IPL 2026 : विराट कोहली ऑन फायर, 19 व्या मोसमाआधी चाबूक खेळी, आपल्याच गोलंदाजांची धुलाई
Virat Kohli Cracking Inning in Intra Squad Match : विराट कोहली याने आपल्याच गोलंदाजांची धुलाई करत 19 व्या मोसमाआधी ट्रेलर दाखवला. विराटने सराव सामन्यात 19 बॉलमध्ये 200 पेक्षा अधिक स्ट्राईक रेटने धावा केल्या.

आयपीएल स्पर्धेतील 19 व्या मोसमाला आता अवघे काही तास बाकी आहेत. या नव्या हंगामाच्या थराराला 28 मार्चपासून सुरुवात होत आहे. त्याआधी 25 मार्चला सर्व 10 संघांचे कर्णधार एकत्र जमले. या कर्णधारांचं फोटोशूट झालं. आता हेच कर्णधार अवघ्या काही दिवसांनी एकमेकांविरुद्ध खेळताना दिसणार आहेत. त्याआधी शेवटचे काही दिवस बाकी असताना खेळाडू जीव ओतून सराव करत आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु 19 व्या मोसमात गतविजेता म्हणून उतरणार आहे. त्यामुळे आरसीबीसमोर ट्रॉफी कायम राखण्याचं आव्हान असणार आहे. त्यामुळे रजत पाटीदार याच्या नेतृत्वात आरसीबी कशी कामगिरी करते याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
आयपीएलच्या 19 व्या मोसमाची लगबग सुरु असताना आरसीबीचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याने धमाका केला आहे. विराटने सराव सामन्यात चाबूक खेळी केली. विराटने या खेळीसह प्रतिस्पर्धी संघाला आपण फटकेबाजी करण्यासाठी सज्ज असल्याचं जाहीर केलंय.
विराटची चाबूक बॅटिंग
विराटने या सराव सामन्यात आपल्या गोलंदाजांची धुलाई केली. विराटने 200 पेक्षा अधिकच्या स्ट्राईक रेटने या सराव सामन्यात धावा केल्या. विराटने 19 बॉलमध्ये 45 रन्सची खेळी केली. विराटने या खेळीदरम्यान मैदानात चौफेर फटकेबाजी केली.
विराटकडून यंदाही तडाखा अपेक्षित
चाहत्यांना कोहलीकडून या मोसमातही विराट स्टाईल बॅटिंग अपेक्षित असणार आहे. विराट कोहली यंदाही फिलीप सॉल्टसह सलामीला बॅटिंगला येणार आहे. विराटने गेल्या 3 हंगामात आरसीबीसाठी बॅटिंगने प्रमुख योगदान दिलं आहे. विराटने गेल्या 3 मोसमात 600 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.
विराटची फायर खेळी
विराटने गेल्या अर्थात 18 व्या मोसमात थोडेथोडके नव्हे तर 8 अर्धशतक झळकावले होते. विराट स्पर्धेच्या पहिल्या मोसमापासून आरसीबीसाठी खेळतोय. विराटने आयपीएल कारकीर्दीत 18 व्या मोसमापर्यंत 268 सामन्यांमध्ये 39.54 च्या सरासरीने एकूण 8 हजार 661 धावा केल्या आहेत.
आरसीबीचा पहिला सामना कधी आणि कुठे?
दरम्यान बीसीसीआयने एकूण 5 ठिकाणी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमुळे 19 व्या मोसमातील पहिल्या 20 सामन्यांचंच वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. त्यानुसार, आरसीबी 19 व्या मोसमातील सलामीच्या सामन्यातच सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध 2 हात करणार आहे. हा सामना 28 मार्चला बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये होणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 7 वाजता टॉस होणार आहे.