मी तुला दोन बॅट देईन…! सरफराज खानने पाचव्या दिवशी केशाराला दिली विचित्र ऑफर, पण का?
India vs Sri Lanka 2nd Test: भारत आणि श्रीलंका दुसरा कसोटी सामना ड्रॉ होणार हे आता स्पष्ट झालं आहे. असं असताना पाचव्या दिवशी सोनल दिनुशा आणि केशारा यांनी भारतीय गोलंदाजांना जेरीस आणलं. ही जोडी फोडण्यासाठी सरफराज खानने एक विचित्र ऑफर दिली होती. नेमकं काय झालं ते जाणून घेऊयात...

India vs Sri Lanka 2nd Test: भारत आणि श्रीलंका यांच्यात दुसरा कसोटी सामना अखेर ड्रॉ झाला आहे. खरं तर चौथ्या दिवशी हा सामना भारत आरामात जिंकेल असं वाटलं होतं. पण तसं काही झालं नाही. सोनल दिनुशाच्या शतकी खेळीमुळे भारताचं विजयाचं स्वप्न भंगलं आहे. पाचव्या दिवशी केशारा नुवांता आणि सोनल दिनुशा या जोडीने कमाल केली. या दोघांनी सातव्या विकेटसाठी 242 चेंडूत 112 धावांची भागीदारी केली. या भागीदारीमुळे भारताच्या हातून विजयाची वाळू हळूहळू निसटली. खरं तर ही जोडी फोडण्यासाठी भारतीय संघाकडून सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात आले. इतकंच काय तर सरफराज खानने लंच ब्रेकपूर्वी श्रीलंकन खेळाडूला आपल्या बॅट देण्याची ऑफरही दिली. त्याने केशाराला सांगितलं की, तू येथून दोन षटकार मार मी तुला माझ्या दोन बॅट देईल. पण केशाराने त्याच्या ऑफरकडे काही लक्ष दिलं नाही आणि लंचपर्यंत मोर्चा सांभाळला.
सोनल दिनुशा आणि केशारा नुवांता ही जोडी फोडण्याचं मोठं आव्हान होतं. अखेर लंच ब्रेकनंतर ही जोडी फुटली. मानव सुथारच्या गोलंदाजीवर ध्रुव जुरेलने केशारा नुवांताचा अप्रतिम झेल पकडला आणि तंबूचा रस्ता दाखवला. केशाराचं अर्धशतक अवघ्या 4 धावांनी हुकलं. केशारा नुवांताने 150 चेंडूत 46 धावा केल्या. यात त्याने चार चौकार मारले. विशेष म्हणजे 40.2 षटकापर्यंत खेळत त्याने सोनलची साथ दिली. त्यामुळे भारताचं विजयाचं स्वप्न लांबलं.
Sarfaraz Khan to Keshara Nuwantha – Brotherrr if you hit two sixes now, I will give you two bats.. 😂😂 #SLVIND pic.twitter.com/VmlIUYZPlr
— Nibraz Ramzan (@nibraz88cricket) August 27, 2026
सरफराजने श्रीलंकेच्या कर्णधारालाही जेरीस आणलं होतं
सरफराज खानला या कसोटी मालिकेतील दोन्ही सामन्यात प्लेइंग 11 मध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. पण बदली खेळाडू म्हणून क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरला होता. दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात श्रीलंकेचा कर्णधार धनंजय डिसिल्वासोबत त्याने माइंड गेम खेळला होता. शॉर्ट लेगला फिल्डिंग करत असताना न घाबरता खेळण्यास सांगितलं होतं. त्यानंतर दोन चेंडूत खेळून धनंजय डिसिल्वा बाद झाला होता.
