Pitru Paksha 2026: तर्पण की पिंडदान? पितृपक्षात विधी करण्यापूर्वी जाणून घ्या दोन्हीतील फरक
प्रत्यक्षात तर्पण आणि पिंडदान हे वेगवेगळे धार्मिक विधी असून त्यांची पद्धत आणि महत्त्वही वेगळे आहे. तुम्हालाही या दोन्ही विधींमध्ये नेमका काय फरक आहे, याबाबत संभ्रम असेल, तर तो जाणून घ्या.

Tarpan and Pind Daan: पितृपक्षात पितरांच्या स्मरणार्थ तर्पण, पिंडदान आणि श्राद्ध कर्म केले जाते. अनेकदा तर्पण आणि पिंडदान हे एकच असल्याचे मानले जाते. मात्र, हे दोन्ही वेगवेगळे धार्मिक विधी असून त्यांची पद्धत आणि महत्त्वही वेगळे आहे. जाणून घ्या तर्पण आणि पिंडदानामधील नेमका फरक. पितृपक्षाला सुरुवात झाली की, पूर्वजांच्या स्मरणार्थ श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान करण्याची परंपरा आहे. पितरांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या काळात विविध धार्मिक विधी केले जातात. यंदा पितृपक्षाला 26 सप्टेंबरपासून सुरुवात झाली असून 10 ऑक्टोबरला सर्वपित्री अमावस्येला त्याची सांगता होणार आहे. या काळात पितरांच्या स्मरणार्थ तर्पण आणि पिंडदान करण्याला विशेष महत्त्व असल्याचे धार्मिक मान्यतेत सांगितले जाते. मात्र, हे दोन्ही विधी नेमके कसे केले जातात आणि त्यांचा उद्देश काय आहे, याबाबत अनेकांना माहिती नसते. श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान हे एकच असल्याचा अनेकांचा समज असतो.
तर्पण आणि पिंडदानात काय फरक?
पितृ तर्पणामध्ये जल आणि काळ्या तिळांना विशेष महत्त्व असते, तर पिंडदानामध्ये तांदूळ किंवा पीठ, तूप आणि मधापासून तयार केलेल्या पिंडाला महत्त्व असते. तर्पणामध्ये जल अर्पण करून पितरांना तृप्त केले जाते, अशी धार्मिक मान्यता आहे. तर पिंडदान हे पिंडाच्या स्वरूपात पितरांसाठी तृप्ती आणि मोक्षाचा मार्ग प्रशस्त करणारे कर्म मानले जाते.
तर्पण म्हणजे काय?
‘तर्पण’ हा शब्द ‘तृप्’ या संस्कृत धातूपासून तयार झाला असून त्याचा अर्थ तृप्त करणे किंवा संतुष्ट करणे असा होतो. तर्पणामध्ये जल अर्पण केले जाते. यासाठी कुशा, काळे तीळ, जौ आणि अक्षत म्हणजेच तांदळाचा वापर केला जातो. अंजलीमध्ये जल घेऊन ते पितर, देवता आणि ऋषींना अर्पण करण्याची पद्धत आहे. धार्मिक मान्यतेनुसार, दिवंगत पूर्वजांच्या आत्म्याला तृप्त करण्यासाठी तर्पण केले जाते.
पिंडदान म्हणजे काय?
पिंडदान म्हणजे पिंडाचे दान किंवा अर्पण करणे. तांदूळ, जौ किंवा पीठापासून पिंड तयार केले जातात. यामध्ये दूध, दही, तूप, मध आणि तीळ मिसळले जातात. त्यानंतर हे पिंड पितरांना अर्पण केले जातात. धार्मिक मान्यतेनुसार, पिंडदान हे मृत पूर्वजांच्या सद्गती आणि मोक्षासाठी केले जाणारे महत्त्वाचे कर्म मानले जाते.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
