कुंडलीत पितृदोष आहे? पितृपक्षात करा ‘हे’ उपाय; मिळेल पितरांचा आशीर्वाद
Pitru Paksha 2026: पितृपक्षात केले जाणारे धार्मिक विधी पूर्वजांच्या स्मरणाशी जोडलेले आहेत. कुंडलीत पितृदोष असल्यास या काळात काही विशेष उपाय करण्याची परंपरा आहे. हे उपाय नेमके कोणते, जाणून घ्या.

पितृपक्षाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. हा काळ पूर्वजांचे स्मरण, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांच्या शांतीसाठी विविध धार्मिक विधी करण्याचा मानला जातो. या काळात श्राद्ध, तर्पण आणि पिंडदानासोबत दानधर्म करण्याचीही परंपरा आहे. कुंडलीत पितृदोष असल्यास पितृपक्षात काही विशेष धार्मिक उपाय केले जातात, अशी मान्यता आहे. या काळात पूर्वजांचे स्मरण करून श्रद्धेने विधी केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळतो, असेही मानले जाते. पितृदोषासाठी कोणते उपाय सांगितले आहेत आणि ते कशा पद्धतीने केले जातात, जाणून घेऊया.
तर्पणासाठी दक्षिण दिशेला तोंड करावे
पितृपक्षात पितरांना तर्पण अर्पण करण्याची परंपरा आहे. यासाठी दक्षिण दिशेकडे तोंड करून बसले जाते. तांब्याच्या पात्रात पाणी घेऊन त्यात काळे तीळ, जव, फुले, साखरेचे दाणे आणि तांदूळ मिसळले जातात. पितरांचे स्मरण करून श्रद्धेने हे जल अर्पण केले जाते. शक्य असल्यास गया किंवा हरिद्वार येथे जाऊन तर्पण करण्याचेही महत्त्व आहे.
पिंपळाच्या झाडाची पूजा करावी
पितृदोषासाठी पितृपक्षात पिंपळाच्या झाडाची पूजा करण्याचीही परंपरा आहे. विशेषतः अमावस्या आणि शनिवारी पिंपळाला कच्चे दूध आणि काळे तीळ अर्पण केले जातात. पितरांचे स्मरण करून त्यांच्या शांतीसाठी प्रार्थना केली जाते.
गाय, कुत्रा आणि कावळ्याला अन्न द्यावे
पितृपक्षात आपल्या जेवणातील काही भाग गाय, कुत्रा आणि कावळ्यासाठी काढून ठेवण्याची पद्धत आहे. तसेच गरीब आणि गरजू व्यक्तींना आपल्या क्षमतेनुसार अन्न किंवा आवश्यक वस्तूंचे दान करण्याचे महत्त्व सांगितले जाते.
मंत्रजप आणि गीतेचे पठण
या काळात ‘ॐ पितृभ्य नमः’ या मंत्राचा जप करण्याची परंपरा आहे. यासोबत श्रीमद् भगवद् गीतेच्या सातव्या अध्यायाचे पठण करण्यासही महत्त्व दिले जाते. पितरांचे स्मरण करून त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना केली जाते.
पिंडदानाचीही परंपरा
पिंडदानासाठी शिजवलेले तांदूळ, तीळ आणि दूध एकत्र करून पिंड तयार केला जातो. हा पिंड श्रद्धेने पूर्वजांना अर्पण केला जातो. त्यानंतर गाय, कुत्रा, कावळा आणि देवांसाठी भोजनाचा काही भाग काढला जातो. ब्राह्मणांना सात्त्विक भोजन देऊन दक्षिणा देण्याचीही परंपरा आहे. हे सर्व विधी धार्मिक श्रद्धा आणि कुटुंबाच्या परंपरेनुसार केले जातात.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
