रोहित शर्माच्या रिटायरमेंटबाबत होणाऱ्या चर्चांमुळे दिलीप वेंगसरकर भडकले, म्हणाले..

रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने दुसरी आयसीसी ट्रॉफी जिंकली. दुसरीकडे, चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना पार पडला की रोहित शर्मा रिटायर होईल अशी चर्चा होती. पण रोहित शर्माने या चर्चांना पूर्णविराम लावला. त्यानंतर माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांनी कडक शब्दात या चर्चा करणाऱ्यांना सुनावलं आहे.

रोहित शर्माच्या रिटायरमेंटबाबत होणाऱ्या चर्चांमुळे दिलीप वेंगसरकर भडकले, म्हणाले..
Image Credit source: TV9 Network
| Updated on: Mar 12, 2025 | 9:37 PM

रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने चांगली कामगिरी केली आहे. टी20 वर्ल्डकपनंतर चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेवर नाव कोरलं आहे. रोहित शर्माने टी20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर त्या फॉर्मेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. असंच काहीस चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर होईल असं वाटत होतं. पण तसं काही झालं नाही. उलट या चर्चांना रोहित शर्माने पूर्णविराम दिला आणि असं काहीच नसल्याचं सांगितलं. आता माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकरही रोहित शर्माच्या बाजूने मैदानात उतरले आहेत. तसेच रोहित शर्माच्या निवृत्तीबाबत होणाऱ्या चर्चांबाबत आपलं परखड मत मांडलं आहे. ‘मी काही ज्योतिषी नाही. वनडे वर्ल्डकप 2027 पर्यंत बरेच सामने होणार आहेत. या सामन्यातील फॉर्म आणि फिटनेसवर सर्वकाही अवलंबून असणार आहे. त्यामुळे त्याबाबत आताच काही सांगणं कठीण आहे. पण रोहित शर्मा कर्णधार आणि खेळाडू म्हणून जबरदस्त आहे. त्यामुळे मला कळत नाही लोकं त्याच्या निवृत्तीच्या मागे का लागले आहेत. त्याला त्याच्या भविष्याबद्द निर्णय घेण्याचा अधिकार असावा.’ असं वेंगसरकर यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं.

‘रोहित शर्मा त्याच्या कारकिर्दित खूपच चांगला खेळला आहे. त्याच्या खेळीबाबत सर्वांनाच माहिती आहे. त्याने तीन दुहेरी शतकं ठोकली आहे. त्याच्याबाबत आणखी काय सांगायचं. विराट आणि रोहित हे मोठ्या सामन्यांचे खेळाडू आहेत. मोठ्या सामन्यात त्यांचा खेळही तसाच असतो. त्यामुळे संघाच्या दृष्टीकोनातून ते महत्त्वाचं आहे. त्यांचं संघात असणं विरोधी संघासाठी डोकेदुखी ठरते आणि मनोबळ खचतं.’, असंही वेंगसरकर यांनी पुढे सांगितलं.

दुसरीकडे, वेंगसरकर यांनी श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांच्या खेळीचं कौतुक केलं. त्यांनी मधल्या फळीत ज्या पद्धतीने फलंदाजी केली ती उल्लेखनीय आहे. ‘अंतिम सामन्यात श्रेयस अय्यर ज्या पद्धतीने बाद झाला त्यावर खूश नाही. त्याने शेवटपर्यंत राहायला हवं होतं आणि खेळ संपवायला पाहिजे होता. पण त्याची क्षमता पाहून आनंद झाला. केएलनेही सहाव्या क्रमांकावर साजेशी खेळी केली. पण तरीही अक्षर पटेलने पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करणं काही रुचलं नाही. डावखुरा असणं एकमेव कारण असू शकतं.’