
टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यानंतर पुढील कसोटी मालिकेत विंडीज विरुद्ध भिडणार आहे. टीम इंडिया विंडीज विरुद्ध मायदेशात ऑक्टोबर महिन्यात एकूण 2 कसोटी सामने खेळणार आहे. त्याआधी टीम इंडिया ए विरुद्ध ऑस्ट्रेलिया ए यांच्यात 4 दिवसीय 2 अनऑफीशियल टेस्ट मॅचची सीरिज खेळवण्यात येत आहे. टीम इंडियाच्या ध्रुव जुरेल याने या मालिकेतील सलामीच्या सामन्यातील तिसऱ्या दिवशी खणखणीत शतक ठोकलं आहे. ध्रुवने यासह विंडीज विरूद्धच्या मालिकेसाठी दावा ठोकला आहे.
ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 6 विकेट्स गमावून 532 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने त्यानंतर डाव घोषित केला. त्यानंतर ध्रुव जुरेल याने पहिल्या डावात 114 चेंडूत शतक पूर्ण केलं. टीम इंडियाने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 4 विकेट्स गमावून 403 धावा केल्या. टीम इंडिया अजूनही 129 धावांनी पिछाडीवर आहे. ध्रुवने 132 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 10 फोरसह नाबाद 113 धावा केल्या आहेत.
ध्रुव व्यतिरिक्त देवदत्त पडीक्कल यालाही शतक करण्याची संधी होती. मात्र देवदत्त तिसर्या दिवशी शतक करु शकला नाही. देवदत्त 178 बॉलमध्ये 86 रन्स करुन नॉट आऊट आहे. देवदत्तने या खेळीत 8 चौकार लगावले. ध्रुव आणि देवदत्त या दोघांनी दिवसाचा खेळ संपेपर्यंत पाचव्या विकेटसाठी नॉट आऊट 181 रन्सची पार्टनरशीप केली आहे.
देवदत्त आणि ध्रुवआधी साई सुदर्शन आणि एन जगदीशन या दोघांनीही अर्धशतक ठोकलं. साईने 124 बॉलमध्ये 74 रन्स केल्या. साईने या 74 पैकी 40 रन्स या फक्त फोरद्वारे मिळवल्या. साईने या खेळीत 10 चौकार लगावले. तर एन जगदीशन यान 113 बॉलमध्ये 64 रन्स केल्या. तर दुसऱ्या बाजूला कर्णधार श्रेयस अय्यर याने निराशा केली. श्रेयसला दुहेरी आकडाही गाठता आला नाही. श्रेयस अवघ्या 8 धावांवर बाद झाला.
ध्रुवने याआधी इंग्लंडमध्येही सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करत क्रिकेट चाहत्यांचं लक्ष वेधलं होतं. ध्रुवने इंडिया एकडून खेळताना इंग्लंड लायन्स विरुद्ध 3 अर्धशतकं झळकावली होती. ध्रुवला इंग्लंड दौऱ्यात ऋषभ पंत याच्या दुखापतीनंतर ओव्हल टेस्टमध्ये संधी देण्यात आली होती. ध्रुवने त्या सामन्यात अनुक्रमे 19 आणि 34 धावा केल्या होत्या.
दरम्यान ध्रुवने आतापर्यंत 5 कसोटी सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. ध्रुवने या 5 सामन्यांमध्ये 36.42 च्या सरासरीने 255 धावा केल्या आहेत. तसेच ध्रुव टीम इंडियासाठी 4 टी 20i सामने खेळला आहे.