IPL 2027 च्या रिटेंशनची डेडलाइन समोर! संघांना खेळाडूंची यादी कधी जाहीर करावी लागणार? जाणून घ्या…
IPL 2027 Retention Deadline: आयपीएल २०२७ साठी संघांची रणनीती ठरणार आहे. रिटेंशन डेडलाइन आणि ऑक्शनची तारीख समोर आली आहे.

इंडियन प्रीमियर लीगच्या २० व्या हंगामासाठी म्हणजेच आयपीएल २०२७ साठी सर्व संघांनी तयारी सुरू केली आहे. आगामी हंगामासाठीचा लिलाव १६ डिसेंबर रोजी गोव्यात होणार आहे. लिलावापूर्वी सर्व १० संघांना कायम ठेवलेल्या आणि मुक्त केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करावी लागेल. कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करण्याची अंतिम मुदत जाहीर करण्यात आली आहे.
सर्व १० आयपीएल संघांना १५ नोव्हेंबर २०२६ पूर्वी त्यांच्याद्वारे मुक्त केलेल्या आणि कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करणे बंधनकारक आहे. यावेळी अनेक प्रमुख खेळाडूंना मुक्त केले जाण्याची शक्यता आहे. खेळाडूंच्या अदलाबदलीची संधी अजूनही खुली आहे. परिणामी अनेक संघांनी खेळाडूंची अदलाबदल करण्याच्या या संधीचा फायदा घेतला आहे. ऋषभ पंत लखनौ सुपरजायंट्स सोडून दिल्ली कॅपिटल्समध्ये गेला आहे. तर कुलदीप यादव दिल्ली सोडून लखनौमध्ये आला आहे .
आयपीएल ट्रेड विंडो लिलावाच्या एक आठवडा आधीपर्यंत खुली राहते. लिलावानंतर एका आठवड्याने ही विंडो पुन्हा उघडते. हंगाम सुरू होण्याच्या अंदाजे एक महिना आधीपर्यंत खुली राहते. हार्दिक पांड्यापासून ते अभिषेक शर्मा, यशस्वी जैस्वाल आणि सॅम करनपर्यंतच्या खेळाडूंच्या ट्रेडच्या अफवा पसरल्या आहेत. आतापर्यंत केवळ दोनच यशस्वी ट्रेड झाले असून त्यातून चार खेळाडूंची अदलाबदल झाली आहे.
आयपीएल २०२७ च्या लिलावापूर्वी अनेक प्रमुख खेळाडूंना संघातून मुक्त केले जाण्याची शक्यता आहे. मुंबई इंडियन्स सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या यांसारख्या स्टार खेळाडूंना संघातून मुक्त करू शकते. दिल्ली कॅपिटल्स करुण नायर, पृथ्वी शॉ, रेहान अहमद, दुशमंथा चमीरा, काईल जेमिसन आणि आकिब नबी दार यांना संघातून मुक्त करू शकते. गुजरात टायटन्स ल्यूक वूड, राहुल तेवतिया आणि शाहरुख खान यांना संघातून मुक्त करू शकते . गतविजेता आरसीबीदेखील दोन खेळाडूंना संघातून मुक्त करू शकतो.
आयपीएल २०२७ साठी चेन्नई सुपर किंग्सला नवीन प्रशिक्षक मिळाला आहे. इंग्लंडचा माजी गोलंदाज गॅरेथ बॅटी सहायक प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहे. त्याच्या प्रशिक्षणाखाली इंग्लिश काउंटी संघ सरेने २०२२ ते २०२४ दरम्यान सलग तीन विजेतेपदे जिंकली होती. आता त्याने सीएसकेमध्ये एक नवीन भूमिका स्वीकारली आहे. तो मुख्य प्रशिक्षक झहीर खानसोबत प्रशिक्षण स्टाफचा भाग असेल.