‘डाकिणींच्या मंदिरा’ चे गूढ … अंधार पडल्यावर फिरतं कोण? अनेकांची भीतीने गाळण… कुणाला चक्कर तर…

Chausath Yogini Temple in Odisha: ओडिसा राज्यातील या जिल्ह्यात डाकिणींचे मंदिर आहे. या मंदिरात संध्याकाळनंतर गर्दी ओसरायला सुरुवात होते, तर थोड्याच वेळात हा भाग निर्मनुष्य होतो. कोण असतं त्या मंदिरात, का उडते भीतीने गाळण?

डाकिणींच्या मंदिरा चे गूढ ... अंधार पडल्यावर फिरतं कोण? अनेकांची भीतीने गाळण... कुणाला चक्कर तर...
'डाकिणींच्या मंदिरा' चे गूढ
Image Credit source: एजन्सी
| Updated on: Jun 09, 2026 | 4:29 PM

Chausath Yogini Temple in Odisha: ओडिसाची राजधानी भुवनेश्वरपासून जवळपास 20 किलोमीटर दूरवर हिरापूर येथे चौसष्ठ योगिनी मंदिर आहे. हे चौसष्ठ योगिनी मंदिर देशातील चार शाबूत असलेल्या अशा प्रकारच्या मंदिरांपैकी एक आहे. तांत्रिक साधनेसाठी हे मंदिर बांधण्यात आल्याचा दावा करण्यात येतो. विशेष म्हणजे हे मंदिर कोणार्क येथील जगप्रसिद्ध सूर्यमंदिरा पूर्वी बांधलेले असल्याचा दावा आहे. चार चौसष्ठ योगिनीच्या मंदिरांपैकी एक ओडिसा राज्यातील बोलांगीर जिल्ह्यात येते. तर उर्वरीत दोन हे मध्य प्रदेशात आहेत. या ठिकाणी देवीची 64 योगिनी रुपे आहेत.

महामाया देवीचे स्थान

या पवित्र ठिकाणची मुख्य देवी महामाया आहे. तिला योगिनींपैकी एक मानले जाते. या मंदिराला महामाया मंदिर असेही म्हणतात. या मंदिरात रोज सर्व धार्मिक विधी तर होतातच पण भूमंडळ पूजा खास मानली जाते. पंच तत्त्व जल, आकाश, अग्नी, पृथ्वी आणि इथर यांचे ते प्रतिक मानतात. योगिनी परंपरेत योगासोबतच तंत्र साधनेचा समावेश आहे. तांत्रिक आणि आदिवासींच्या पूजेत याला अधिक महत्त्व आहे.

हिरापूर परिसरात हे मंदिर

ओडिसाची राजधानी भुवनेश्वरपासून 20 किमी अंतरावर हिरापूर येथे हे मंदिर आहे. येथे संध्याकाळ होताच लोकांची गर्दी पांगते. येथे संध्याकाळी आणि रात्री कोणीही थांबू नये असा दंडक आहे. महामाया मंदिराजवळच एक तलाव आहे. तिथे ही जाण्यास मनाई करण्यात येते. या मंदिरात शिरताना तुम्हाला मात्र अशी कोणतीही भीती जाणवणार नाही. हे एक देवींच्या विविध रुपांचे एक मंदिर दिसते. या मंदिराची भिंत अवघी आठ फुटांची आहे. या मंदिरावर कोणतेही छत नाही. हे मंदिर निळ्या आकाशाखाली विसावलेले आहे. तरीही इथे लोक थांबण्यास घाबरतात.

डाकिणींचे मंदिर

स्थानिक लोक या मंदिराला डाकिणींचे मंदिर म्हणतात. देशातील अनोख्या तांत्रिक मंदिरांपैकी हे एक आहे. पण संध्याकाळी इथे अनामिक भीती आणि हुरहुर जाणवते. जीवाची घालमेल होते. काहींना मळमळल्यासारखे वाटते. त्यामुळे लोक इथे थांबत नाही. या गावातील लोक, इतर भाविकांना संध्याकाळी मंदिर परिसरात जाण्यापासून थांबवतात अथवा दुसऱ्या दिवशी सकाळी येण्यास सांगतात. या मंदिरात संध्याकाळी कोण येते हे मात्र गावकरी सांगत नाहीत.

चौसष्ठ योगिनींचे मंदिर हे कोणार्क येथील सूर्य मंदिरापेक्षा जुने असल्याचा दावा करण्यात येतो. कोणार्क येथून 40 किलोमीटर अंतरावर आहे. चौसष्ठ योगिनींचे मंदिर हे इसवी सन 9 व्या शतकात बांधल्याचा अंदाज आहे. भौमकार राजवंशाची राणी हिरादेवी यांनी हे मंदिर बांधल्याचे गावकरी सांगतात. त्यांच्याच नावावरून या गावाचे नाव हिरापूर पडले आहे. अनेक वर्षे येथे तांत्रिक अनुष्ठान करण्यात येत असल्याचा गावकऱ्यांचा दावा आहे. पण तरूणांचा त्यावर विश्वास नाही.

डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल टीव्ही ९ मराठी कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us