IPL 2022 Mumbai Indians: रोहित शर्मा मैदानातच शिवी देतो, हेड कोचचा सल्ला ऐकत नाही, टीम इंडियाच्या नव्या खेळाडूचा खुलासा

IPL 2022 Mumbai Indians: टीम इंडियाचा विकेटकिपर फलंदाज इशान किशन (Ishan Kishan) मैदानावर आक्रमक फलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो.

IPL 2022 Mumbai Indians: रोहित शर्मा मैदानातच शिवी देतो, हेड कोचचा सल्ला ऐकत नाही, टीम इंडियाच्या नव्या खेळाडूचा खुलासा
Mumbai Indians Rohit sharma-Ishan Kishan
Image Credit source: instagram
| Updated on: Apr 05, 2022 | 4:33 PM

मुंबई: टीम इंडियाचा विकेटकिपर फलंदाज इशान किशन (Ishan Kishan) मैदानावर आक्रमक फलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो. मुंबई इंडियन्ससाठी (Mumbai Indians) खेळतानाही इशान किशन बिनधास्त फलंदाजी करतो, यामागे कारण आहे, कॅप्टन रोहित शर्मा. (Rohit Sharma) कॅप्टन म्हणून रोहित शर्मा आपल्या टीममधील खेळाडूंना मुक्तपणे खेळण्याचं स्वातंत्र्य देतो. एखाद्या खेळाडूला हेड कोचने सल्ला दिला असेल, तर वेळप्रसंगी तो सुद्धा मानू नका इतकं स्वांतत्र्य रोहित आपल्या खेळाडूंना देतो. स्वत: इशान किशनने ही गोष्ट सांगितली. इशान किशनने एका मुलाखतीत रोहित शर्माची कॅप्टनशिप, विराट कोहलीच व्यक्तीमत्त्व आणि धोनीबद्दल रोचक किस्से सांगितले. रोहित शर्मा मैदानावरच आपल्या सहकाऱ्यांना शिव्या देतो आणि ड्रेसिंग रुममध्ये विसरुन जायला सांगतो.

ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन शो

ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन शो मध्ये इशान किशनने अनेक गोष्टी सांगितल्या. “एका मॅचमध्ये मुंबईचे कोच माहेला जयवर्धन यांनी मला एक-एक, दोन-दोन रन्स काढाव्या लागतील असं सांगितलं. त्यावेळी रोहित शर्मा माझ्याजवळ आला आणि त्याने जे मनात आहे ते कर असं सांगितलं” इशानने मुलाखतीत हा किस्सा सांगितला. “रोहित शर्मा चालू सामन्यात शिवी देतो आणि नंतर मनाला जास्त लावून घेऊ नकोस, असं त्या खेळाडूला सांगतो” इशानने आपला अनुभव सांगितला. “रोहित शर्मा बरोबर आम्ही मजा-मस्करी करु शकतो. पण विराट कोहलीसोबत मी कधी अशी मजा-मस्करी केली नाही. मी विराट कोहलीसोबत जास्त वेळ घालवलेला नाही. त्यामुळे त्याच्यासोबत माझी तशी बाँडिंग नाहीय”

रोहित शर्माचं डोकं फास्ट चालतं

रोहित शर्माची कॅप्टनशिप आणि खेळाची समज याबद्दल इशान किशनने त्याचं कौतुक केलं. रोहित शर्माचं डोक भरपूर चालतं. हा फलंदाज इथे झेल देऊ शकतो, असे वेगवेगळ अंदाज तो सतत बांधत असतो. “एका सामन्यात रोहितने मिड विकेटला क्षेत्ररक्षक ठेवला नाही. मुद्दामून त्याने ती जागा रिकामी ठेवली. फलंदाजाने मिड विकेटलाच फटका खेळावा अशी रोहितची रणनिती होती, आणि घडलं सुद्धा तसंच. तो फलंदाज मिड विकेटला फटका मारण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. रोहित शर्मा अनेकदा राहुल चाहरचा आत्मविश्वास वाढवायचा. राहुलच्या चांगल्या प्रदर्शनामागे रोहित शर्माचं योगदान आहे” असं इशानने सांगितलं.

विकेटकिपिंग कधी सुरु केली?

स्वत:च्या विकेटकिपिंग बद्दल बोलताना इशान म्हणाला की, “मी धोनीला पाहून नाही, तर आधीच विकेटकिपिंग सुरु केली होती. मला स्वत:ला सतत व्यस्त ठेवायचं होतं. मी विकेटकिपिंग निवडली. मला विकेटकिपिंग करुन कुठे एकदिवस झाला होता. मला दुसऱ्याचदिवशी कुठल्यातरी सामन्यात विकेटकिपिंगसाठी पाठवण्यात आलं. मी त्या सामन्यात 3-4 कॅच पकडल्या. स्टंम्पिंग केली. त्यानंतर विकेटकिपिंगची सुरुवात झाली”