Justin Greaves : 26 सामने अन् 4 वर्षांनतर मेहनतीचे फळ मिळालेच! जस्टिन ग्रीव्हजनं शतक झळकावलं, थेट ख्रिस गेल…
Justin Greaves Century : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात विंडीजचा सलामीवीर जस्टिन ग्रीव्हजने उत्कृष्ट फलंदाजी करत आपल्या आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले आहे.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्याच सामन्यामध्ये विंडीजचा सलामीवीर जस्टिन ग्रीव्हजने मोठी शानदार खेळी केली आहे. तिरुवनंतपुरमच्या ग्रीनफील्ड स्टेडियमवर भारतीय गोलंदाजांचा दमदारपणे सामना करत त्याने आपल्या वनडे करिअरमधील पहिले शतक साजरे केले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवल्यानंतर जवळपास 4 वर्षांनी आणि 26 व्या सामन्यात त्याला हा जादुई आकडा गाठता आला आहे.
12 चौकारांसह झळकावले शतक
2022 मध्ये वनडे पदार्पण करणाऱ्या ग्रीव्हजसाठी हे शतक म्हणजे अनेक वर्षांच्या मेहनतीचे फळ आहे. याआधी 26 सामन्यांत त्याने केवळ एकच अर्धशतक झळकावले होते. मात्र, भारतीय गोलंदाजांचा समाचार घेत त्याने 104 चेंडूंत आपले शतक पूर्ण केले. या खेळीत त्याने एकूण 108 चेंडूंचा सामना करत 12 चौकारांच्या मदतीने 101 धावा ठोकल्या आहेत.
दिग्गजांच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
भारतीय भूमीवर भारताविरुद्ध शतक झळकावणारा ग्रीव्हज हा वेस्ट इंडिजचा सहावा सलामीवीर ठरला आहे. यासह त्याने गॉर्डन ग्रीनिज, ख्रिस गेल, फिल सिमन्स, शाई होप आणि शिवनारायण चंद्रपॉल यांच्या खास क्लबमध्ये स्थान मिळवले. विशेष म्हणजे, बरोबर 38 वर्षांपूर्वी 1988 मध्ये फिल सिमन्स यांनी याच तिरुवनंतपुरमच्या मैदानावर शतक ठोकले होते आणि आता ग्रीव्हजने त्या इतिहासाची पुनरावृत्ती केली आहे.
तिसरा सर्वात वयस्कर फलंदाज
वयाच्या 32 वर्षे आणि 213 व्या दिवशी आपले पहिले वनडे शतक झळकावून ग्रीव्हजने कॅरेबियन क्रिकेटच्या विक्रमांमध्येही आपले नाव नोंदवले आहे. कारकीर्दीतील पहिले वनडे शतक झळकावणारा तो वेस्ट इंडिजचा तिसरा सर्वात वयस्कर फलंदाज ठरला आहे. या यादीत क्लेटन लॅम्बर्ट (36 वर्षे 57 दिवस) पहिल्या तर शामार ब्रुक्स (33 वर्षे 246 दिवस) दुसऱ्या स्थानी आहे.
