Diwali Padwa 2026 : दिवाळी पाडवा का साजरा करतात? नवरा-बायकोच्या नात्याशी जोडलेली खास परंपरा,प्रथा आणि महत्त्व….
नवरा बायकोच्या नात्याचा सण म्हणजे दिपावली पाडवा. बायको नवऱ्याला ओवाळते आणि नवरा बायकोला तिच्या आवडीची वस्तू किंवा सरप्राईझ देतो. पण तुम्हाला माहित आहे की हा सण का साजरा करतात? यामागे काय प्रथा आहे? चला सांगते

यंदा ५ तारखेपासून दिवाळी सुरू झाली. वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन हे सण संपन्न झाले सुद्धा. या सगळ्यात नवरा बायकोच्या नात्याचा एक प्रेमळ सण सुद्धा आहे, तो म्हणजे दिपावली पाडवा. या दिवशी बायको नवऱ्याला ओवाळते आणि नवरा बायकोला तिच्या आवडीची वस्तू किंवा सरप्राईझ देतो. या सणामुळे नवरा बायकोच्या नात्यातील गोडवा आणखी वाढतो. पण तुम्हाला माहित आहे की हा सण का साजरा करतात? यामागे काय प्रथा आहे? चला सांगते
दिपावली पाडवा हा नवरा बायकोच्या नात्याचा सण कार्तिक शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो. महाराष्ट्रात या दिवसाला विशेष महत्त्व आहे. पती पत्नीच्या नात्यातील प्रेम आणि सहजीवनाचा उत्सव म्हणून हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी पत्नी पतीला पाटावर बसवून त्याचे औक्षण करते. कुंकू हळद, अक्षता लावून नवऱ्याला ओवाळते. त्याच्या उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, आणि सुख समृद्धी साठी प्रार्थना करते.
औक्षण करण्यामागे धार्मिक श्रद्धाही जोडलेली आहे. हिंदू परंपरेत औक्षण हा शुभ आणि मंगल विधी मानला जातो. आपल्या नवऱ्याच्या आयुष्यतील संकट दूर व्हावीत, त्याचं कल्याण व्हावं, त्याला दीर्घायुष्य लाभावं. या भावनेतून हा विधी केला जातो. या ओवाळणीतून पत्नी पतीचं औक्षण करून प्रेम आणि काळजी व्यक्त करते. त्यानंतर पती पत्नीला भेटवस्तू देऊन तिच्याबद्दलही आदर आणि प्रेम व्यक्त करतो
दिवाळी पाडव्याच्या दिवशी बालिप्रतिपदा हा सण देखील साजरा केला जातो. या दिवसामागे राजा बळी आणि भगवान विष्णू यांच्या वामन अवताराची पौराणिक कथा सांगितली जाते. कथेनुसार राजा बळी हा दानशूर आणि पराक्रमी होता. त्याच्या सामर्थ्यामुळे तिन्ही लोकांवर त्याचं वर्चस्व निर्माण झालं होतं. तेव्हा भगवान विष्णू यांनी वामन अवतार धारण करून बळीकडे तीन पावलं जमीनं मागितली. बळीने वचन दिल्यानंतर वामनाने विराट रूप धारण केल. दोन पावलांत पृथ्वी आणि स्वर्ग व्यापला तिसरं पाऊल ठेवण्यासाठी जागा मिळाली नाही तेव्हा बळीने आपले मस्तक पुढे केले.त्याच्या दानशूरपणावर प्रसन्न होऊन भगवान विष्णूंनी त्याला पाताळलोकांचं राज्य दिलं आणि वर्षातून एकदा पृथ्वीवर येण्याचं वरदान दिलं, त्यातीलच हा एक दिवस. त्यामुळे या दिवसाला बालिप्रतिपदा म्हटलं जातं.
दिपावली पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त मानला जातो. त्यामुळे नवीन व्यवसाय सुरू करणे, खरेदी करणे आणि महत्त्वाच्या कामाची सुरूवात करण्यासाठी हा दिवस शुभ मानला जातो. व्यापारी वर्गात हिशेबाच्या वह्यांचं पूजन करून नव्या आर्थिक वर्षांची सुरूवात करण्याची परंपराही आहे.
थोडक्यात काय तर दिपावली पाडवा हा केवळ औक्षण आणि भेटवस्तूंचा दिवस नाही तर पती पत्नीने एकमेकांना समजून घ्यावं, एकमेकांच्या सुख दुखात साथ द्यावी आणि नात्यातील प्रेम व विश्वास जपावा हा या परंपरेमागचा मुख्य उद्देश आहे.