचं माझ्या लक्षात येतंय. मला कितीही ट्रोल केलं तरी मी मागे हटणार नाही. मी मराठी मुलगी आहे. मराठी पाऊल पुढे पडतच राहणार, असा इशारा त्यांनी भाजपच्या ट्रोलरला दिला.

शिवसैनिक म्हणून काम करणार

शिवसेनेची महिला आघाडी अत्यंत भक्कम आहे. या आघाडीचा एक भाग होता आलं. त्याबद्दल मला आनंदच आहे, असं सांगतानाच आमदारकीसाठी माझ्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. पण मी शिवसैनिक असून शिवसैनिक म्हणूनच काम करणार आहे, असंही त्या म्हणाल्या.

सेक्युलर म्हणजे इतर धर्मीयांचा द्वेष करणं नाही

मी जरूर सेक्युलर आहे. पण सेक्युलर असणं म्हणजे इतर धर्मांचा द्वेष करणं असं नाही. सेक्युलर असणं म्हणजे आपल्या गोष्टी इतरांवर लादणं असं नाही. किंवा हिंदू असणं म्हणजेही आपलाच धर्म पुढे रेटणं असंही नाही. सेक्युलर असले तरी मी जन्माने हिंदू आहे आणि कर्मानेही हिंदू आहे. आठ वर्षाची असताना मी योगाचा अभ्यास केलाय. मी योगा टिचरही आहे. माझा हिंदू धर्माचा प्रचंड अभ्यास आहे, त्यामुळे मी हिंदू धर्मावर खूप बोलू शकते असं सांगतानाच ज्या ठिकाणी माझ्या धर्माचा प्रश्न येतो त्यावेळी मला माझ्या धर्माची बाजू घेऊनच बोलावं लागेल, असं त्यांनी सांगितलं.

एखाद्या पक्षाची प्रतिमा काय आहे हे महत्वाचं नाही. तो पक्ष जनतेसाठी काय करतो हे महत्त्वाचं आहे. त्यावर सर्व काही अवलंबून आहे. ठाकरे सरकारला एक वर्ष पूर्ण झालं आहे. या सरकारने कोणत्याही एका धर्माचं लांगूलचालन केलं नाही. त्यांनी सर्वांना समान न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. यातच सर्व काही आलंय, असंही त्या म्हणाल्या. (actress urmila matondkar reaction on trolls)

 

संबंधित बातम्या:

उर्मिला मातोंडकरांच्या प्रवेशाने शिवसेनेच्या महिला आघाडीच्या रणरागिणींचे अवमूल्यन; दरेकरांची शिवसेनेवर टीका

उर्मिला मातोंडकर महाराष्ट्रासाठी चांगलं काम करतील; आदित्य ठाकरेंनी दिल्या शुभेच्छा

उद्धव ठाकरेंकडे सरकारची, तर रश्मी वहिनींकडे शिवसेनेची सूत्रं, उर्मिलाच्या प्रवेशानंतर पुन्हा अधोरेखित

(actress urmila matondkar reaction on trolls)