जेम्स अँडरसनचा इंग्लंड क्रिकेटशी असलेला ‘बॉण्ड’ संपला, क्रिकेटच्या पंढरीत रंगला विजयी निरोप सोहळा

इंग्लंडने वेस्ट इंडिजवर एक डाव आणि 114 धावांनी विजय मिळवला. या विजयासह इंग्लंडच्या आणि क्रिकेटच्या एका सुवर्णकाळाचा शेवट झाला आहे. वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. निवृत्तीच्या सामन्यात त्याने एकूण चार गडी बाद केले हे विशेष..

जेम्स अँडरसनचा इंग्लंड क्रिकेटशी असलेला बॉण्ड संपला, क्रिकेटच्या पंढरीत रंगला विजयी निरोप सोहळा
Image Credit source: ICC
| Updated on: Jul 12, 2024 | 5:08 PM

लॉर्ड्सवर रंगलेला इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज हा कसोटी सामना सर्वार्थाने महत्त्वाचा ठरला. या सामन्यात प्रमुख गोष्ट होती ती म्हणजे जेम्स अँडरसन याची निवृत्ती..जेम्स अँडरसनने आपल्या 21 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दित अनेक विक्रमांना गवसणी घातली. त्याच्या असण्याने इंग्लंड संघाला बळ मिळायचं. त्यामुळेच जेम्स अँडरसन सचिन तेंडुलकरनंतर सर्वाधिक कसोटी सामने खेळणारा क्रिकेटपटू ठरला आहे. 188 कसोटी खेळत जेम्स अँडरसनने क्रिकेटला रामराम ठोकला आहे. 2003 साली जेम्स अँडरसन पहिला कसोटी सामना झिम्बाब्वे विरुद्ध खेळला होता. त्यानंतर आता 2024 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटचा सामना खेळला. हे दोन्ही सामने विशेष म्हणजे लॉर्ड्सवर झाले होते आणि दोन्ही सामन्यात विजय मिळवला होता. जेम्स अँडरसनने आपल्या कसोटी कारकिर्दित एकूण 188 सामने खेळला. यात त्याने 704 विकेट्स घेतले. त्याचा इकोनॉमी रेड 2.79 इतका आहे. त्याने 32 वेळा पाच गडी, 3 वेळा 10 गडी बाद करण्याचा विक्रम केला आहे. 700 हून अधिक विकेट घेणारा जगातील पहिला वेगवान गोलंदाज ठरला आहे. तर सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. मुथय्या मुरलीधरन पहिल्या, तर शेन वॉर्न दुसऱ्या क्रमांकावर आहे.

दरम्यान, इंग्लंडने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात वेस्ट इंडिजचा संपूर्ण संघ 121 धावांवर बाद झाला. तर इंग्लंडने पहिल्या डावात 250 धावांची भक्कम आघाडी घेतली. त्यामुळे ही आघाडी मोडून विजयी धावा देणं काही वेस्ट इंडिजला जमलं नाही. वेस्ट इंडिजने दुसऱ्या डावात 136 धावा केल्या आणि एक डाव आणि 114 धावांनी पराभव सहन करावा लागला. या सामन्यात गस एटकिन्सने एकूण 12 गडी बाद केले. तर जेम्स अँडरसनने शेवटच्या सामन्यात 4 गडी बाद करत आपल्या गोलंदाजीची धार दाखवून दिली.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

वेस्ट इंडीज (प्लेइंग इलेव्हन): क्रेग ब्रॅथवेट (कर्णधार), मिकाइल लुईस, किर्क मॅकेन्झी, ॲलिक अथनाझे, कावेम हॉज, जोशुआ दा सिल्वा (विकेटकीपर), जेसन होल्डर, गुडाकेश मोटी, अल्झारी जोसेफ, शामर जोसेफ, जयडेन सील्स.

इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (विकेटकीपर), ख्रिस वोक्स, गस ऍटकिन्सन, शोएब बशीर, जेम्स अँडरसन.