AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Special Story | पाऊस अन् सोसाट्याचा वारा, हत्तीवर बसून ‘बेलची’ला निघाल्या, इंदिरा गांधींचा असा दौरा ज्याने राजकारण बदलून टाकलं

इंदिरा गांधींभोवती असणारी लोकांची, नेत्यांची गर्दीसुद्धा कमी होत होती. या गोष्टी घडत असताना इंदिरा गांधी मात्र शांत होत्या. जनता सरकार कधी एकदा कात्रीत सापडेल याची त्या वाट पाहत होत्या. विशेष म्हणजे फक्त चारच महिण्यांनी म्हणजेच जुलै 1977 मध्ये बिहारमध्ये मोठी घटना घडली.

Special Story | पाऊस अन् सोसाट्याचा वारा, हत्तीवर बसून 'बेलची'ला निघाल्या, इंदिरा गांधींचा असा दौरा ज्याने राजकारण बदलून टाकलं
indira gandhi belachi visit
| Edited By: | Updated on: Oct 20, 2021 | 9:25 AM
Share

मुंबई : बलात्कार, दंगे, अत्याचार वाढले की विरोधक आक्रमक होतात. ते सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारायला लागतात. याच गोष्टींवरुन रान पेटवतात. हाथरस बलात्कार प्रकरण, लखीमपूर खेरी हत्याकांड ही त्याची काही उदाहरणं.  राहुल आणि प्रियंका गांधी यांच्या लखीमपूर खेरी दौऱ्याची तर चांगलीच चर्चा झाली. प्रियंका गांधी दुसऱ्या इंदिरा गांधी असल्याचं नेहमीप्रमाणं म्हटलं गेलं. प्रियंका गांधींना पोलिसांनी ताब्यात घेतलं. पण अडचणी, संकटांवर मात करून त्या लखीमपूर खेरीला गेल्याच. असाच एक किस्सा इंदिरा गांधी यांच्याबाबतीतही घडला होता. सत्ता गेल्यानंतर इंदिरा गांधी यांनी बिहारमधील बेलची या भागाला दिलेली भेट चांगलीच विशेष ठरली होती. या भेटीनंतर देशात राजकीय गणितं बदलली होती.

सत्ता गेली, चौकशीचा ससेमिरा!

20 मार्च 1977 ला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला. या निवडणुकीत राजनारायण यांनी इंदिरा गांधी यांना हरवलं होतं. 22 मार्च 1977 रोजी त्यांनी पंतप्रधानपदाचा राजीना दिला. इंदिरा हरल्या हेच मुळात न पचणारं होतं. पण त्यांच्या हातातून सत्ता गेली होती. जनता सरकार सत्तेत आलं होतं. पंतप्रधानपदी मोरारजी देसाई विराजमान झाले होते. त्यानंतर इंदिरा गांधी यांच्यामागे शाह आयोग तसेच इतर तपास संस्थांच्या माध्यमातून चौकशांचा ससेमीरा लावण्यात आला.

जवळचे परके झाले, इंदिरा एकाकी!

इंदिरा गांधी निवडणूक हरण्यामागं अनेक कारणे होती. जनतेवर लादलेल्या आणीबाणीमुळेच त्यांना हा फटका बसला होता हे उघड होतं. वृत्तपत्रांवरील सेन्सॉरशीप, अधिकारांचा संकोच तसेच पुरुषांची जबरदस्तीने केलेली नसबंदी अशा कारणांमुळे जनसामान्यांत रोष होता. एकीकडे इंदिरा गांधी यांच्यावर जनता प्रचंड नाराज होती. तर दुसरीकडे सत्ता गेल्यामुळे जवळची माणसंसुद्धा त्यांच्यापासून दूर जात होती. काँग्रेसमधील नेतेमंडळीसुद्धा आणीबाणीतील वाईट अनुभवांबद्दल बोलायला लागली होती. संजय गांधी यांच्यावर उघडपणे टीका केली जात होती. इंदिरा गांधी पंतप्रधानपदी होत्या तेव्हाच्या सर्व सोयीसुविधा हळूहळू काढून घेतल्या जाऊ लागल्या. भांडीकुंडी, एअर कंडिशनर्स, रेफ्रिजिरेटर, बागकाम करणारे नोकर असं सगळं काही काढून घेतलं जाऊ लागलं.

बिहारच्या बेलचीमध्ये दलितांना जिवंत जाळलं

इंदिरा गांधींभोवती असणारी लोकांची, नेत्यांची गर्दीसुद्धा कमी होत होती. या गोष्टी घडत असताना इंदिरा गांधी मात्र शांत होत्या. जनता सरकार कधी एकदा कात्रीत सापडेल याची त्या वाट पाहत होत्या. विशेष म्हणजे फक्त चारच महिण्यांनी म्हणजेच जुलै 1977 मध्ये बिहारमध्ये मोठी घटना घडली. इथं बेलची नावाच्या छोट्या गावात दलितांवर अमानुषपणे अत्याचार करण्यात आला. दलितांची कत्तल करुन त्यांची प्रेतं भडकत्या आगीत फेकून देण्यात आली. यामध्ये दोन लहान मुलंदेखील होती.

इंदिरा म्हणाल्या, ‘बेलचीला जाणारच!’

