
अंडर 19 आणि सिनिअर मेन्स टीम इंडियाने इंग्लंड दौऱ्यात चाबूक कामगिरी केली. शुबमन गिल याच्या नेतृत्वात भारताने 5 सामन्यांची कसोटी मालिका 2-2 ने बरोबरीत सोडवली. तर अंडर 19 टीम इंडियाने आयुष म्हात्रे याच्या कॅप्टन्सीत 5 मॅचची यूथ वनडे सीरिज 3-2 ने जिंकली. तर 2 मॅचची टेस्ट सीरिज अनिर्णित राहिली. इंग्लंड दौऱ्यानंतर भारतीय क्रिकेट चाहत्यांना आता आशिया कप 2025 स्पर्धेचे वेध लागले आहेत. तर दुसर्या बाजूला देशातंर्गत क्रिकेट हंगामालाही सुरुवात होत आहे. काही दिवसांनी दुलीप ट्रॉफी स्पर्धेला सुरुवात होणार आहे. त्यामुळे चाहत्यांना आता देशांतर्गत क्रिकेटचा थरार पाहायला मिळणार आहे. त्याआधी एक मोठी बातमी समोर आली आहे.
इंग्लंड दौऱ्यात भारताला मालिका जिंकून देणाऱ्या आयुष म्हात्रे याला मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.आयुषला नव्या संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. संजय पाटील यांच्या नेतृत्वात एमसीए निवड समितीने आगामी बूची बाबू 2025-2026 स्पर्धेसाठी 17 सदस्यीय मुंबई संघाची घोषणा केली आहे. मराठमोळा आयुष म्हात्रे या स्पर्धेत मुंबईचं नेतृत्व करणार आहे. तसेच सुवेद पारकर याच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी असणार आहे. सुवेदला 8 फर्स्ट क्लास मॅचेस खेळण्याचा अनुभव आहे. एमसीएने वेबसाईटवरुन याबाबतची माहिती दिली आहे.
तसेच मुंबईच्या 17 सदस्यीय संघात भारतासाठी कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या सर्फराज खान याचाही समावेश करण्यात आला आहे. तसेच मुशीर खान आणि हार्दिक तामोरे यांनाही संधी मिळाली आहे. बुची बाबू स्पर्धेचं आयोजन हे 18 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर दरम्यान चेन्नईत करण्यात आलं आहे. मुंबई या मोहिमेतील आपला पहिला सामना हा 18 ऑगस्ट रोजी तामिळनाडू डिस्ट्रिक्स्ट इलेव्हन विरुद्ध खेळणार आहे.
आयुष म्हात्रे याने आतापर्यंत 9 फर्स्ट क्लास सामने खेळले आहेत. आयुषने या 9 सामन्यांमधील 16 डावांत 31.50 च्या सरासरीने 504 धावा केल्या आहेत. आयुषने या दरम्यान 2 शतकं आणि 1 अर्धशतकही ठोकलं आहे. तसेच सर्फराज खान 17 किलो वजन कमी केल्यानंतर कशी कामगिरी करतो याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. तसेच सर्फराजसाठी दुलीप ट्रॉफी स्पर्धेआधी बूची बाबू स्पर्धा महत्त्वाची ठरणार आहे. सर्फराज दुलीप ट्रॉफी स्पर्धेत वेस्ट झोनकडून खेळणार आहे.
बुची बाबू स्पर्धेसाठी मुंबई संघ : आयुष म्हात्रे (कर्णधार), सुवेद पारकर (उपकर्णधार), सर्फराज खान, मुशीर खान, दिव्यांश सक्सेना, प्रग्नेश कनपिल्लेवार, हर्ष आघाव, साईराज पाटील, आकाश पारकर, आकाश आनंद (विकेटकीपर), हार्दिक तामोरे (विकेटकीपर), श्रेयस गुरव, यश डिचोलकर, हिमांशु सिंह, रॉयस्टन डायस, सिल्वेस्टर डिसूजा आणि इरफान उमेर.