
मुंबई: प्रोफेशनल स्तरावर क्रिकेट (Cricket) खेळणाऱ्यांमध्ये तुम्हाला उच्चशिक्षित क्रिकेटपटू फार कमी सापडतील. कारण करीयर म्हणून क्रिकेटची निवड करताना अनेकदा शिक्षणाकडे दुर्लक्ष होतं. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंमध्ये तुम्हाला उच्चशिक्षित क्रिकेटपटू कमी दिसतील. आज भारतीय संघातून क्रिकेट खेळणाऱ्या अनेक प्लेयर्सचं शिक्षण (Education) फार नाहीय. पण क्रिकेटमध्ये ते यशस्वी आहेत. क्रिकेट हा खेळच असा आहे, की करीयर म्हणून त्याची निवड करताना, अन्य गोष्टींवर पाणी सोडावं लागतं. पण 35 वर्षाची भारतीय वंशाची एक महिला क्रिकेटपटू याला अपवाद आहे. ती भारतात नाही, चक्क सातासमुद्रापार जर्मनीमध्ये क्रिकेट खेळतेय. अनुराधा डोडाबल्लापुर (Anuradha Doddaballapur) असं या महिला क्रिकेटपटूचं नाव आहे. अनुराधा 35 वर्षांची आहे. अभिमानास्पद बाब म्हणजे, ती जर्मनीच्या महिला क्रिकेट संघाची कॅप्टन आहे. महत्त्वाचं म्हणजे अनुराधा पेशाने वैज्ञानिक आहे.
35 वर्षांची अनुराधा डोडाबल्लापुर बंगळुरुशी संबंधित आहे. ती जर्मनीच्या महिला क्रिकेट संघाकडून खेळते. तिने आंतरराष्ट्रीय करीयरमध्ये आतापर्यंत तिने 18 टी 20 सामने खेळले आहेत. 15 डावात 233 धावा तिच्या नावावर आहेत. या दरम्यान अनुराधाने 19 विकेटही काढल्यात. एक रन्स देऊन 5 विकेट ही तिची गोलंदाजीतली सर्वोत्तम कामगिरी आहे.
वर्ष 2020 मध्ये अनुराधा डोडाबल्लापुरने ऑस्ट्रिया विरुद्धच्या सामन्यात 1 रन्स देऊन 5 विकेट काढल्या होत्या. त्याचवेळी तिने चार चेंडूत 4 विकेटही काढल्या होत्या. यात 3 फलंदाजांना तिने बोल्ड केलं होतं. महिलांच्या आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमध्ये चार चेंडूत 4 विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये अनुराधा डोडाबल्लापुरचं नाव आहे.
महिलांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जर्मनीच नाव उंचावणारी अनुराधा भारतात बंगळुरुशी संबंधित आहे. सर्वसामान्य भारतीय मुलांप्रमाणे टीव्ही वर क्रिकेट सामने पाहून, गल्ली क्रिकेट खेळूनच अनुराधाची क्रिकेटबद्दलची रुची वाढली. अंडर 19 लेवलवर तिने कर्नाटकाचे प्रतिनिधीत्वही केलं आहे.
क्रिकेट खेळताना तिने अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही. बंगळुरुच्या एका कॉलेजमधून इंजीनियरिंगची डिग्री घेतल्यानंतर ती यूकेला निघून गेली. मेडिकल जेनेटिक्समध्ये तिने मास्टर्स केलं. यूके मध्ये असतानाही ती क्रिकेटचा सराव करायची. तिने क्लब आणि काऊंटी क्रिकेट सामने खेळले आहेत.
2011 साली फ्रँकफर्ट कार्डियोनवास्कुलर बायोलॉजीमध्ये PHD करण्यासाठी गेल्यानंतर खऱ्याअर्थाने अनुराधाच्या क्रिकेट करीयरला दिशा मिळाली. फ्रँकफर्ट क्रिकेट क्लबशी ती संबंधित होती. त्यावेळी फ्रँकफर्टमध्ये महिलांसाठी कुठलाही क्रिकेट क्लब नव्हता. 2013 साली अनुराधा जर्मनीच्या क्रिकेट संघाकडून पहिल्यांदा खेळली. 2017 साली ती या संघाची कॅप्टन बनली. अनुराधा ह्दयाची शास्त्रज्ञ आहे.