
मुंबई : कसोटी मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात सुरु आहे. ही मालिका ऑस्ट्रेलियाने 2-0 ने जिंकली आहे. त्यामुळे तिसरा सामना औपचारिक आणि पाकिस्तानला लाज राखण्यासाठी महत्त्वाचा आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकत पाकिस्तानने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानची सुरुवात निराशाजनक राहिली. अवघ्या 4 धावा असताना 2 गडी बाद झाले. त्यानंतर कर्णधार मसूद आणि बाबर आझमने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण या जोडीलाही हवं तसं यश मिळालं नाही. संघाच्या 39 धावा असताना बाबर आझम 26 धावा करून बाद झाला. त्यानंतर सउद शकीलही काही खास करू शकला नाही आणि 5 करून तंबूत परतला. मसूदही फार काळ खेळपट्टीवर तग धरू शकला नाही. 35 धावांवर खेळत असताना मिचेल मार्शने त्याला तंबूचा रस्ता दाखवला. 96 वर 5 गडी बाद अशी स्थिती पाकिस्तानची होती. तेव्हा मोहम्मद रिझवान आणि अघा सलमान जबरदस्त झुंज दिली.
रिझवान आणि आघाने सहाव्या गड्यासाठी 94 धावांची भागीदारी केली. रिझवान 88 धावा करून कमिन्सच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर आघाने धावसंख्येत भर घातली. त्याला साजिद खानची साथ मिळाली. पण धावांवर असताना कमिन्सच्या गोलंदाजीवर बाद झाला. आता 250 पल्ला गाठणंही कठीण आहे असं वाटत होतं. पण तळाशी आलेल्या आमेर जमालने जबरदस्त खेळी केली. त्याने 97 चेंडूत 82 धावा केल्या. धावसंख्या 300 च्या पार नेली. पाकिस्तानचा संपूर्ण संघ पहिल्या दिवशी 313 धावा करून बाद झाला.
ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सनं सर्वाधिक 5 गडी बाद केले. तर मिचेल स्टार्कने 2, हेझलवूडने 1, नाथन लियॉनने 1 आणि मिचेल मार्शने एक गडी बाद केला. पाकिस्तानने पहिल्या डावात दिलेल्या धावांचं आव्हान गाठण्यासाठी डेविड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजा ही जोडी मैदानात उतरली. पण फक्त एका षटकाचा खेळ झाला. ऑस्ट्रेलियाने दिवसअखेर बिनबाद 6 धावा केल्या आहे. डेविड वॉर्नरने सहा चेंडूंचा सामना केला.
ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): डेविड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स (कर्णधार), नाथन लियॉन, जोश हेझलवूड
पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन): अब्दुल्ला शफीक, सैम अयुब, शान मसूद (कर्णधार), बाबर आझम, सऊद शकील, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), आघा सलमान, आमेर जमाल, साजिद खान, हसन अली, मीर हमजा