CWG 2022: स्मृती मांधनाचा जबरदस्त खेळ, भारताचा पाकिस्तानवर मोठा विजय

| Updated on: Jul 31, 2022 | 6:53 PM

कॉमनवेल्थ गेम्सच्या इतिहासात पहिल्यांदाच भारत आणि पाकिस्तानचे महिला संघ आमने-सामने आले होते. यंदा कॉमनवेल्थ मध्ये महिला टी 20 क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. भारताने या मॅच मध्ये पाकिस्तानवर 8 विकेट राखून दणदणीत विजय मिळवला.

CWG 2022: स्मृती मांधनाचा जबरदस्त खेळ, भारताचा पाकिस्तानवर मोठा विजय
ind vs pak
Follow us on

मुंबई: कॉमनवेल्थ गेम्सच्या इतिहासात पहिल्यांदाच भारत आणि पाकिस्तानचे महिला संघ आमने-सामने आले होते. यंदा कॉमनवेल्थ मध्ये महिला टी 20 क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. भारताने या मॅच मध्ये पाकिस्तानवर 8 विकेट राखून दणदणीत विजय मिळवला. पाकिस्तानने विजयासाठी दिलेले 100 धावांचे लक्ष्य भारताने दोन विकेट गमावून 11.4 षटकात पार केलं. भारताकडून स्मृती मांधनाने आक्रमक सुरुवात केली. या विजयामुळे भारताने कॉमनवेल्थ मध्ये पदकाच्या दिशेने आणखी एक भक्कम पाऊल टाकलं आहे. स्मृती मांधनाने आज तुफान फलंदाजी केली तिने 42 चेंडूत नाबाद 63 धावा चोपल्या. यात 8 चौकार आणि 3 षटकार आहेत. भारताने फक्त 2 विकेट गमावल्या. शेफाली वर्मा (16) आणि मेघना (7) बाद झाल्या.

पाकिस्तानी फलंदाजांना खेळपट्टीवर स्थिरावू दिलं नाही

पाकिस्तानची कॅप्टन बिस्माह मारुफने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. पण भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानच्या फलंदाजांना मैदानावर स्थिरावू दिले नाही. पावसामुळे हा सामना 20 ऐवजी 18 षटकांचा करण्यात आला होता. पाकिस्तानची टीम निर्धारित 18 ओव्हर्स मध्ये 99 धावांवर ऑलआऊट झाली. पाकिस्तानकडून फक्त सलामीवीर मुनीबा अलीने 30 चेंडूत सर्वाधिक 32 धावा केल्या. कॅप्टन बिस्माह मारुफने (17) धावा केल्या. पाकिस्तानचे अन्य फलंदाज अपयशी ठरले. इरम जावेदच्या रुपाने शुन्यावर पाकिस्तानची पहिली विकेट गेली. त्यानंतर मुनीबा आणि मारुफने डाव सावरला. दोघींनी 50 धावांची भागीदारी केली. त्यानंतर भारताची गोलंदाज स्नेह राणाने मारुफने 17 धावांवर पायचीत पकडलं. त्यानंतर पाकिस्तानच्या डावाची घसरण सुरु झाली. पाकिस्तानचा डाव 99 धावात आटोपला. भारताकडून स्नेह राणा, राधा यादवन प्रत्येकी दोन, तर रेणुका सिंह, मेघना सिंह आणि शेफाली वर्माने प्रत्येकी एक विकेट घेतला.

पावसामुळे सामन्याला विलंब

दरम्यान पावसामुळे आज सामन्याला विलंब झाला. पावसामुळे वेळ वाया गेल्याने सामना 20 ऐवजी 18-18 षटकांचा खेळवण्यात आला. भारत आणि पाकिस्तानचे संघ कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये आज आमने-सामने होते. दोन्ही संघांनी आपला सलामीचा सामना गमावला होता. भारताला पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून आणि पाकिस्तानला बार्बाडोसकडून पराभव स्वीकारावा लागला होता. दोन्ही संघांसाठी आज विजय आवश्यक होता. भारत-पाकिस्तान सामना सुरु होण्याआधी हवामान बिघडलं होतं.