Rohit Sharma : रोहितचा दिल्ली विरुद्ध कारनामा, हिटमॅनचा मोठा विक्रम, पलटणच्या ओपनरने काय केलं?
Rohit Sharma Milestone : रोहित शर्मा आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात सलग दुसरं अर्धशतक लगावण्यात अपयशी ठरला. मात्र रोहितने या सामन्यात 2 खास विक्रम केले. जाणून घ्या हिटमॅनने काय केलं.

मुंबई इंडियन्सचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार रोहित शर्मा याने आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या पर्वात अप्रतिम सुरुवात केली. रोहितने 29 मार्च रोजी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध अर्धशतक झळकावलं. रोहितने केकेआर विरुद्ध 38 बॉलमध्ये 78 रन्स केल्या होत्या. रोहितने त्या खेळीत 6 षटकार आणि 6 चौकार लगावले होते. रोहितने केकेआरप्रमाणे दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध संयमी सुरुवात केली. त्यामुळे रोहित सलग दुसरं अर्धशतक झळकावणार असं चित्र होतं. मात्र दिल्लीचा कॅप्टन अक्षर पटेल याने रोहितला अर्धशतकाआधीच रोखलं. रोहितने 26 चेंडूत 134.62 च्या स्ट्राईक रेटने 35 धावा केल्या. रोहितने या खेळीत 1 षटकार आणि 5 चौकार लगावले. रोहितने या 1 षटकारासह मोठा विक्रम आपल्या नावावर केला.
रोहितचं दिल्ली विरुद्ध षटकारांचं अर्धशतक
रोहितने दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध षटकारांचं अर्धशतक पूर्ण केलं. रोहित दिल्ली विरुद्ध 50 किंवा त्यापेक्षा अधिक षटकार लगावणारा पहिला फलंदाज ठरला. तसेच रोहित आयपीएल स्पर्धेत एका संघाविरुद्ध सर्वाधिक षटकार लगावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानी पोहचला आहे. तसेच या यादीत पहिल्या आणि दुसऱ्या स्थानी माजी फलंदाज ख्रिस गेल विराजमान आहे.
गेलच्या नावावरच या स्पर्धेत एका संघाविरुद्ध सर्वाधिक षटकारांचा विक्रम आहे. गेलने पंजाब आणि केकेआर विरुद्ध 50 पेक्षा अधिक सिक्स ठोकले आहेत. गेलने पंजाब विरुद्ध 61 तर केकेआर विरुद्ध 54 अर्धशतक झळकावले आहेत. त्यानंतर रोहित या यादीत 51 षटकारांसह तिसऱ्या स्थानी पोहचला आहे. चेन्नई सुपर किंग्सचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी चौथ्या क्रमांकावर आहे. धोनीने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध 50 सिक्स लगावले आहेत.
हिटमॅनच खास शतक
रोहितने दिल्ली विरूद्ध 30 धावा पूर्ण करताच आयपीएल कारकीर्दीत खास शतक पूर्ण केलं. रोहितची आयपीएल स्पर्धेत 30 पेक्षा अधिक धावा करण्याची 100 वी वेळ ठरली. रोहित अशी कामगिरी करणारा एकूण दुसरा फलंदाज ठरला. विराट कोहली या यादीत पहिल्या स्थानी विराजमान आहे. विराटने 127 वेळा 30 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.
दरम्यान रोहित ताज्या आकडेवारीनुसार 19 व्या मोसमात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. रोहितने 2 सामन्यांतील 2 डावांत 56.50 च्या सरासरीने 113 धावा केल्या आहेत. तर समीर रिझवी 160 धावांसह पहिल्या स्थानी विराजमान आहे.