
इंग्लंडचा अष्टपैलू मोईन अली याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. 10 वर्षांच्या क्रिकेट करिअरनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला आहे. पण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी संघात स्थान न मिळाल्याने तडकाफडकी निर्णय घेतल्याची चर्चा क्रीडावर्तुळात रंगली आहे. इंग्लंडचा संघ याच महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन टी20 आणि पाच वनडे सामने खेळणार आहे. मोईन अलीने डेली मेलला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, तो आता 37 वर्षांचा झाला आहे. तसेच क्रिकेट बोर्डाने त्याला सांगितलं की, इंग्लंडसाठी खूप क्रिकेट खेळला आहे आणि आता नव्या पिढीला संधी देण्याची वेळ आली आहे. यासाठी निर्णय घेण्यासाठी योग्य वेळ असल्याचं सांगितलं. मोईन अलीने निवृत्तीनंतर दिलेलं वक्तव्य पाहता त्याला इतक्या लवकर निवृत्ती घ्यायची नव्हती हे स्पष्ट दिसतंय. पण संघाची सध्याची स्थिती पाहता त्याने हा निर्णय घेतला. निवृत्तीनंतर त्याने सांगितलं की, ‘अजूनही खेळण्याची क्षमता आहे आणि इंग्लंडसाठी आणखी काही वर्षे खेळू शकत होतो. पण संघाला पुढच्या काळासाठी तयार व्हायचं आहे. याचा सारासार विचार करून हा निर्णय घेतला.’
इंग्लंडच्या अष्टपैलू मोईन अलीने मुलाखतीत आणखी एक दु:ख व्यक्त केलं. ‘लोकं सामन्यातील तुमचा प्रभाव विसरून जातात. मग तुम्ही 20 किंवा 30 केल्या असतील तरी..कारण त्या महत्त्वाच्या धावा असतात. माझ्यासाठी सामन्यात प्रभाव टाकणं हे महत्त्वाचं ठरलं आहे. मला माहिती आहे मी इंग्लंड टीमसाठी काय केलं आहे. जिथपर्यंत माझ्या खेळाने लोकं खूश होते, मी त्यातच आनंदी होतो.’ मोईन अलीने 2014 मध्ये वेस्ट इंडिज दौऱ्यातून आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. याच दौऱ्यात टी20 सामनाही खेळला होता. तसेच काही महिन्यानंतर श्रीलंकेविरुद्ध कसोटीत पदार्पण केलं.
मोईन अलीने 2021च्या शेवटी कसोटीतून निवृत्ती घेतली होती. पण 2023 मध्ये बेन स्टोक्सच्या आग्रहानंतर एशेज सीरिज खेळला होता. एशेजनंतर मोईनने पुन्हा कसोटीतून निवृत्ती घेतली. पण आता तिन्ही फॉर्मेटमधून निवृत्त झाला आहे. मोईन अली सध्या कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये गयाना अमेझॉन वॉरियर्सकडून खेळत आहे. आता काही काळ फ्रेंचायझी क्रिकेट खेळल्यानंतर त्याने कोच होण्याची इच्छा वर्तवली आहे. मोईन अलीने सांगितलं की, कोचिंगमध्ये प्रगती करायची आहे आणि याचे धडे मी ब्रँडन मॅक्कुलम याच्याकडून घेण्याचा विचार करत आहे. मोईन अली इंग्लंड संघासाठी 68 कसोटी, 138 वनडे आणि 92 टी20 सामने खेळला आहे.