
भारतीय क्रिकेटसंघाचा ‘गब्बर’ अर्थात भारतीय क्रिकेटपटू शिखर धवनने क्रिकेटला अलविदा केलं आहे. आता तो आंतरराष्ट्रीय सामने खेळताना दिसणार नाही. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत शिखरने याबाबतची माहिती दिली आहे. माझ्या क्रिकेट प्रवासाचा हा अध्याय संपवतोय. यावेळी मी माझ्या मनात असंख्य आठवणी दाटून आल्या आहेत. मी कृतज्ञ आहे. लोकांनी दिलेलं प्रेम आणि सपोर्टसाठी मी आभारी राहिन, सगळ्यांचे धन्यवाद, अशी पोस्ट शिखरने शेअर केलीय. शिखरच्या या पोस्टवर त्याच्या चाहत्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. तुझी क्रिकेट खेळण्याची शैली कायम प्रभावित करत राहिली, अशी कमेंट त्याच्या चाहत्यांनी केली आहे.
शिखर धवन याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने त्याच्या निवृत्तीची घोषणा केली आहे. यावेळी तो भावनिक झाला आहे. सगळ्यांना नमस्कार, आज मी अशा ठिकाणी उभा आहे, जिथून वळून मागे पाहिल्यानंतर फक्त आठवणी दिसतात आणि पुढे पाहिल्यावर संपूर्ण जग… माझं आधापासून एकच स्वप्न होतं की भारतासाठी खेळायचं आणि ते माझं स्वप्न पूर्णही झालं. यासाठी मी अनेक लोकांचा आभारी आहे. माझं कुटुंब, माझे बालपणीचे मित्र, ज्यांच्यासोबत मी क्रिकेट खेळलो. माझे कोच सिन्हा आणि शर्मा ज्यांच्याकडून मी क्रिकेट शिकलो… माझी क्रिकेटची टीम ज्यांच्यासोबत मी कितीतरी वर्षे खेळलो. त्यांच्या रूपात मला आणखी एक कुटुंब मिळालं. नाव मिळालं. आपल्या सगळ्यांचं प्रेम मिळालं, असं शिखर म्हणाला आहे.
ते म्हणतात ना, आयुष्याच्या गोष्टीत पुढे सरकायचं असेल तर पुस्तकाची पानं उलटावी लागतात. तसंच काहीसं मी करायला जातोय. आंतरराष्ट्रीय आणि देशाअंतर्गत क्रिकेटमधून मी माझ्या निवृत्तीची घोषणा करतोय. मी माझ्या निवृत्तीची घोषणा करताना मनात समाधान आहे की, मी माझ्या देशासाठी चांगलं खेळलो. मी बीसीसीआयचा खूप आभारी आहे, ज्यांनी मला खेळण्यासाठी संधी दिली, असं शिखरने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलंय.
शिखर धवनच्या चाहत्यांनी कमेंट करत त्याला सदिच्छा दिल्या आहेत. ‘End of an Gabbar Era’ अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे. तुला आम्ही खूप मिस करू, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. गब्बर रिटारयर होतोय. पण तुझं हास्य कायम लक्षात राहील, असंही शिखरच्या चाहत्याने म्हटलं आहे.