न्यूझीलंड, द अफ्रिकेने भारताला कसोटीत मात दिल्यानंतर ऑस्ट्रेलियाची अहंकाराची भाषा, असा घेतला निर्णय
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. पुढच्या वर्षी जून महिन्यात अंतिम सामना खेळला जाणार आहे. यासाठी आता जोरदार रस्सीखेच सुरू आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेच्या अंतिम फेरीत जागा मिळवण्यासाठी आता जोरदार रस्सीखेच सुरू आहे. या स्पर्धेची अंतिम लढत 9 ते 13 जून 2027 दरम्यान लंडनमधील ‘द ओव्हल’ मैदानावर खेळवली जाणार आहे. ऑस्ट्रेलिया, दक्षिण अफ्रिका, न्यूझीलंड, बांग्लादेश, भारत आणि श्रीलंका यांच्यात टॉप 2 मध्ये जागा मिळवण्यासाठी चुरस आहे. यापैकी ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत 8 सामने खेळले असून सात सामन्यात विजय आणि एक सामना ड्रॉ करून अव्वल स्थान पटकावलं आहे. त्यामुळे त्याचं टॉप 2 मधील स्थान पक्कं मानलं जात आहे. पुढच्या वर्षीच्या सुरूवातीला बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया भारतात येणार आहे. पाच सामन्यांची कसोटी भारतासाठी खूपच महत्त्वाची आहे. पण या मालिकेपूर्वीच ऑस्ट्रेलियाची अहंकाराची भाषा सुरू झाली आहे.
ऑस्ट्रेलियाने बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेपूर्वी सराव सामना खेळण्यास नकार दिला आहे. भारताविरूद्धच्या मालिकेपूर्वी सराव सामना न खेळण्याचा निर्णय आश्चर्यकार आहे. ऑस्ट्रेलियाचे हेड कोच अँड्र्यूज मॅकडोनाल्ड यांनी खुलासा केला की, आमचा संघ भारतात होणाऱ्या 2027 बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेपूर्वी कोणताही सराव सामना खेळणार नाही. या उलट आम्ही भारतातील परिस्थितीनुसार एक मोठं प्रॅक्टिस सेशन करू.
भारतात 57 वर्षात पहिल्यांदाच बॉर्डर गावस्कर कसोटी मालिका पाच सामन्यांची खेळवली जाणार आहे. भारताने श्रीलंका आणि न्यूझीलंडविरुद्ध चांगली कामगिरी केली तर ही मालिका खूपच महत्त्वाची असणार आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाने 2004-2005 नंतर भारतात एकही कसोटी मालिका जिंकलेली नाही. क्रिकेट डॉट कॉम एयूला दिलेल्या मुलाखतीत मॅक्डॉनल्ड म्हणाले की, भारताच्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी पूर्ण वेळ आहे.
भारतात ऑस्ट्रेलियाची कसोटी कामगिरी
ऑस्ट्रेलिया भारतात आतापर्यंत 54 कसोटी सामने खेळली आहे. त्यापैकी फक्त 14 सामन्यात विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाने भारतात शेवटची कसोटी मालिका 2004 मध्ये जिंकली होती. 2008 मध्ये भारताने 2-0 ने, 2010 मध्ये 2-0 ने, 2012-13मध्ये 4-0 ने, 2016-17 मध्ये 2-1 ने आणि 2023 मध्ये 2-1 ने पराभूत केलं होतं.
भारत श्रीलंकेविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेत 2-0 ने विजय मिळवला तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या आशा जिवंत राहतील. अन्यथा गणित खूपच कठीण असणार आहे.