ही घटना संपूर्ण भारतभर पोहोचायला वेळ लागला. कारण तेव्हा आजच्यासारखी प्रगत माध्यमं नव्हती. दलितांची कत्तल झाल्यानंतर तीन दिवसांनी याच्या बातम्या वर्तमानपत्रात झळकल्या. त्यावेळचे काँग्रेसचे नेते यशवंतराव चव्हाण बेलचीला भेट देण्याचं नियोजन आखत होते. पण त्याआधीच इंदिरा बेलचीला रवाना झाल्या होत्या.

इंदिरा यांची ही बेलची भेट अतिशय थरारक, विशेष आणि त्यांच्यात नवचैतन्य निर्माण करणारी ठरली. इंदिरा गांधी बेलचीला निघाल्या तेव्हा या भागात मुसळधार पाऊस पडत होता. नद्यांना पूर आला होता. बेलचीकडे जाणारे सारे रस्ते वाहून गेले होते. तरीही त्या जीपने बेलचीकडे निघाल्या. नंतर ही जीप चिखलात फसली. जीपला बाहेर काढण्यासाटी नंतर ट्रॅक्टरची मदत घेण्यात आरी. पण पाऊस वाढल्यामुळे ट्रॅक्टरही चिखलात रुतून बसले.

इंदिरा गांधी भर पावसात निघाल्या!

एकीकडे पाऊस, वारा वाढत चालला होता आणि दुसरीकडे काहीही झालं तरी बेलचीला जाणारच असा निश्चय इंदिरा गांधींनी केला होता. मुसळधार पावसामुळे गाडी, ट्रॅक्टर असं सगळंच चिखलात फसलं होतं. त्यानंतर इंदिरा नदीच्या काठापर्यंत चालत गेल्या. भर पावसात चालत जाणं इतरांना जीवावर आलं होतं. पण खुद्द् इंदिराच हार मानायला तयार नसल्यामुळे इतर कार्यकर्त्यांनादेखील चुपचाप इंदिरा गांधींच्या मागे चालावं लागलं.

हत्तीवर बसून नदी पार केली!

इंदिरा गांधी तसेच इतर कार्यकर्ते नदीवर पोहोचले. नदीच्या पलीकडे बेलची गाव होते. पण या भागात सोसाट्याचा वारा सुटला होता. नदी पार करणं अशक्य झालं होतं. तर दुसरीकडे नदीच्या काठावर होडीदेखील नव्हती. इंदिरा गांधींच्या आजूबाजूला जमा झालेले लोक पुढे जाऊ नका अशी विनवणी करत होते. पण मी जाणारच असा निर्धान इंदिरा गांधी यांनी केला होता. पायी चालत जाऊन नदी पार करणे शक्य नव्हते. होडीदेखील नव्हती. मग नेमकं काय करावं हा सर्वांनाच प्रश्न पडला. शेवटी बाजूच्या खेड्यातील मोती नावाचा हत्ती आणण्यात आला. याच हत्तीवर बसून इंदिरा गांधींनी नदी पार केली. इंदिरा गांधी यांच्या पाठीमागे प्रतिभा सिंग पाटील होत्या. ज्या पुढे देशाच्या राष्ट्रपती झाल्या. सुरुवातीला इंदिरा यांच्यासोबत 500 लोक होते. नदी पार केल्यानंतर त्यांच्यासोबत फक्त प्रतिभा पाटील होत्या.

परत येताना होडी बुडाली!

छातीभर खोल पाण्यातून जात इंदिरा गांधींनी हत्तीवर बसून नदी पार केली. त्यांच्या पाठीमागे बसलेल्या प्रतिभा पाटील यांनी इंदिरा गांधींची साडी गच्च पकडली होती. इंदिरा बेलची गावात गेल्या तोपर्यंत अंधार झाला होता. ज्या ठिकाणी दलितांची हत्या करण्यात आली तेथे इंदिरा गेल्या. या हल्ल्यात वाचलेल्या लोकांची त्यांनी भेट घेतली. वृद्ध स्त्री-पुरुष, तरुण विधवा, छोटी मुलांची इंदिरा गांधींनी विचारपूस केली. विशेष म्हणजे परत येतानाही इंदिरा गांधी यांच्यासमोर अनेक संकटं आली. इंदिरा ज्या होडीत बसल्या होत्या ती मध्येच पाण्यात बुडाली. होडी बुडाल्यानंतर इंदिरा यांना अर्ध्या पाण्यातून चालत चालत वाट काढावी लागली होती.

बेलची भेट नवसंजीवनी ठरली!

इंदिरा गांधींच्या या बेलची दौऱ्याची नंतर देश विदेशात चर्चा झाली. बेलची भेटीनंतर इंदिरा गांधी यांच्यात नवा उत्साह संचारला होता. दिल्लीला परतताच त्यांनी वाराणसीचा दौरा करण्याचं ठरवलं होतं. इंदिरा गांधींनी नंतर जनता सरकारला चांगलंच घेरलं होतं. राजकारणात पुन्हा सक्रिय होऊन जनतेच्या मनात आपलं स्थान पुन्हा निर्माण केलं होतं. त्यानंतर पुढच्या लोकसभा निवडणुकीत काय झालं हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. इंदिरा गांधी पुन्हा पंतप्रधान झाल्या होत्या.

इतर बातम्या :

Special story | स्वातंत्र्यलढ्याच्या धगीत प्रेमाचे धुमारे, इंदिरा-फिरोझ यांची अनोखी प्रेमकहाणी

(dalit brutally killed in bihar belachi in 1977 indira gandhi visit to belachi in heavy rain sitting on elephant)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.