झिशान सिद्धीकींच्या निवडीनंतर सुनेत्रा पवारांच्या NCPला मुंबईत मोठा धक्का, बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदी झिशान सिद्धीकी यांची नियुक्ती झाल्यानंतर पक्षातील नाराजी समोर आली आहे. मुंबई कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळे यांनी पद सोडण्याचा निर्णय घेतला असून, सोशल मीडियावरील पोस्टमधून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. नेमकं काय म्हणाले कांबळे?

झिशान सिद्धीकींच्या निवडीनंतर सुनेत्रा पवारांच्या NCPला मुंबईत मोठा धक्का, बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा
मुंबईत एनसीपीच्या मोठ्या नेत्याचा राजीनामा
Image Credit source: social media
| Updated on: Oct 28, 2026 | 8:05 PM

एक मोठी बातमी समोर आली आहे. झिशान सिद्धीकी यांची राष्ट्रवादीच्या मुंबई अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. पण झिशान सिद्धीकी यांच्या निवडीमुळे पक्षामध्ये मोठी नाराजी पाहायला मिळते आहे. या निर्णयामुळे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी नाराज झाले आहेत. मुंबई कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळे यांनी थेट राजीनामाच दिला आहे. पदावर असो वा नसो यापुढेही आप पक्षाचे एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून काम करु, असं सिद्धार्थ कांबळेंनी म्हटलं आहे. त्यामुळे झिशान सिद्धीकी यांच्या या निवडीवर पक्षातील इतर पदाधिकारी नाराज झाल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते मुंबई येथील देवगिरी निवासस्थानी आमदार झिशान सिद्दिकी यांची मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. दरम्यान ही निवड समोर आल्यानंतर सिद्धार्थ कांबळे यांनी मुंबई कार्याध्यक्ष पदाच्या जबाबदारीतून मुक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.

Loading...

सोशल मीडियावर मांडली भूमिका

साथ सुटली दादांची , पण विचार अजून जिवंत आहे, पद सोडले जरी, तरी निष्ठेचा दिवा अखंड तेवत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली गेली २७ वर्षे काम करता आले. या प्रदीर्घ प्रवासात दादांनी नेहमीच लढण्याचे बळ आणि पाठबळ दिले. दुर्दैवाने ९ महिन्यांपूर्वी दादांचे निधन झाले आणि तेव्हापासून आम्हाला खऱ्या अर्थाने पोरकेपणाची जाणीव होत आहे. दादांच्या पश्चात पक्षाची धुरा आदरणीय सुनेत्रा वहिनी अतिशय ताकदीने आणि संयमाने सांभाळत आहेत. हे करत असताना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांची त्यांना भक्कम साथ मिळत आहे. वरिष्ठ नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही देखील मुंबईत तितक्याच ताकदीने काम करत आहोत.

नुकताच मुंबई अध्यक्षपदाच्या निवडीचा विषय समोर आला आहे. पक्ष चालवताना आदरणीय वहिनींना अनेकवेळा कठोर आणि मनाविरुद्ध निर्णय घ्यावे लागतात, याची मला पूर्ण जाणीव आहे. वहिनींनी घेतलेल्या निर्णयाचा मी मनापासून आदर करतो. मात्र, बऱ्याच विचारांती मी माझ्यावर सोपवण्यात आलेल्या मुंबई कार्याध्यक्ष पदाच्या जबाबदारीतून मुक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.

आदरणीय अजित दादांनी आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेबांनी माझ्यावर जी जबाबदारी सोपवली होती, ती मी गेल्या अडीच वर्षात प्रामाणिकपणे, निष्ठेने व तन,मन व धनानी पार पाडण्याचा प्रयत्न केला आहे. पदावर असो वा नसो, पुढेही पक्षाचा एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून आदरणीय सुनेत्रा वहिनीं व आदरणीय सुनील तटकरेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखालीच काम करत राहीन, असं सिध्दार्थ कांबळे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us