IPL 2026 : CSK च्या अडचणीत वाढ, मॅचविनर बॅट्समॅन 19 व्या मोसमातून आऊट

Ayush Mhatre Left Hamstring Injury : चेन्नई सुपर किंग्सला तगडा झटका लागला आहे. आयुष म्हात्रे याला दुखापतीमुळे संपूर्ण मोसमातून बाहेर व्हावं लागलं आहे. आयुषला नक्की काय आणि केव्हा दुखापत झाली होती? सीएसकेकडून आयुषच्या दुखापतीबाबत काय सांगण्यात आलंय? जाणून घ्या.

IPL 2026 : CSK च्या अडचणीत वाढ, मॅचविनर बॅट्समॅन 19 व्या मोसमातून आऊट
Chennai Super Kings IPL 2026
Image Credit source: tv9kannada
| Updated on: Apr 21, 2026 | 4:39 PM

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघांपैकी एक असलेल्या चेन्नई सुपर किंग्सला सर्वात मोठा झटका लागला आहे. चेन्नईचा युवा आणि मॅचविनर फलंदाज आयुष म्हात्रे याला दुखापतीमुळे (Ayush Mhatre Injury) आयपीएल स्पर्धेच्या उर्वरित 19 व्या मोसमातून (IPL 2026) बाहेर व्हावं लागलं आहे. चेन्नई सुपर किंग्सकडून सोशल मीडियाद्वारे याबाबतची माहिती देण्यात आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयुषला दुखापतीमुळे बाहेर व्हावं लागल्याची चर्चा गेल्या 2 तासांपासून सुरु होती. मात्र चेन्नई सुपर किंग्सकडून दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी आयुषला दुखापतीमुळे या उर्वरित हंगामातून बाहेर व्हावं लागल्याचं जाहीर करण्यात आलं.

आयुषला काय झालं होतं?

चेन्नई विरुद्ध हैदराबाद यांच्यात 18 एप्रिलला सामना खेळवण्यात आला. आयुषला या सामन्यादरम्यान बॅटिंग करताना दुखापत झाली. आयुषला हॅमस्ट्रिंग अर्थात मांडीच्या स्नायूला दुखापत झाली. त्यामुळे आयुषला उर्वरित मोसमाला मुकावं लागलंय, अशी माहिती सीएसकेकडून देण्यात आली आहे.

आयुषला फिट होण्यासाठी किती वेळ लागणार?

आयुषला या दुखापतीतून पूर्णपणे फिट होण्यासाठी दीड ते 3 महिने लागू शकतात, अशी माहिती सीएसकेकडून देण्यात आली आहे. “आयुषला या दुखापतीतून पूर्णपणे बरं होण्यासाठी (रिहॅब) 6 ते 12 आठवडे लागतील”, असं सीएसकेच्या एक्स पोस्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

आयुषच्या जागी कुणाला संधी?

आता आयुषला दुखापतीमुळे बाहेर व्हावं लागल्याने त्याच्या जागी कुणाला संधी मिळणार? हा प्रश्न स्वाभाविक आहे. मात्र चेन्नई सुपर किंग्सकडून आयुषच्या जागी बदली खेळाडूचं नाव जाहीर करण्यात आलेलं नाही. त्यामुळे आयुषच्या जागी कुणाला संधी मिळणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

6 सामने आणि 201 धावा

आयुषला 19 व्या मोसमात चेन्नईचं 6 सामन्यांत प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. आयुषने या 6 सामन्यांत यलो आर्मीसाठी 33.50 च्या सरासरीने आणि 177.88 या स्ट्राईक रेटने एकूण 113 चेंडूत 201 धावा केल्या. आयुष म्हात्रे याने या दरम्यान षटकार आणि चौकारांच्या माध्यमातून 152 धावा केल्या. आयुषने 20 फोर आणि 12 सिक्स लगावले.

आयुष म्हात्रे आऊट

चेन्नईचा सामना कधी?

दरम्यान चेन्नई आपल्या मोहिमेतील सातव्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध भिडणार आहे. मुंबई विरुद्ध चेन्नई हा सामना गुरुवारी 23 एप्रिलला ऐतिहासिक वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्याकडे साऱ्या क्रिकेट वर्तुळाचं लक्ष असणार आहे.

Follow Us