
शारदीय नवरात्र 22 सप्टेंबर रोजी सुरू झाले आहेत. या नऊ दिवसांत लोक देवी दुर्गाची पूजा करतात आणि नऊ दिवसांचे उपवास करतात. काहीचे फार कडक व्रत असते तर काहीजण फलहार घेऊन उपवास करतात. उपवास म्हणजे फक्त अन्न वर्ज्य करणे असे नाही. या दिवसांत शुद्ध, सात्त्विक अन्न सेवन केले जाते, तसेच मन आणि कृती शुद्ध ठेवल्या जातात. मन शांत ठेवण्यासाठी आणि दुर्गाच्या उपासनेत स्वतःला समर्पित करण्यासाठी हलके, सात्त्विक, फळांवर आधारित जेवण करणे आवश्यक असते. अन्न वर्ज्य करण्यासोबतच, नऊ दिवसांच्या उपवासात अनेक प्रकारच्या भाज्या देखील निषिद्ध मानल्या जातात.
उपवासात या भाज्या खाणे टाळले पाहिजे
जर तुम्ही दिवसभर उपवास करून रात्री सोडत असाल तर उपवास सोडण्यासाठी, तसेच नैवद्यासाठी देखील या भाज्या कधीही करू नका.अन्यथा उपवास मोडू शकतो म्हणजे तो धरलाच जाणार नाही असे म्हटले जाते. चला जाणून घेऊयात त्या कोणत्या भाज्या आहेत त्या.
लसूण-कांदा
लसूण आणि कांद्यामध्ये तामसिक गुण असल्याचे मानले जाते. म्हणूनच, धार्मिक समारंभात लसूण आणि कांदे खाण्यास नेहमीच मनाई आहे. त्यामुळे नवरात्रात देखील या लसूण कांद्यापासून बनवलेल्या भाज्या उपवास सोडण्यासाठी खाऊ नका.
वांगी
वांगी हा शुद्ध आहार मानला जात नाही, म्हणून उपवास करताना वांगी खाण्यास पूर्णपणे मनाई असते. त्यामुळे उपवास सोडण्यासाठी वांग्याची भाजी कधीही करू नका.
कोबी आणि संबंधित भाज्या
कोबीला एक विशिष्ट वास असतो, म्हणूनच ती भाजी तसेच, त्याच्याशी संबंधित भाज्या जसे की फुलकोबी, ब्रोकोली आणि लाल कोबी अशा भाज्या खाणे टाळल्या पाहिजे.
मुळा
मुळ्याला देखील एक उग्र वास असतो. त्यामुळे नवरात्रीच्या उपवासात ती खाण्यास मनाई केली जाते.
वाटाणे
नवरात्रीत वाटाणे आणि चवळी सारख्या शेंगा खाल्ल्या जात नाहीत. त्याचप्रमाणे मक्याला धान्य मानले जाते. म्हणून, उपवासाच्या वेळी मका खाण्यासही मनाई असते.
कॅप्सिकम आणि भेंडी
भेंडी आणि शिमला मिरचीचा वासही तीव्र असतो, म्हणूनच उपवासाच्या वेळीही या भाज्या खाणे टाळल्या पाहिजे.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
आरोग्याबाबत कारण: तसेच आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर दिवसभऱ तुम्ही उपवास करून या भाज्यांनी उपवास सोडला तर नक्कीच तुमचे पोट बिघडू शकते. तुम्हाला त्रास होऊ शकतो. कारण या सर्व भाज्या उष्ण, तामसी असतात. त्यामुळे शक्यतो उपवासामध्ये हलका आहार घेणेच गरजेचं आहे.