Video: अजिंक्य रहाणेचा हा षटकार पाहिलात का? बॅट हातून सुटली आणि…
आयपीएल स्पर्धेतील 15व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सच्या वाटेला पहिली फलंदाजी आली. चांगली सुरूवात करूनही कोलकात्याने 181 धावांपर्यंत मजल मारली. पण या सामन्यात अजिंक्य रहाणेने मारलेल्या षटकाराची चर्चा होत आहे.

आयपीएल 2026 स्पर्धेत 15व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात लढत होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल लखनौ सुपर जायंट्सच्या बाजूने लागला आणि कोलकात्याच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली. या सामन्यात फिन एलनने पहिल्या दोन चेंडूवर चौकार मारून चांगली सुरूवात केली. पण चौथ्या चेंडूवर विकेट गेली आणि संघावर दडपण वाढलं. पण कर्णधार अजिंक्य रहाणे आणि अंगकृष रघुवंशी यांनी दुसऱ्या विकेटसाठी 84 धावांची भागीदारी केली आणि डाव सावरला. संघावर दडपण असताना अजिंक्य रहाणेने कर्णधारपदाला साजेशी कामगिरी केली. त्याने 24 चेंडूत 2 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने 41 धावांची खेळी केली. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 170.83 चा होता. या खेळीतील एका षटकाराची चर्चा होत आहे. कारण हातातून बॅट सुटली आणि चेंडू सीमेपार गेला.
अजिंक्य रहाणेने षटकार मारला कसा?
लखनौ सुपर जायंट्सकडून नववं षटक टाकण्यासाठी आवेश खान आला होता. या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारला. ऑफ स्टंपच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूवर अजिंक्य राहणेने जोरदार प्रहार केला. पण असं करताना हातातून बॅट सुटली. त्यामुळे चेंडू फार लांब जाणार नाही असं वाटलं. पण बॅकवर्ड पॉइंटच्या वरून चेंडू थेट सीमेपार गेला. त्यामुळे अनोख्या षटकाराबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. कारण की चेंडूवर योग्य रितीने प्रहार झाला नव्हता. अजिंक्य रहाणेचं नशीब चांगलं होतं असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही.
केकेआरकडून कर्णधार अजिंक्य रहाणेची बॅट चांगलीच तळपली आहे. त्याने 4 सामन्यात 124 धावांची खेळी केली आहे. अजिंक्यने मुंबई इंडियन्सविरूद्धच्या सामन्यात 67 धावांची खेळी केली होती. चार सामन्यातील धावांची गोळाबेरीज करता त्याचा स्ट्राईक रेट हा 155 चा आहे.