
हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला अत्यंत पवित्र मानलं जातं. श्रावण महिना हा देवांचे देव महादेवांना समर्पित आहे. शास्त्रानुसार श्रावण महिन्यामध्ये महादेवांची भक्तीभावानं पूजा केल्यास त्यांचा आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी राहातो. श्रावण महिन्यामध्ये दररोज सकाळी अंघोळ करून महादेवांना जल अर्पण करणं शुभ मानलं जातं, शास्त्रानुसार श्रावण महिन्यात दररोज महादेवांना जल अर्पण करून त्यांची प्रार्थना करावी, त्यामुळे तुमच्यावर महादेवांची कृपा राहाते.
श्रावण महिन्यातील सोमवारला विशेष महत्त्व असते. अनेक जण या दिवशी महादेवांची पूजा करून उपवास आणि व्रत करतात. हिंदू धर्मशास्त्रानुसार अशी काही फूलं आहेत, जी या दिवशी महादेवांना अर्पण केल्यास महादेव प्रसन्न होतात. ही फूलं महादेवांना खूपच प्रिय असल्याचं मानलं जातं, अशाच काही फूलांबाबत आपण आज माहिती घेणार आहोत.
कन्हेराचं फूल – श्रावणामध्ये येणाऱ्या सोमवारी कन्हेराचं फूल महादेवांना अर्पण करावं, हे फूल महादेवांना प्रिय आहे. तुम्ही जर सोमवारी महादेवांना कन्हेराचं फूल अर्पण केलं तर महादेवांची सदैव तुमच्यावर कृपा राहाते. भगवान भोलेनाथ तुमच्यावर प्रसन्न राहातात. हे फूल काहीसं पांढर आणि लाल रंगाचं असतं
शमीचं फूल – महादेवांना काही फूलं हे अत्यंत प्रिय आहेत, त्यातीलच एक म्हणजे शमीचं फूल आहे, असं म्हणतात की जर श्रावणातील सोमवारी महादेवांना शमीचं फूल वाहिलं तर आयुष्यातील सर्व कष्ट दूर होतील, तुमच्या आयुष्यात सुख शांती येईल. भोलेनाथांचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल.
रुईचं फूल – महादेवांना श्रावण महिन्यातील सोमवारी रुईचं फूल देखील वाहिलं जातं. हे फूल देखील भोलेनाथांना अत्यंत प्रिय आहे. यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व कष्ट दूर होतात, अशी मान्यता आहे.
धोतऱ्याचं फूल – महादेवांना धोतऱ्याचं फूल देखील प्रिय आहे. श्रावण महिन्यातील सोमवारी अनेकजण महादेवांना हे फूल अर्पण करतात. यामुळे मन शांत होतं, सर्व कष्ट दूर होतात अशी मान्यता आहे.