IPL 2026 Full Schedule : 10 संघ, 50 सामने-12 शहरं, 19 व्या मोसमातील दुसऱ्या टप्प्याचं वेळापत्रक जाहीर
Ipl 2026 Full Schedule : आयपीएल स्पर्धेच्या बहुप्रतिक्षित 19 व्या मोसमाचं उर्वरित वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. जाणून घ्या एकूण किती शहरांमध्ये सामने होणार?

भारतीय क्रिकेट वर्तुळातून या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. बीसीसीआयने गुरुवारी 26 मार्च रोजी आयपीएल स्पर्धेच्या बहुप्रतिक्षित 19 व्या मोसमातील दुसऱ्या टप्प्यातील सामन्यांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. त्यामुळे आता या मोसमात साखळी फेरीत एकूण किती सामने होणार आणि कोणत्या शहरांमध्ये होणार? हे चित्र स्पष्ट झालं आहे. आयपीएलने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉमद्वारे दुसऱ्या टप्प्यातील सामन्यांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आल्याची माहिती दिली आहे.
बीसीसीआयने देशातील निवडणुकांमुळे 11 मार्च रोजी 19 व्या मोसमातील पहिल्या टप्प्यातील फक्त 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर केलं होतं. त्यानुसार 28 मार्च ते 12 एप्रिल दरम्यान पहिल्या फेरीतील सामने होणार असल्याचं निश्चित होतं. त्यामुळे चाहत्यांना उर्वरित हंगामाच्या वेळापत्रकाची प्रतिक्षा होती. अखेर ही प्रतिक्षा संपली आहे.
दुसऱ्या टप्प्यात एकूण 50 सामने
आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या हंगामातील दुसऱ्या टप्प्यात 50 तर एकूण मिळून 70 साखळी सामने होणार आहेत. तर पंरपरेनुसार प्लेऑफमधील फायनलसह 4 सामन्यांचं वेळापत्रक हे शेवटच्या टप्प्यात जाहीर केलं जाईल. या मोसमात सामन्यांची संख्या ही 74 वरुन 84 केली जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र दुसऱ्या टप्प्याचं वेळापत्रक जाहीर होताच 74 सामने होणार हे निश्चित झालं आहे.
दुसऱ्या टप्प्याबाबत महत्त्वाची माहिती
दुसऱ्या टप्प्याचा थरार हा 13 एप्रिल ते 24 दरम्यान रंगणार आहे. एकूण 12 शहरांमध्ये हे सामने खेळवण्यात येणार आहेत. तसेच या दुसऱ्या टप्प्यात एकूण 8 डबल हेडर (एका दिवशी 2 सामने) सामने होणार आहेत. डबल हेडरमधील पहिल्या सामन्याला दुपारी साडे 3 वाजता सुरुवात होणार आहे. तर संध्याकाळी होणाऱ्या सामन्यातील पहिला चेंडूत साडे 7 वाजता टाकण्यात येईल.
कोणत्या शहरांना आयपीएल सामन्यांच्या आयोजनाचा मान?
बीसीसीआयने एकूण 12 शहरांना आयपीएल स्पर्धेतील सामन्यांचं आयोजन करण्याचा मान दिला आहे. त्यानुसार बंगळुरु, मुंबई, चेन्नई, कोलकाता, दिल्ली, अहमदाबाद, हैदराबाद, लखनौ, जयपूर, धर्मशाला, रायपुर आणि न्यू चंडीगडमध्ये हे सामने होणार आहेत.
10 संघ आणि 70 सामने, 19 व्या मोसमातील साखळी फेरीचं वेळापत्रक
19 वा हंगाम आणि होम ग्राउंड
पंजाब किंग्सचे या मोसमात 2 होम ग्राउंड आहेत. त्यानुसार पंजाब किंग्स न्यू चंडीगढ आणि धर्मशालेत आपले सामने खेळणार आहे. पंजाब दुसऱ्या टप्प्यात धर्मशालेत एकूण 3 सामने खेळणार आहे. राजस्थान रॉयल्सचे जयपूरमध्ये 4 सामने होणार आहेत. तर गतविजेता आरसीबी बंगळुरुत 3 आणि रायपूरमध्ये 2 सामने खेळणार आहे.