सचिन, कांबळीही देव मानायचे… गँगस्टर भावामुळे भयानक घडलं अन् करियर संपलं… मुंबईचा असा खेळाडू ज्याला विव्ह रिचर्ड म्हटलं जायचं? हालाखीत मृत्यू

अनिल गुरव, सचिन-विनोदचे गुरु आणि मुंबईचे 'व्हिव्ह रिचर्ड्स', वयाच्या 61 व्या वर्षी निधन झाले. ते अत्यंत प्रतिभावान खेळाडू होते, ज्यांना रमाकांत आचरेकर सरही सचिन-विनोदला आदर्श म्हणून दाखवायचे. दुर्दैवाने, गँगस्टर भावामुळे त्यांना क्रिकेट सोडावे लागले आणि त्यांचे चमकणारे करियर अकाली संपुष्टात आले, एकांतवासात त्यांचा दुःखद अंत झाला.

सचिन, कांबळीही देव मानायचे... गँगस्टर भावामुळे भयानक घडलं अन् करियर संपलं... मुंबईचा असा खेळाडू ज्याला विव्ह रिचर्ड म्हटलं जायचं? हालाखीत मृत्यू
Anil Gurav
| Updated on: Apr 02, 2026 | 2:19 PM

अनिल गुरव गेले… 31 मार्च 2026 रोजी अनिल गुरव यांनी वयाच्या 61 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. अत्यंत प्रतिभावंत खेळाडू, महान खेळाडूंचे सर्व कसब अंगी असलेला शापित खेळाडू म्हणून अनिल यांच्याकडे पाहिले जाते. शिवाजी पार्कचं मैदान गाजवणारा हा अवलिया. सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळीही त्यांना देव मानायचे. एकदा विनोद कांबळी म्हणाला होता, आचरेकर सरांनी कधीच सचिन आणि माझ्या कोणत्याच खेळीचं कौतुक केलं नाही. पण हेच रमाकांत आचरेकर अनिलची बॅटिंग बघण्यासाठी स्वत: सचिन आणि विनोदला घेऊन जायचे. अनिल कसा खेळतोय याचं निरीक्षण करायला सांगायचे. यावरून अनिल गुरव किती प्रतिभावंत असेल याची कल्पना येते.

द्रोणाचार्य पुरस्कार विजेते कोच रमाकांत आचरेकर यांच्या शिष्यांपैकी अनिल गुरव हे एक होते. आचरेकर सरांचा सर्वात उत्कृष्ट आणि जवळचा शिष्य म्हणजे अनिल. पण नशिबाने त्यांना कधी साथ दिली नाही. अनिल क्लबस्तरावरील क्रिकेटच्या पलिकडे जाऊ शकले नाही. मुंबई टीम आणि भारतीय संघात खेळू शकले नाही. आयुष्यात काही घटना घडल्या आणि त्यांना क्रिकेटपासून दूर जावं लागलं. इतकं की अनिल एकांतवासात राहू लागले. या एकांतवासातच मंगळवारी नालासोपऱ्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

तुफान खेळी…

तुफान खेळी करण्यासाठी अनिल गुरव प्रसिद्ध होते. म्हणूनच त्यांना मुंबईचा व्हिव्हियन रिचर्ड्स म्हटलं जायचं. अनिल गुरव हे सचिन आणि विनोदपेक्षा सीनिअर होते. सचिन तेंडुलकरपेक्षाही अनिल चांगलं खेळायचे. सचिन आणि विनोदने जेव्हा क्रिकेट खेळायला सुरुवात केली तेव्हा आचरेकर सर या दोघांनाही अनिल यांची फलंदाजी पाहण्यासाठी मैदानावर घेऊन जायचे.

सर्वात लाडका शिष्य

अनिल यांच्या निधनावर एमसीएचे क्युरेटर आणि नगरसेवक नदीम मेमन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आचरेकर सर सचिन आणि इतर खेळाडूंना नेटमध्ये अनिल गुरवची फलंदाजी पाहायला सांगायचे. ज्यांच्याकडून खूप काही शिकल्या जाऊ शकत होतं, असे अनिल गुरव होते. आचरेकर सरांच्या सर्वात आवडत्या शिष्यांपैकी ते एक होते. त्यांचे मित्र त्यांना मुंबईचा व्हिव्हियन रिचर्ड्स म्हणायचे. त्यांचा स्क्वायर कट व्हिव्हियन सारखा होता म्हणून नव्हे तर लेग साईडलाही अनिल गुरव तितकीच शानदार फलंदाजी करायचे म्हणूनच त्यांना व्हिव्हियन रिचर्ड्स म्हटलं जायचं. शिवाय ते दिसायलाही रिचर्ड्स सारखे होते.

सचिनला बॅट दिली अन्…

प्रचंड प्रतिभा असूनही मुंबई किंवा भारतीय संघासाठी अनिल गुरव खेळू शकले नाही. अंडर 16 आणि अंडर 19 पर्यंतच्या संघातच ते खेळले. त्यांनी आचरेकर सरांच्या ‘ससानियन क्रिकेट क्लब’ आणि ‘कामत मेमोरियल’चंही प्रतिनिधीत्व केलं. शालेय जीवनात अनिल गुरव यांनी सचिन तेंडुलकरला आपली बॅट दिली होती. सचिनची हीच बॅट मैदानात तळपली होती. त्याने याच बॅटमधून धावांचा पाऊस पाडत पहिलंवहिलं शतक झळकावलं होतं, असं सांगितलं जातं.

भावामुळे बरबाद…

अनिलचा भाऊ अजित हा गुन्हेगारी जगतात होता. त्यामुळे सतत पोलीस येऊन त्रास द्यायचे. अनिल त्याच्या भावासारखाच दिसायचा. त्यामुळे एकदा पोलिसांनी अजित समजून अनिललाच उचललं आणि त्याला बेदम मारलं. त्यामुळे अनिल इतका कोलमडला की तो पुन्हा उभा राहिलाच नाही. तो नंतर मैदानावर दिसलाच नाही. त्यामुळे एका प्रतिभावंत खेळाडूची अखेर झाली

Follow Us