SRH vs RCB : हैदराबादला टॉप 2 साठी आरसीबी विरुद्ध किती धावांनी जिंकावं लागणार? जाणून घ्या समीकरण

Sunrisers Hyderabad vs Royal Challengers Bengaluru: हैदराबादसाठी आरसीबी विरुद्ध 22 मे रोजी होणारा सामना टॉप 2 च्या हिशोबाने निर्णायक असणार आहे. जाणून घ्या हैदराबादला बंगळुरु विरुद्ध किती धावांनी सामना जिंकावा लागणार.

SRH vs RCB : हैदराबादला टॉप 2 साठी आरसीबी विरुद्ध किती धावांनी जिंकावं लागणार? जाणून घ्या समीकरण
Pat Cummins Sunrisers Hyderabad
Image Credit source: Bcci
| Updated on: May 22, 2026 | 2:40 AM

सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 68 वा सामना हा शुक्रवारी 22 मे रोजी होणार आहे. हा सामना राजीव गांधी स्टेडियम, हैदराबाद इथे होणार आहे. हैदराबादसाठी प्लेऑफमधील टॉप 2 च्या हिशोबाने आरसीबी विरुद्धचा सामना निर्णायक असणार आहे. या निमित्ताने हैदराबादला टॉप 2 मध्ये येण्यासाठी काय करावं लागणार? आरसीबी विरुद्ध किती धावांनी जिंकावं लागणार? हे सविस्तर जाणून घेऊयात. गुजरात टायटन्सने गुरुवारी 21 मे रोजी आयपीएल स्पर्धेच्या 67 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सवर 89 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला. गुजरातला मोठ्या फरकाने विजय मिळवल्याने नेट रनरेटमध्ये जबरदस्त असा फायदा झाला आहे. गुजरातचा चेन्नई विरूद्धच्या सामन्याआधी नेट रनरेट हा +0.400 असा होता तो विजयानंतर +0.695 असा झाला आहे. गुजरातने या विजयासह पॉइंट्स टेबलमधील दुसरं स्थान आणखी भक्कम केलं.

हैदराबादसाठी टॉप 2 ची लढाई महत्त्वाची का?

गतविजेता आरसीबी 13 पैकी 9 सामने जिंकून 18 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी कायम आहे. आरसीबीचा नेट रनरेट हा +1.065 असा आहे. त्यामुळे आरसीबीने साखली फेरीतील आपला शेवटचा सामना गमावला तरी ते पहिल्या स्थानी कायम राहतील. त्यामुळे आता हैदराबादला सामना जिंकून साखळी फेरीतील आपलं आव्हान दुसऱ्या स्थानी संपवायचं असेल तर आधी गुजरातला पछाडावं लागणार आहे.

गुजरातने या हंगामात साखळी फेरीतील 14 पैकी 9 सामने जिंकले. तर गुजरातचा 5 सामन्यांमध्ये पराभव झाला. गुजरात 18 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी आहे. गुजरातचा नेट रनरेट हा +0.695 असा आहे. आता हैदराबादला विजयासह टॉप 2 मध्ये यायचं असेच तर आरसीबी विरुद्ध मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागणार आहे.

हैदराबादसाठी टॉप 2चं समीकरण काय?

सनरायझर्स हैदराबाद टीमला टॉप 2 मध्ये राहण्यासाठी पहिले बॅटिंग करुन 180 ते 204 धावा करावी लागतील. हैदराबादने 180-204 दरम्यान धावा केल्यानंतर आरसीबीला 87 रन्सने पराभूत करावं लागणार आहे. हैदराबाद वरील समीकरण जुळवण्यात यशस्वी ठरल्यास ते गुजरातला मागे टाकून पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी पोहचतील.

टॉप 2 मध्ये राहण्याचा फायदा काय?

दरम्यान साखळी फेरीनंतर टॉप 2 मध्ये राहिल्यास अंतिम फेरीत पोहचण्यासाठी अतिरिक्त 1 संधी मिळते. साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यानंतर टॉप 2 मध्ये असलेल्या अव्वल 2 संघात क्वालिफायर 1 सामना होतो. हा सामना जिंकणारा संघ थेट अंतिम फेरीत पोहचतो. तर पराभूत होणाऱ्या संघाला अंतिम फेरीत पोहचण्याची आणखी 1 संधी मिळते. पराभूत होणाऱ्या संघाला अतिरिक्त एका संधीमुळे एलिमिनेटर जिंकणाऱ्या संघाविरुद्ध अंतिम फेरीत पोहचण्यासाठी क्वालिफायर 2 सामना खेळण्याची संधी मिळते. त्यामुळे या स्पर्धेत टॉप 2 मध्ये पोहचण्यासाठी कायम चुरस असते.

Follow Us