
टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेनंतर विविध संघ द्विपक्षीय मालिका खेळत आहे. वेस्ट इंडिज क्रिकेट टीम सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. इंग्लंड विरुद्ध विंडिज यांच्यात 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. इंग्लंड या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. मालिकेतील दुसरा सामना हा 18 जुलैपासून खेळवण्यात येणार आहे. क्रेग ब्रेथवेट विंडिजचं नेतृत्व करणार आहे. तर बेन स्टोक्स इंग्लंडचं कर्णधारपद सांभाळणार आहे. बेन स्टोक्स याला दुसऱ्या कसोटीत 2 दिग्गजांचा रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी आहे.
बेन स्टोक्स याला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि ऑस्ट्रेलियाचा दिग्गज विकेटकीपर ओपनर बॅट्समन एडम ग्रिलख्रिस्ट या दोघांना मागे टाकण्याची संधी आहे. स्टोक्सच्या निशाण्यावर या दोघांच्या आंतरराष्ट्रीय षटकारांचा विक्रम आहे. स्टोक्सला गिलख्रिस्टला पछाडण्यासाठी 4 तर सचिनला मागे टाकण्यासाठी 6 षटकारांची गरज आहे. सचिन आणि गिलख्रिस्ट या दोघांनी त्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील तिन्ही फॉर्मेटमधून मिळून अनुक्रमे 264 आणि 262 सिक्स लगावले आहेत. तर स्टोक्सच्या खात्यात 259 सिक्स आहेत. तसेच सर्वाधिक आंतरराष्ट्रीय षटकारांचा विक्रम हा टीम इंडियाच्या रोहित शर्मा याच्या नावावर आहे. रोहितने 480 सामन्यात 612 सिक्स लगावले आहेत.
दरम्यान बेन स्टोक्स लॉर्ड्समध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात सपशेल अपयशी ठरला. स्टोक्सला दुहेरी आकडाही गाठता आला नाही. स्टोक्सने पहिल्या डावात 4 धावा केल्या. इंग्लंडने हा सामना 1 डाव आणि 114 धावांनी जिंकला होता. आता इंग्लंडकडे दुसर्या सामन्यासह मालिका विजयाची संधी आहे.
इंग्लंडच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये 1 बदल
We’ve made one change from Lord’s 👇
— England Cricket (@englandcricket) July 16, 2024
दुसर्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन: बेन स्टोक्स (कॅप्टन) झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ, ख्रिस वोक्स, गस ऍटकिन्सन, मार्क वुड आणि शोएब बशीर.
वेस्ट इंडिज प्लेइंग ईलेव्हन: क्रेग ब्रॅथवेट (कर्णधार), मिकील लुईस, कर्क मॅकेन्झी, अलिक अथनाझे, कावेम हॉज, जोशुआ दा सिल्वा (विकेटकीपर), जेसन होल्डर, गुडाकेश मोटी, अल्झारी जोसेफ, शामर जोसेफ आणि जेडेन सील्स.