
टीम इंडियाला पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकून देणारे दिग्गज कर्णधार कपिल देव यांनी माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी प्रकरणी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. देव यांनी कांबळीच्या प्रकृतीबाबत खेद व्यक्त केला. तसेच कांबळीला दुसऱ्यांच्या मदतीसह स्वत:ची मदत करावी लागेल, असंही देव यांनी नमूद केलं. कांबळी गेल्या अनेक महिन्यांपासून तब्येतीसोबत झगडतोय. कांबळीचा काहीच दिवसांपूर्वीच एक व्हीडिओ व्हायरल झाला होता. या व्हीडिओत कांबळीला धड उभंही राहता येत नव्हतं. त्यानंतर अनेक जणांनी कांबळीसाठी मदतीचा हात पुढे केला.
मुंबईतील दादरमधील शिवाजी महाराज पार्कात दिग्गज प्रशिक्षक रमाकांत आचरेकर सरांच्या स्मारकाचं अनावरण करण्यात आलं. या कार्यक्रमात आचरेकर सरांचे शिष्य टीम इंडियाचे माजी फलंदाज सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी एकत्र आले होते. कांबळीला या वेळेस सचिनला इच्छा असूनही मिठी मारता आली नव्हती. कांबळीला उभं राहण्यासाठी संघर्ष करावा लागत होता. इतकंच नाही, तर कांबळीला बोलतानाही त्रास जाणवत होता.
कांबळी आणि तेंडुलकर या दोघांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीला जवळपास एकत्रच सुरुवात झाली. दोघांनीही नावलौकीक कमावला. मात्र कांबळीला प्रसिद्धी पचवता आली नाही, असं म्हटलं जात आहे. कांबळीला नको त्या सवयींच्या आहारी गेला. त्याचा परिणाम हा कांबळीच्या खेळावर, वैयक्तिक आयुष्यावर, नात्यावर पर्यायाने आरोग्यावरही झाला. मात्र आचरेकर सरांच्या कार्यक्रमानंतर कांबळीची स्थिती दिग्गज क्रिकेटपटूंना पाहवली नाही. त्यानंतर 1983 च्या वर्ल्ड कप विजयी संघाने कांबळीसाठी मदतीचा हात पुढे करायचं ठरवल. मात्र असं करताना कपिल देव यांनी एक अट ठेवली. कांबळीला या व्याधीतून मुक्त व्हायचं असेल, तर त्यालाच आधी ठोस पाऊल उचलायला लागेल, असं देव यांनी म्हटलं.
VIDEO | “We should all try to support him (Vinod Kambli), more than I trying to support him, he should support himself, we can’t look after him if he does not want to look after himself so all the cricketers feel very sad to see him and I wish he or his closest friends spending… pic.twitter.com/ePeGSdNwfD
— Press Trust of India (@PTI_News) December 9, 2024
“आपण सर्वांना कांबळीची मदत करण्याचा प्रयत्न करायला हवा. मात्र आपल्यापेक्षा जास्त त्याने स्वत:ला उभारी द्यायला हवी. जर ती व्यक्तीच स्वत:ची काळजी घेत नसेल, तर कुणीच त्याचं लक्ष ठेवू शकत नाही. आम्ही जे काही पाहिलं त्यामुळे सर्वच दुखी आहोत. कांबळीला त्याच्या जवळच्या मित्रांनी मदत करावी, असं मला वाटतं, जेणेकरुन तो आवश्यक ते उपचार घेऊ शकतो”, असं देव यांनी म्हटलं.