IND vs ZIM: ‘पाणी वाचवा, झटपट आंघोळ उरका’, BCCI ला K L Rahul च्या टीमला हे का सांगावं लागलं?

IND vs ZIM: भारतीय संघ सध्या तीन वनडे सामन्यांची मालिका खेळण्यासाठी झिम्बाब्वे दौऱ्यावर गेला आहे. दुर्देवाने झिम्बाब्वे मधली सध्याची परिस्थिती खराब आहे.

IND vs ZIM: पाणी वाचवा, झटपट आंघोळ उरका, BCCI ला K L Rahul च्या टीमला हे का सांगावं लागलं?
| Updated on: Aug 16, 2022 | 4:09 PM

मुंबई: भारतीय संघ सध्या तीन वनडे सामन्यांची मालिका खेळण्यासाठी झिम्बाब्वे दौऱ्यावर गेला आहे. दुर्देवाने झिम्बाब्वे मधली सध्याची परिस्थिती खराब आहे. झिम्बाब्वे राजधानी हरारे शहर सध्या पाणी संकटाचा सामना करत आहे. हरारे शहरात मागच्या तीन दिवसांपासून पाणी आलेलं नाही. लोकांनी पिण्याच्या पाण्यासाठी रांग लावल्याच चित्र आहे. या संकट काळात BCCI ने के.एल.राहुलच्या संघाला शक्य तितक पाणी वाचवण्याची आणि झटपट आंघोळ उरकण्याची सूचना केली आहे.

दक्षिण आफ्रिकेतही अशीच स्थिती होती

2018 मध्ये भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी देखील अशीच परिस्थिती होती. केप टाऊनच्या अनेक भागात पाणी नव्हतं. बीसीसीआयने त्यावेळी सुद्धा पाणी जपून वापरण्याचं आवाहन केलं होतं. अनेक हॉटेल्सनी सुद्धा बोर्ड लावून पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी आवाहन केलं होतं.

पाणी वाया घालवू नका

“हरारे मधील पाण्याची स्थिती गंभीर आहे. खेळाडूंना याची कल्पना देण्यात आली आहे. काहीही झालं, तरी पाणी वाया घालवू नका, असं खेळाडूंना सांगण्यात आलं आहे. कमीत कमी वेळात आंघोळ उरकण्याची सूचना केली आहे” असं बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने इनसाइडस्पोर्टला सांगितलं.

दुष्काळ कारण नाही

दरवर्षी हरारे शहरात पाणी संकट निर्माण होतं. 2019 मध्ये परिस्थिती इतकी वाईट होती की, लोकांना खराब पाणी वापराव लागलं होतं. हरारेच्या अनेक भागात खासकरुन पश्चिम भागात तीव्र पाणी टंचाई आहे. हरारे पश्चिम मध्ये मागच्या तीन आठवड्यांपासून पाणी पुरवठा झालेला नाही. हरारे मध्ये जे पाणी संकट निर्माण झालय, त्यामागे दुष्काळ कारण नाहीय.

20 लाख लोकांना पाणी पुरवठा होतो

मॉरटॉन जॅफफ्रे येथील वॉटर ट्रीटमेंट प्लान्ट मध्ये पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक केमिकल्स उपलब्ध नाहीयत, हे तिथल्या पाणी टंचाईच मूळ कारण आहे. या प्लान्ट मधून 20 लाख लोकांना पाणी पुरवठा होतो. भारतीय संघ 2016 च्या दौऱ्यात ज्या हॉटेल मध्ये उतरला होता, तिथे तर मागच्या महिन्यात परिस्थिती खूपच वाईट होती. हॉटेल मध्ये उतरलेल्या पाहुण्यांसाठी पाणीच नव्हतं.