KKR vs PBKS: सामना सुरू असताना आपल्याच खेळाडूला चेंडू फेकून मारला, Video

आयपीएल 2026 स्पर्धेतील 12 सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्स यांच्यात सुरू आहे. या सामन्यात पावसामुळे खंड पडला आणि सामना थांबवला गेला. पण या सामन्यात एक विचित्र प्रकार घडला. आपल्या संघाच्या खेळाडूला चेंडू फेकून मारला.

KKR vs PBKS: सामना सुरू असताना आपल्याच खेळाडूला चेंडू फेकून मारला, Video
KKR vs PBKS: सामना सुरू असताना आपल्याच खेळाडूला चेंडू फेकून मारला, Video
Image Credit source: PTI
| Updated on: Apr 06, 2026 | 9:58 PM

Kolkata Knight Riders vs Punjab Kings : आयपीएल 2026 स्पर्धेतील कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्स सामन्यात एक विचित्र प्रकार घडला. पण हा प्रकार काही जाणीवपूर्वक नव्हता. तर तो नकळत घडला. त्यामुळे पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यर यालाही हसू आलं. कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार अजिंक्य रहाणे याने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी निवडली. पण हा निर्णय चुकीचा ठरताना दिसला. कारण सामना सुरू झाल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सचे दोन विकेट धडाधड पडले. दुसऱ्या षटकात फिन एलन आणि कॅमरून ग्रीन यांची विकेट पडली. झेव्हियर बार्टलेट याने दोन्ही विकेट काढल्या. पण या षटकात दोन विकेट येण्यापूर्वी दुसऱ्या चेंडूवर विचित्र प्रकार घडला. यात पंजाब किंग्सचे दोन खेळाडू मैदानात आबादुबी खेळताना दिसले. हा एक असा खेळ आहे ज्यात खेळाडू एकमेकांना चेंडूने मारतात. कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्स सामन्यात तसंच घडलं.

दुसऱ्या षटकात काय घडलं नेमकं?

पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यर याने दुसरं षटक वेगवान गोलंदाज झेव्हियर बार्टलेट याच्या हाती सोपवलं. या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर समोर फिन एलन होता. त्याने या चेंडूवर स्कूप शॉट मारण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा अंदाज चुकला आणि चेंडू शरीराला लागून विकेटच्या आसपास पडला. खरं तर हा चेंडू मारल्यानंतर तो चेंडू नेमका कुठे गेला याचा अंदाज फिन एलनला आला नाही. त्याने धाव घेण्याचा प्रयत्न केला. पण त्याने धाव घेण्याआधीच यष्टीरक्षक प्रभसिमरन सिंग आणि बार्टलेट चेंडू पडलेल्या ठिकाणी धावत गेले. प्रभसिमरन सिंगच्या हाती चेंडू लागला आणि त्याने पुढे धावत गेलेल्या फिन एलनला धावचीत करण्यासाठी चेंडू जोरात फेकला. पण बार्टलेट मधे आला आणि त्याला चेंडू लागला. सुदैवाने, बार्टलेटला दुखापत झाली नाही.

बार्टलेटच्या पाठीवर जोराने चेंडू लागला आणि त्याने त्याचा राग केकेआरच्या फलंदाजांचा विकेट घेऊन काढला. चौथ्या चेंडूवर फिन एलनला आउट स्विंग टाकला. हा चेंडू मारताना फिन एलन चुकला आणि कट लागून चेंडू विकेटकीपर प्रभसिमरनच्या हाती गेला. त्यानंतर फलंदाजीला कॅमरून ग्रीन आला. 25 कोटींच्या या खेळाडूने स्ट्राईकला येताच चौकार मारला. पण शेवटच्या चेंडूवर पुन्हा फटका मारताना चुकला आणि प्रभसिमरन सिंगच्या हाती झेल देत बाद झाला. कोलकाताने अवघ्या 2 षटकांत 16 धावांत 2 विकेट गमावल्या. पण चौथं षटक सुरू असताना पाऊस पडला आणि खेळ थांबवावा लागला.

Follow Us