वन डे मालिकेत मायदेशात ऑस्ट्रेलियाकडून भारताचा दहा वर्षांनंतर पहिल्यांदाच पराभव

| Updated on: Jul 05, 2019 | 4:17 PM

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील फिरोजशाह कोटला मैदानावर खेळवण्यात आलेल्या निर्णायक वन डे सामन्यात भारताचा 35 धावांनी पराभव झाला. पाच सामन्यांच्या मालिकेत भारताला 2-3 ने पराभव स्वीकारावा लागला. मायदेशात ऑस्ट्रेलियाकडून भारताचा दहा वर्षांनंतर पहिल्यांदाच पराभव झालाय. गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला कमी धावात रोखलं. पण भारतीय फलंदाज मोठी खेळी करण्यात पूर्णपणे अपयशी ठरले. ऑस्ट्रेलियाने भारताला विजयासाठी 273 धावांचं […]

वन डे मालिकेत मायदेशात ऑस्ट्रेलियाकडून भारताचा दहा वर्षांनंतर पहिल्यांदाच पराभव
Follow us on

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील फिरोजशाह कोटला मैदानावर खेळवण्यात आलेल्या निर्णायक वन डे सामन्यात भारताचा 35 धावांनी पराभव झाला. पाच सामन्यांच्या मालिकेत भारताला 2-3 ने पराभव स्वीकारावा लागला. मायदेशात ऑस्ट्रेलियाकडून भारताचा दहा वर्षांनंतर पहिल्यांदाच पराभव झालाय. गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला कमी धावात रोखलं. पण भारतीय फलंदाज मोठी खेळी करण्यात पूर्णपणे अपयशी ठरले.

ऑस्ट्रेलियाने भारताला विजयासाठी 273 धावांचं आव्हान दिलं होतं. पण हे आव्हान पार करताना भारतीय फलंदाजांची दाणादाण उडाली. सलामीला आलेला शिखर धवन केवळ 12 धावा करुन बाद झाला. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा फलंदाज विराट कोहली 20 धावांवर बाद झाला. एकीकडून रोहित शर्माने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. रोहितने 89 चेंडूत अत्यंत संथपणे 56 धावा केल्या आणि तो माघारी परतला.

रिषभ पंतला पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यात अपयश आलं. तो केवळ 16 धावांवर बाद झाला. रवींद्र जाडेजाकडून अपेक्षा होती. पण तो शून्यावरच बाद झाला. केदार जाधव (44) आणि भुवनेश्वर कुमार (46) यांनी चांगली भागीदारी केली. भारताच्या विजयाची आशा दिसत असतानाच भुवनेश्वर कुमार बाद झाला. त्याच्या पुढच्याच षटकात केदार जाधवही माघारी परतला आणि विजयाची आशा मावळली.

ऑस्ट्रेलियाने रांची वन डेतही भारताने दिलेलं साडे तीनशे पेक्षा जास्त धावांचं आव्हान पार करत विजय मिळवला होता. या वन डेतही उस्मान ख्वाजाच्या शतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 272 धावा केल्या. शिवाय ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनीही भारतीय फलंदाजांना फार काळ खेळपट्टीवर टिकू दिलं नाही. पॅट कमिन्स, झे रिचर्ड्सन आणि मार्कस स्टॉईनिस यांनी प्रत्येकी दोन, तर अडम झम्पाने तीन आणि नाथन लायनने एक विकेट घेतली.

टीम इंडियाचा अनुभवी यष्टीरक्षक खेळाडू महेंद्रसिंह धोनीला अखेरच्या दोन वन डे सामन्यांसाठी आराम देण्यात आला होता. पण धोनीला बाहेर ठेवणं भारतीय संघाला चांगलंच महागात पडलंय. धोनीच्या अनुपस्थितीत रिषभ पंतने अनेक चुका केल्या, ज्याचा परिणाम भारताला भोगावा लागला. त्यामुळे प्रत्येक चाहत्याला धोनीच्या अनुपस्थितीची जाणीव होत होती.

आगामी विश्वचषकापूर्वी भारताची ही अखेरची मालिका होती. त्यामुळे या मालिकेला विशेष महत्त्व होतं. वन डे मालिकेअगोदर टी-20 मालिकेतही भारताचा ऑस्ट्रेलियाने पराभव केला होता. आता आयपीएल आणि त्यानंतर इंग्लंडमध्ये भारतीय संघ विश्वचषक खेळणार आहे.