BCCI कडून WPL 2027 ऑक्शनची खेळाडू यादी जाहीर! 27 स्लॉटसाठी 146 जणींमध्ये चुरस; कोणावर लागणार मोठी बोली?
BCCI Announces WPL 2027 Auction List: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आगामी महिला प्रीमियर लीग २०२७ च्या खेळाडू लिलावासाठी खेळाडूंची यादी जाहीर केली. २८ ऑक्टोबर रोजी कोची येथे लिलाव होणार आहे.

महिला प्रीमियर लीग २०२७ च्या मिनी लिलावासाठी मंच सज्ज झाला आहे. २८ ऑक्टोबर रोजी कोची येथे होणाऱ्या या लिलावासाठी एकूण १४६ महिला क्रिकेटपटूंची निवड करण्यात आली आहे. पाच फ्रँचायझी एकूण २७ रिक्त जागा भरण्यासाठी स्पर्धा करतील. लिलावाच्या यादीत भारतीय यष्टीरक्षक-फलंदाज जी. कमलिनी, अष्टपैलू स्नेह राणा, ऑस्ट्रेलियन कर्णधार सोफी मोलिन्यू आणि श्रीलंकन कर्णधार चमारी अटापट्टू यांसारख्या अनेक प्रमुख आंतरराष्ट्रीय नावांचा समावेश आहे.
महिला प्रीमियर लीग २०२७ च्या लिलावासाठी शॉर्टलिस्ट केलेल्या १४६ खेळाडूंमध्ये २२ आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या भारतीय, १४ आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या परदेशी, ९७ आंतरराष्ट्रीय सामने न खेळलेल्या भारतीय आणि १३ आंतरराष्ट्रीय सामने न खेळलेल्या परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. यावेळी खेळाडूंसाठी सर्वोच्च मूळ किंमत ५० लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे, तर उर्वरित श्रेणींसाठी किंमत अनुक्रमे ४० लाख रुपये, ३० लाख रुपये, २० लाख रुपये आणि १० लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे.
🚨 News 🚨
#TATAWPLAuction 2027 Player List announced!
The player auction will see 146 players competing for 27 available slots 📝
📍 Kochi ⏰ October 28, 5.30 PM IST
🔽 More details | #TATAWPL
https://t.co/GKfyOO1Kar
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) October 19, 2026
लिलावातील सर्वात महागड्या ५० लाख रुपयांच्या गटात केवळ दोन परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने करारमुक्त केलेली ऑस्ट्रेलियन कर्णधार सोफी मॉलिन्यू आणि इंग्लंडची स्फोटक फलंदाज सोफिया डंकली यांचा या यादीत समावेश आहे. सोफिया डंकलीने यापूर्वी २०२४ मध्ये गुजरात जायंट्ससोबत करार केला होता. ४० लाख रुपयांच्या मूळ किंमतीच्या गटात भारतीय आणि ऑस्ट्रेलियन स्टार खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळेल.
मुंबई इंडियन्सने करारमुक्त केलेली आक्रमक यष्टीरक्षक-फलंदाज जी. कमलिनी ४० लाखांच्या गटात आहे. भारताची पॉवर-हिटर किरण नवगिरे आणि ऑस्ट्रेलियाची अनुभवी अष्टपैलू जोडी जेस जोनासेन व हेदर ग्रॅहम यांचाही या गटात समावेश आहे. ₹३० लाख श्रेणीमध्ये फ्रँचायझी दोन अनुभवी आणि सामना जिंकून देणाऱ्या खेळाडूंच्या शोधात असतील.
भारतीय ऑफ-स्पिन अष्टपैलू स्नेह राणा आणि दिल्ली कॅपिटल्सने करारमुक्त केलेला श्रीलंकेचा कर्णधार चमारी अटापट्टू यांचा या विभागात समावेश आहे. याव्यतिरिक्त, ₹२० लाख आणि ₹१० लाख श्रेणींमध्ये देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण न केलेल्या प्रतिभावान खेळाडूंचा मोठा ओघ असेल, ज्याद्वारे संघ आपली राखीव खेळाडूंची ताकद वाढवण्याचा प्रयत्न करतील.
