KKR vs SRH IPL 2026 : कोलकाताचा हैदराबाद विरुद्ध बॉलिंगचा निर्णय, Srh च्या फलंदाजांना रोखण्याचं आव्हान, प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोण?
Kolkata Knight Riders vs Sunrisers Hyderabad Toss and Playing 11 : कोलकाता नाईट रायडर्सने सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध घरच्या मैदानात टॉस जिंकला आहे. केकेआरने या सामन्यात रन चेज करण्याचा निर्णय घेतला आहे.

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या पर्वातील (IPL 2026) पहिल्या फेरीचा थरार संपला आहे. आता दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद आमनेसामने आहेत. दोन्ही संघांचा हा दुसरा सामना आहे. उभयसंघातील हा सामना केकेआरच्या होम ग्राउंडमध्ये आयोजित करण्यात आला आहे. सामन्याला इडन गार्डन्समध्ये संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला. केकेआरने टॉस जिंकला. कर्णधार अजिंक्य रहाणे याने फिल्डिंगचा निर्णय घेत हैदराबादला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे.
प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोण?
केकेआरने पहिल्या सामन्यातील पराभवानंतरही प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. केकेआरने आपल्या त्याच 11 खेळाडूंवर विश्वास दाखवला आहे. तर सनरायजर्स हैदराबादने एकमेव बदल केला आहे. हैदराबादने प्लेइंग ईलेव्हनमध्ये शिवांग कुमार याचा समावेश केला आहे.
अजिंक्यची टॉसनंतर प्रतिक्रिया काय?
“संघात कायम सुधारणा करण्याची गरज असते. मात्र काही चांगल्या गोष्टीही समोर आल्या आहेत. या खेळपट्टीवर फार गवत नाही. पाऊस झाल्याने आम्ही बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. सामन्यादरम्यान दवाचा काही परिणाम होईल, असं मला वाटत नाही” , असं अजिंक्यने म्हटलं. तसेच अजिंक्यने ऑलराउंडर कॅमरुन ग्रीनबाबतही प्रतिक्रिया दिली. “कॅमरुन ग्रीन शक्य तितके प्रयत्न करत आहे. ग्रीन लवकरच बॉलिंगला सुरुवात करेल अशी आशा आहे”, असं अजिंक्यने टॉसनंतर म्हटलं.
पॅट कमिन्सचं कमबॅक केव्हा?
दरम्यान पॅट कमिन्स हा सनरायजर्स हैदराबादचा नियमित कर्णधार आहे. मात्र पॅटला पाठीच्या दुखापतीमुळे या मोसमातील काही सामन्यांना मुकावं लागलं आहे. अशात पॅटच्या अनुपस्थितीत इशान किशन याच्याकडे नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. पॅटचं कमबॅक केव्हा होणार? असा प्रश्न इशानला टॉसनंतर विचारण्यात आला. यावर इशानने काय उत्तर दिलं? हे जाणून घेऊयात.
“पॅट कधीपर्यंत परतेल याबाबत मला नक्की माहित नाही. मात्र पॅट लवकरच कमबॅक करेल. पॅटच्या असण्याने फार फरक पडतो”, असं म्हणत इशानने पॅट किती महत्त्वाचा आहे हे नमूद केलं.
सनरायजर्स हैदराबाद प्लेइंग ईलेव्हन : इशान किशन (कर्णधार आणि विकेटकीपर), अभिषेक शर्मा, ट्रेव्हिस हेड, हेनरिक क्लासेन, अनिकेत वर्मा, नितीश कुमार रेड्डी, सलील अरोरा, हर्ष दुबे, शिवांग कुमार, जयदेव उनाडकट आणि डेव्हिड पेन.
कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग ईलेव्हन : अजिंक्य रहाणे (कॅप्टन), कॅमेरुन ग्रीन, अंगक्रृश रघुवंशी (विकेटकीपर), रिंकू सिंग, रमणदीप सिंग, अनुकुल रॉय, सुनील नारायण, वरुण चक्रवर्ती, वैभव अरोरा, कार्तिक त्यागी आणि ब्लेसिंग मुजरबानी.