
कुठलीही टीम चॅम्पियन बनते, तेव्हा त्या टीमच्या यशामध्ये काही खेळाडू जास्त चमकतात. या खेळाडूंची सर्वाधिक चर्चा होते. त्यांचं कौतुक होतं. पण हे पूर्ण सत्य नाहीय. कुठल्याही टीमला चॅम्पियन बनवण्यात छोट्या-छोट्या खेळाडूंच योगदान सुद्धा महत्त्वाच असतं. आयपीएल 2024 च्या सीजनच विजेतेपद मिळवणाऱ्या कोलकाता नाइट रायडर्सच्या टीममध्ये असाच एक चेहरा आहे, ज्याने अनेक खेळाडूंना बदललय. कोलकाता नाइट रायडर्सच्या टीमने 10 वर्षानंतर पुन्हा एकदा आयपीएल ट्रॉफी उंचावली. रविवारी 26 मे रोजी चेन्नईमध्ये फायनल झाली. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली KKR टीमने हैदराबादच्या टीमला 8 विकेटने हरवून तिसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकली. कोलकाताच्या या विजयात सर्वाधिक चर्चा माजी कॅप्टन गौतम गंभीरची होती. त्याने मेंटॉर म्हणून येऊन टीमला चॅम्पियन बनवलं. त्याशिवाय सुनील नरेन, आंद्रे रसेल, वरुण चक्रवर्ती या खेळाडूंनी सुद्धा उत्तम कामगिरी केली.
त्याशिवाय केकेआरच्या टीममध्ये असा एक व्यक्ती होता, ज्याने टीमला चॅम्पियन बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. फायनल जिंकल्यानंतर वरुण चक्रवर्ती आणि वेंकटेश अय्यर यांनी त्याचा उल्लेख केला. ही व्यक्ती आहे, टीमचे बॅटिंग कोच अभिषेक नायर. मागच्या तीन-चार सीजनपासून अभिषेक नायर केकेआरचे बॅटिंग कोच आहेत. अनेक खेळाडूंना तयार करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावलीय.
त्या दोघांनी गंभीरला नाही, मग कोणाला दिलं श्रेय?
टीमच्या विजेतेपदात अभिषेक नायर यांची महत्त्वाची भूमिका होती, हे फायनल जिंकल्यानंतर वरुण चक्रवर्तीने मान्य केलं. तेच फायनलमध्ये वेंकटेश अय्यरने 26 चेंडूत 52 धावा फटकावल्या. वेंकटेश अय्यर म्हणाला की, लोकांच काही गोष्टींवर लक्ष जात नाही. पण मी असं होऊ देणार नाही. वेंकटेशने आपल्या बॅटिंगमध्ये झालेल्या सुधारणेच क्रेडिट अभिषेक नायर यांना दिलं.
रोहित शर्मा, दिनेश कार्तिकने सुद्धा घेतलीय मदत
याआधी सुद्धा मुंबईचे माजी फलंदाज अभिषेक नायर यांनी अनेकांच्या फलंदाजीत सुधारणा घडवून आणली. दिनेश कार्तिकपासून रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर या दिग्गजांनी करिअरमध्ये वेगवेगळ्या प्रसंगी अभिषेक नायर यांची मदत घेतली आहे. आपल्या बॅटिंगमधील सुधारणेसाठी अभिषेक नायर यांना क्रेडिट दिलं. कोलकाताला पुन्हा चॅम्पियन बनवण्याच श्रेय अभिषेक नायर यांना सुद्धा जातं.