
अहमदाबाद : भारत-पाकिस्तान सामन्याआधी पाकिस्तानी क्रिकेटपटू मोहम्मद रिझवान आणि हॅरिस रौफ यांनी टीम इंडियाचा खेळाडू विराट कोहलीच भरभरुन कौतुक केलय. वनडे वर्ल्ड कपमध्ये आज भारत-पाकिस्तानचा सामना रंगणार आहे. विराट कोहलीमध्ये अशी काही गुणवैशिष्टय आहेत, की ज्यामुळे तो इतरांपेक्षा वेगळा ठरतो असं रिझवान आणि रौफ म्हणाले. विराट कोहलीने नेहमीच पाकिस्तान विरुद्ध सरस खेळ दाखवलाय. मागच्यावर्षी T20 वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तानची टीम आमने-सामने आली. त्यावेळी अडचणीच्या परिस्थितीतून विराट कोहलीने टीमचा डाव सावरला होता. हॅरिस रौफला त्याने मारलेले दोन सिक्स आजही अनेक क्रिकेटप्रेमींच्या स्मरणात आहेत. फक्त विराट कोहलीमुळे टीम इंडियाने तो सामना जिंकला होता. आजही विराटने तसाच खेळ दाखवावा, अशी तमाम क्रिकेट चाहत्यांची इच्छा आहे.
“आजच्या घडीला फिनिशिंग स्टेजमध्ये विराट कोहली इतका दुसरा कुणी सर्वोत्तम फलंदाज नाहीय” असं रिझवान म्हणाला. “एकदा तो सेट झाला, त्याने काही धावा केल्या की, अखेरीस तो जास्त धोकादायक असतो. सेट झाल्यानंतर तो जे फटके खेळतो, त्याचा जो फिनिशिंग टच आहे, त्याची तुलना होऊ शकत नाही. या गोष्टींमुळे तो वेगळ ठरतो” असं रिझवान म्हणाला. मागच्यावर्षी टी 20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात रिझवानने कोहलीचा खेळ पाहिलाय, मेलबर्नवर ही मॅच झालेली. सुरुवातीला कोहलीने संघर्ष केला. पण त्यातून बाहेर आल्यानंतर अखेरच्या ओव्हर्समध्ये टीम इंडियाने यशस्वीपणे धावांचा पाठलाग केला.
हॅरिस रौफ काय म्हणाला?
विराट कोहली लक्ष केंद्रीत करुन खेळतो, असं वेगवान गोलंदाज हॅरिस रौफ म्हणाला. हॅरिस रौफ नेट बॉलर होता. त्यावेळी त्याने कोहलीच चेंडूवर असणार लक्ष पाहिलय. त्याला तोड नाही, असं रौफ म्हणतो. “भारतासाठी मी नेट बॉलर होतो. त्यावेळी मी कोहलीला बॉलिंग केलीय. कुठला फटका खेळायचा, बॉल कुठे जाणार हे त्याला माहित असायच. त्याच चेंडूवर पूर्ण लक्ष असायच. मी कोणाच एवढ नियंत्रण पाहिलेल नाहीय. त्यामुळे कोहली उत्तम आहे” असं हॅरिस रौफने सांगितलं.