
आयसीसीची चॅम्पियन ट्रॉफी 2025 पुढील वर्षी होणार आहे. यासाठी प्रत्येक टीमने आतापासूनच तयारी सुरू केलीये. मात्र आता प्रत्येक टीममध्ये मोठे बदल पाहायला मिळणार आहेत. वन डे वर्ल्ड कप 2023 आणि टी-20 वर्ल्ड कप 2024 नंतर अनेक खेळाडूंनी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केलेली. या खेळाडूंमध्ये मोठ्या आणि दिग्गज खेळाडूंचाही समावेश आहे. वर्ल्ड कप जिंकल्यावर टीम इंडियाच्या रोहित शर्मा, विराट कोहली आणि रविंद्र जडेजा यांनी निवृत्ती जाहीर केली होती. अशातच एका दिग्गज खेळाडूने आपली टीमला गरज असेल तर खेळण्यासाठी आपण तयार असल्याचं सांंगितलं. मात्र निवड समितीने यासाठी त्याला स्पष्ट नकारच दिला आहे.
पुढील वर्षी आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीसाठी पाकिस्तानमध्ये होणार आहे. यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या टीमचाही समावेश असून एका निवृत्त खेळाडूने आपण खेळण्यासाठी तयार असल्याचं म्हटलं होतं. मात्र अप्रत्यक्षपणे नाव न घेता निवड समितीने त्याला लांबूनच रामराम केल्यासारखं आहे. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून डेव्हिड वॉर्नर आहे. डेव्हिड वॉर्नर याने आता क्रिकेटच्या तिनही फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. मात्र त्याने आपण गरज असेल तर खेळण्यासाठी इच्छुक असल्याने तो परत एकदा मैदानात दिसणार याची चाहत्यांना आशा लागलेली होती.
डेव्हिड वॉर्नर आता निवृत्त झाला असून आम्ही चॅम्पियनसाठी त्याचा विचार करत नाही. व्हाईटबॉल क्रिकेटमध्ये इतर खेळाडूंना म्हणावी अशी संधी मिळत नाहीये. आम्ही आता भविष्याचा करत असून त्याप्रमाणे योजना आखत असल्याचं ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीमचे निवडकर्ते जॉर्ज बेली यांनी सांगितलं.
ऑस्ट्रेलियाने स्कॉटलंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी कूपर कॉनोली आणि जेक फ्रेझर-मॅकगर्क यांना टीममध्ये स्थान दिलं आहे. मिचेल स्टार्क आणि ग्लेन मॅक्सवेल यांना विश्रांती देण्यात आली आहे. मॅथ्यू वेड याला मात्र डच्चू देण्यात आला असून तो लवकरच निवृत्ती जाहीर करण्याची दाट शक्यता आहे. यावरून एक दिसून येतं की ऑस्ट्रेलियाने T-20 वर्ल्ड कप 2026 ची आतापासूनच तयारी सुरू केली आहे.