
भारत विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना भारताने गमवला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने जबरदस्त कमबॅक केलं आहे. अभिषेक शर्मा, ऋतुराज गायकवाड आणि रिंकु सिंह यांनी जबरदस्त खेळी करत टीम इंडियाला मोठी धावसंख्या उभारून दिली. भारताने 20 षटकात 2 गडी गमवून 234 धावा केल्या आणि विजयासाठी 235 धावांचं आव्हान दिलं. मात्र झिम्बाब्वेचा संघ 134 धावा करू शकला. भारताने या सामन्यात 100 धावांनी विजय मिळवला आणि मालिकेत 1-1 ने बरोबरी केली आहे. या सामन्यात विजयाचा हिरो ठरला तो डावखुरा अभिषेक शर्मा..पहिल्या सामन्यात शून्यावर बाद झाल्यानंतर क्रीडाप्रेमींच्या रडारवर आला होता. मात्र 24 तासातच त्याने आपली चूक दुरुस्त करत दमदार शतक ठोकलं. त्याच्या शतकी खेळीमुळे टीम इंडिया चांगल्या स्थितीत पोहोचली. अभिषेक शर्माने 47 चेंडूत 8 षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीने 100 धावा केल्या. तर ऋतुराज गायकवाड आणि रिंकु सिंह यांनी दमदार खेळीचं प्रदर्शन केलं. ऋतुराज गायकवाडने 47 चेंडूत नाबाद 77, तर रिंकु सिंहने 22 चेंडूत नाबाद 48 धावा केल्या.
भारताने विजयासाठी दिलेल्या धावांचा पाठलाग करताना झिम्बाब्वेचा डाव गडगडला. इनोसंट कैया 4 धावांवर असताना बाद झाला. त्यानंतर ब्रायन बेनेटने आक्रमक खेळी करत 9 चेंडूत 26 धावा केल्या. मात्र मुकेश कुमारने त्याचा त्रिफळा उडवून चालता केला. डिऑन मायर्सला आपलं खातंही खोलता आलं नाही. तर कर्णधार सिकंदर रझा 4 धावांवर असताना आवेश खानच्या जाळ्यात अडकला. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदरने पाचवा गडी बाद करत झिम्बाब्लेला बॅकफूटवर ढकललं. मुकेश कुमार आणि अभिषेक शर्मा यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. तर रवि बिष्णोईने 2 आणि वॉशिंग्टन सुंदरने एक गडी बाद केला.
भारत (प्लेइंग इलेव्हन): शुबमन गिल (कर्णधार), अभिषेक शर्मा,ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, रियान पराग, रिंकू सिंग, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, मुकेश कुमार
झिम्बाब्वे (प्लेइंग इलेव्हन): वेस्ली मधेवेरे, इनोसंट कैया, ब्रायन बेनेट, सिकंदर रझा (कर्णधार), डिओन मायर्स, जोनाथन कॅम्पबेल, क्लाइव्ह मदांडे (डब्ल्यू), वेलिंग्टन मसाकादझा, ल्यूक जोंगवे, ब्लेसिंग मुझाराबानी, तेंडाई चतारा