Dhanteras : आज धनत्रयोदशी धन, समृद्धी, आरोग्याचा सण, मग का आणि कसे करतात पूजा
Dhanteras Puja Vidhi And Muhurat: धनत्रयोदशीच्या दिवशी म्हणजे धन, समृद्धी आणि आरोग्याचा सण आहे... पण कशी करतात धनत्रयोदशीची पूजा... जाणून घ्या कशी कराल पूजा आणि मुहूर्त किती आहे.

Dhanteras Puja Vidhi And Muhurat: दिवाळीच्या दिवसांत धनत्रयोदशीला देखील फार मोठं महत्त्व आहे. धनत्रयोदशीला धन, समृद्धी आणि आरोग्याचा सण मानला जातो. सांगायचं झालं तर, धनत्रयोदशी हा दिवाळीतील अतिशय शुभ दिवस मानला जातो. या दिवशी भगवान धन्वंतरी, माता लक्ष्मी, भगवान कुबेर आणि यमदेव यांची पूजा केली जाते. घरात सुख, समृद्धी, आरोग्य आणि धनधान्य नांदावे, यासाठी ही पूजा केली जाते. तर जाणून घ्या आजच्या दिवशी पूजा कशी करायची आणि मुहूर्त जाणून घ्या…
पूजेची तयारी कशी कराल…
सर्वात आधी सकाळी लवकर उठून स्नान करा. त्यानंतर घराची आणि देवघराची स्वच्छता कराणं फार गरजेचं आहे. देवघरात रांगोळी काढल्यानंतर शोभा वाढते आणि त्याला धार्मिक महत्त्व आहे. पूजेच्या ठिकाणी लाल किंवा पिवळं वस्त्र अंथरावं. भगवान धन्वंतरी, माता लक्ष्मी आणि कुबेर यांचे फोटो किंवा मूर्ती ठेवाव्यात.
पूजेसाठी लागणारे साहित्य
हळद, कुंकू, अक्षता, फुले आणि हार, अगरबत्ती, धूप, कापूर, तुपाचे दिवे, नारळ, सुपारी, पान, फळे आणि मिठाई, पंचामृत नवीन भांडे किंवा चांदीचे नाणे
कशी कराल पूजा
सर्वप्रथम गणपती बाप्पाचे स्मरण करून पूजा सुरू करावी. त्यानंतर कलशाची स्थापना करावी. भगवान धन्वंतरी यांना हळद, कुंकू, फुले अर्पण करावीत. माता लक्ष्मीला कमळ किंवा इतर फुले अर्पण करावीत. कुबेर देवाला अक्षता आणि फुले वाहावीत. धूप, दीप लावून नैवेद्य दाखवावा. त्यानंतर लक्ष्मीची आरती आणि धन्वंतरी स्तोत्र म्हणावे.
पौराणिक कथेनुसार समुद्रमंथनाच्या वेळी भगवान धन्वंतरी अमृतकलश घेऊन प्रकट झाले. भगवान धन्वंतरी यांना आयुर्वेदाचं जनक आणि आरोग्याचे देवता मानलं जातं. त्यामुळे त्यांची पूजा करून आपण प्रार्थना करतो… घरातील सर्वांना उत्तम आरोग्य लाभावे. रोगराई दूर व्हावी. दीर्घायुष्य लाभावे. निरोगी आणि आनंदी जीवन मिळावे… अशी प्रार्थना केली जाते.
धनत्रयोदशी 2026 शुभ मुहूर्त
अनेक जण पूजा करतात पण पूजा मुहूर्तावर होणं फार गरजेचं असतं. दिलेल्या पंचांगविषयक माहितीनुसार, धनत्रयोदशीच्या पूजेचा मुहूर्त जाणून घ्या… धनत्रयोदशी पूजा मुहूर्त संध्याकाळी 7:08 ते 8:16 करावी. पूजेचा कालावधी फक्त 1 तास 8 मिनिटं… यमदीपदानाची वेळ संध्याकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत आहे.
(डिस्क्लेमर: सदर लेखातील माहिती केवळ ज्योतिषशास्त्रीय गृहीतके आणि उपलब्ध माहितीवर आधारित आहे. आम्ही यातील तथ्यांची किंवा दाव्यांची पुष्टी करत नाही. अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही.)